कर्णधार हिथर नाईटच्या पहिल्यावहिल्या टी-ट्वेंटी शतकाच्या जोरावर काल बुधवारी आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने पदार्पणवीर थायलंडचा ९८ धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या १७६ धावांना उत्तर देताना थायलंडने ७ बाद ७८ पर्यंत मजल मारली. हिथर नाईटने केवळ ६६ चेंडूंत नाबाद १०८ धावा केल्या. १३ चौकार व ४ षटकारांसह तिने आपली शतकी खेळी सजवली. महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषकात शतक झळकावणारी नाईट ही केवळ चौथी खेळाडू ठरली.
इंग्लंडने २ बाद १७६ धावा करत आपली सर्वोत्तम टी-ट्ेंटी धावसंख्या रचली. नाईट व नॅट सिवर (नाबाद ५९) यांनी तिसर्या गड्यासाठी १६९ धावांची भागीदारी करत महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषकातील कोणत्याही गड्यासाठीच्या सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर डॅनी वाईट व एमी जोम्स शून्यावर तंबूत परतल्यानंतर ही जोडी जमली होती.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडकडून सलामीवीर नताकन चांतमने सर्वाधिक ५३ चेंडूंत ३२ धावा केल्या. इंग्लंडकडून ऍन्या श्रबसोलने ३ तर नॅट सिवरने ५ धावांत २ गडी बाद केले.