इंग्लंडचा २०४ धावांत खुर्दा

0
143

>> जेसन होल्डरचे ६ तर शेन्नन गॅब्रियलचे ४ बळी

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव ६७.३ षटकांत अवघ्या २०४ धावांत संपला. कर्णधार जेसन होल्डरने ४२ धावांत ६ व शेन्नन गॅब्रियलने ६२ धावांत ४ गडी बाद करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी विंडीजने १९.३ षटकांत १ गडी गमावून ५७ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट नाबाद २० व शेय होप नाबाद ३ धावा करून खेळपट्टीवर होते. अँडरसनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन तंबूची वाट धरण्यापूर्वी सलामीवीर जॉन कॅम्पबेलने २८ धावांचे योगदान देत ब्रेथवेटसह पहिल्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी रचली.

पहिल्या दिवसाच्या १ बाद ३५ धावांवरून काल पुढे खेळताना इंग्लंड संघाला ठराविक अंतराने धक्के बसत राहिले. गॅब्रियलने ज्यो डेन्लीचा त्रिफळा उडवत विंडीजला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यानंतर सलामीवीर रॉरी बर्न्स (३०) गॅब्रियलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडची मधली फळी व शेपूट कापून काढले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. विंडीजच्या क्षेत्ररक्षकांनी त्याचा दोन वेळा झेल सोडला. यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर (३५) व फिरकीपटू डॉम बेस (३१) यांनी थोडाफार प्रतिकार केल्याने इंग्लंडला दोनशे धावांचा टप्पा ओलांडणे शक्य झाले.