- डॉ. मनाली महेश पवार
स्त्री स्वतःच्या खांद्यावर इतरांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळत, जोपासत असते. मग हा डोलारा लिलया पेलण्यासाठी पाया मजबूत नको? म्हणून स्त्री आरोग्यवान, बळकट, शक्तीयुक्त, स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी त्यांचा आहार हा पोषणयुक्त, सकस व वेळेवर असायलाच हवा.
चूल व मूल हे काही स्त्रीला चुकलेले नाही. या दोन्ही गोष्टी स्त्रीच्या दागिन्यांइतक्याच मौल्यवान आहेत. परंतु ती आरोग्यवान, कर्तृत्ववान बनण्यासाठी गरजेचा असतो तिचा आहार. स्त्रीचे आरोग्य आणि सौंदर्य यासाठी तिला सकस आहाराची गरज असते. ‘आहार संभव रोग’ असे आयुर्वेदात म्हटले आहे. म्हणजेच आहारामुळे वेगवेगळे आजारही निर्माण होऊ शकतात किंवा माणसाला आरोग्य मिळवायचे असेल, रोग झाल्यानंतर पुन्हा त्याला आरोग्यप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर औषध महत्त्वाचे नसते- महत्त्वाचा असतो तो आहार! आहार शरीराच्या निसर्गदत्त रोगप्रतिकार यंत्रणेला बल देत असतो. या यंत्रणेवर शरीराचे आरोग्य टिकून राहते. आहाराच्या माध्यमातून शरीराला आवश्यक घटक मिळत असतात, ज्याद्वारे व्याधी प्रतिकारशक्ती अव्याहतपणे चालू राहते.
प्रत्येक अवयवाच्या शरीरक्रिया सुरळीत राहण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. पण स्त्री गृहिणी असो वा नोकरदार- स्वतःच स्वतःच्या शत्रू असतात. स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आहाराकडे लक्ष देत नाहीत, खाणेपिणे अवेळी होते. आहार कशा पद्धतीचा असावा, किती प्रमाणात असावा, नेमके काय, किती आणि केव्हा खाल्ले पाहिजे आणि आपल्या कामानुसार, शक्तीनुसार कसे खाल्ले पाहिजे इत्यादीचे विस्तृत वर्णन आहारशास्त्रामध्ये आहे. आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्येमध्ये याचे विवरण आहे. हे शास्त्र आरोग्य व्यवस्थित होण्यासाठी, टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणून ते प्रत्येक स्त्रीने समजून घेतले पाहिजे.
प्रत्येक वयात- विशेषतः तारुण्यात, रजत्वला अवस्थेत, गर्भिणी अवस्थेत, प्रसूतावस्थेत, वृद्धावस्थेत आहाराबाबत स्त्रीने अतिशय जागरूक असले पाहिजे. स्त्री स्वतःच्या खांद्यावर इतरांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळत, जोपासत असते. मग हा डोलारा लिलया पेलण्यासाठी पाया मजबूत नको? म्हणून स्त्री आरोग्यवान, बळकट, शक्तीयुक्त, स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी त्यांचा आहार हा पोषणयुक्त, सकस व वेळेवर असायलाच हवा. गृहिणी आणि नोकरदार स्त्री यांचा आहारदेखील एकसारखा असता कामा नये. त्यांच्या कामाचा प्रकार व वेळा वेगवेगळ्या असतात हे समजून घ्यावे. यासाठी आज गृहिणी व नोकरदार स्त्रियांच्या आहाराविषयी जाणून घेऊया.
चुकीच्या आहार-विहाराचा परिणाम महिलांच्या वजनावर होतो. वजन वाढल्यावर महिला डायटिंगकडे वळतात. त्याने वजन कमी होत नाही, उलट आहारातून मिळणाऱ्या पोषक मूल्यांना महिला मुकतात. परिणामी नवीन समस्या, नवीन रोग उत्पन्न होतात. म्हणून काम करणाऱ्या व गृहिणीच्या आहारात फरक असणे अपेक्षित आहे.
गृहिणींचा आहार
- गृहिणींमध्ये महत्त्वाचे म्हणजे वेळेचे बंधन नसते. ‘सर्व कामे आटोपल्यावर नंतर खाणार’ या नादात कामं काही आटपत नाहीत व नाश्त्याची वेळ टकून ती दुपारच्या जेवणापर्यंत पोचते. मग ‘आता जेवायचं तर आहे’ या विचाराने एकतर नाश्ता थांबतो किंवा मग जेवण.
- घरामध्ये कामं तर असतातच. पण सध्या घरात सर्व सुखोपयोगी वस्तूंमुळे महिलांची हालचाल कमी होते. त्यांचा व्यायाम कमी होतो. अशा महिला अवेळी जेवल्यास व अधिक चरबीयुक्त आहार जास्त प्रमाणात घेतल्यास समस्या उद्भवतात. ती ऊर्जा तशीच संचित होते व त्यापासून चरबीची वृद्धी होते.
- पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स व प्रोटिन्स अधिक प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्टता, आम्लपित्त यांसारखे विकार निर्माण होतात. वजन वाढते, लठ्ठपणा वाढतो, शरीरशक्ती कमी हेोते. याचे मुख्य कारण म्हणजे योग्य आहाराचा अभाव.
गृहिणी महिलांचा आहार
- रोज तीन ते चार वेळा खावे.
- जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात.
- ताजे व गरम जेवण जेवावे.
- सकाळचा नाश्ता नियमित करावा.
- सकाळचे जेवण जास्त व रात्रीचे जेवण कमी घ्यावे.
- चहा वारंवार पिऊ नये. चहासोबत तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
- फळे, सूप, दूध, वरण-भात, नाचणीचे सत्त्व, भाजीचे पराठे, भाकरी, फुलका, उसळी, मासे, अंडी यांसारखे पदार्थ जरूर खावेत.
नोकरदार महिलांचा आहार
- नोकरदार स्त्रिया दोनदाच जेवतात.
- सकाळी लवकर आपली कामे पटापट उरकतात आणि उपाशीपोटी कामाला जातात. त्यांना खायला वेळच मिळत नाही.
- चहा पितात व तसेच ऑफिस गाठतात.
- भूक लागली की सामोसे, वडा किंवा चहा घेतात.
- दुपारच्या सुट्टीत जे काही भात-आमटी किंवा चपाती-भाजी खातात, बऱ्याच वेळा ते रात्रीच बनवलेले असते, म्हणजे शिळे असते.
- संध्याकाळी घरी आल्यावरदेखील घरातील कामे चुकलेली नसतात. अशातच रात्रीचा स्वयंपाक आटोपून अक्षरशः जेवण पोटात ढकलतात. अशा स्थितीत स्त्रियांना किती प्रमाणात प्रोटिन मिळेल?
- वरण-भात, भाजी-पोळी यातून स्त्रियांना आवश्यक असलेले सर्व घटक मिळू शकत नाहीत.
- सततच्या धावपळीने शरीराची झीज होत असते.
- काम करणाऱ्या महिला सततच्या ताणतणावाखाली असतात. काही महिला यामुळे अधिक खातात- त्यातून दुसरे आजार निर्माण होतात.
- योग्य पोषण न झाल्यास मासिक पाळीचे विकार उद्भवतात.
- पोषणाअभावी त्वचेचे विकार, त्वचा निस्तेज वाटणे, डोळ्याखाली वर्तुळे उमटणे यांसारख्या सौंदर्यविषयक समस्या निर्माण होतात.
- सतत बसून काम, वरच्या वर चहा यामुळे ॲसिडिटी वाढते.
- मानसिक ताणतणाव, धावपळ, वेळी-अवेळी खाणे यातून अल्सर, ॲनिमिया, बद्धकोष्टता यांसारखे विकार निर्माण होतात.
नोकरदार महिलांचा आहार
- काम करणाऱ्या महिलांनी बेसनचे व तळलेले पदार्थ टाळावेत.
- कडधान्ये, तूप, ताक, पालेभाज्या, एखादे फळ आवर्जून खाल्ले पाहिजे.
- ब्रेड, बटर, चीज, मांसाहार यांसारखे खाद्यपदार्थ वारंवार खाऊ नयेत.
- मसाल्याच्या भाज्या जास्त खाऊ नयेत.
- आरोग्यासाठी काही नियम स्वतःला घालावेत.
- भूक लागली असेल तर चहा-कॉफीने ती कमी करू नका. खाण्याच्या वेळी गरजेएवढे खा.
- नाश्त्यामध्ये दूध, ताक, फुलका, भाकरी-भाजी, वरण यांसारखे पदार्थ खा.
- दुपारच्या डब्यात हिरवी भाजी, फुलका, उसळीसारखे पदार्थ न्या.
- दुपारी एखादे फळ खा.
- रात्रीच्या जेवणात घट्ट वरण, भाजी, सॅलड, सूप, भात व फुलका असा आहार घेता येतो.
- हिरव्या भाज्यांचे पराठे, खिचडी यांसारखे पदार्थही मध्ये-मध्ये खाता येतात.
- सकाळी घरून निघताना दूध, लोणी, मध, बदाम, खारिक किंवा गूळ-शेंगदाणे खाऊन जावे.
- ताक पिऊन किंवा दूध-फळ खाऊन निघा.
- दूध आवडत नसल्यास वरणाचे प्रमाण जास्त वाढवा.
- लाल, हिरवी, पिवळी भाजी कटाक्षाने खा.
- तीळ, जवस, कोकम सरबत यांसारखी पेये सेवन करा.
हे सारे लक्षात ठेवून स्त्रियांनी अमलात आणले तर आरोग्यप्राप्ती सहज शक्य आहे.