आहारीय व औषधी गुणांनी युक्त कल्पवृक्ष

0
27

डॉ. मनाली म. पवार

सांतइनेज, पणजी

माडाचे फळ, पुष्प, तेल, मूळ, क्षार इत्यादी सगळीच अंगे उपयोगी आहेत. शहाळ्याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न आहे. नारळ हा रसाने मधुर, शीत व वीर्यात्मक आहे. तसाच गुरू आणि स्निग्ध आहे. म्हणजेच भरपूर फॅट्स असणारा, त्याचबरोबर भरपूर फायबरयुक्त असतो.

भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक शुभकार्याचा आरंभ हा श्रीफळाने होतो. या श्रीफळाला म्हणजेच नारळाला सगळ्या सण-समारंभ आणि शुभकार्यात अनन्यसाधारण स्थान आहे. या नारळाला जेवढे आहारीय महत्त्व आहे, तेवढेच औषधीय महत्त्व आहे. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्याने व परोपकारासाठी उपयोगी पडणारा असल्याने याला (माडाला) ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाते. अन्न, सौंदर्यप्रसाधने, इंधन, फर्निचर इत्यादी अनेक उपयोग असल्याने या झाडाचा कोणताच भाग वाया जात नाही. याला मराठीत नारळ, हिंदीमध्ये नारियल व संस्कृतमध्ये नारिकेल म्हटले जाते.

समुद्रकिनारी प्रदेशात हे माड जास्त प्रमाणात आढळतात. अवस्थाभेदाने बाल- केवळ जलयुक्त, मध्यम- जल कमी व मऊ खोबरे अधिक व पक्व- पाणी अगदी थोडे व खोबऱ्याचा थर जाड.
या माडाचे फळ, पुष्प, तेल, मूळ, क्षार इत्यादी सगळीच अंगे उपयोगी आहेत. ओल्या नारळाला ‘शहाळे’ असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न आहे.

नारळ हा रसाने मधुर, शीत व वीर्यात्मक आहे. तसाच गुरू आणि स्निग्ध आहे. म्हणजेच भरपूर फॅट्स असणारा, त्याचबरोबर भरपूर फायबरयुक्त.
गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक, जो गूळ-खोबऱ्यापासून बनतो. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि नारळाचे कार्य हे बुद्धिवर्धनाचे सांगितले आहे. पण आज लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण एवढे वाढले आहे की काहींच्या मते नारळामध्ये अतिप्रमाणात फॅट असते म्हणून बऱ्याच जणांनी नारळ खाण्याचे प्रमाण कमी केले आहे. अशा या नारळाबद्दल आज आपण विशेष माहिती पाहू-
नारिकेल गुरू स्निग्धं पित्तघ्नं स्वादु शीतलम्‌‍।
बलमांसप्रदं हृद्यं बृहणं बस्तिशोधनम्‌‍॥
नारळ गुरू म्हणजे पचायला जड.
स्निग्ध म्हणजे आर्द्रता वाढवणारे. तेलयुक्त फॅट असणारे.
पित्तघ्नं अर्थात पित्ताचे शमन करणारे.
स्वादु म्हणजे रसाने, चवीला गोड.
शीतलम्‌‍ गुणर्धाने शीत, थंड.
बलमांसप्रद म्हणजे शारीरिक, मानसिक बळ वाढवणारे. स्नायू बळकट करणारे.
हृद्यं म्हणजे हृदयाचे टॉनिक, हृदयाला बल देणारे.
बृहणं म्हणजे वजन वाढवणारे किंवा शरीराचे पोषण करणारे.
बस्तिशोधन म्हणजे शरीराला डिटोक्स करणारे.
नारळाचे फळ हे शीतलक, पचनास जड, मूत्रसंस्था दूषित करते, विष्टंभक बळकट करते.
वात, पित्त, रक्तस्राव विकार आणि जळजळ यावर कार्य करते.
पित्तज्वर व पित्तदोष शांत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
नारळ पाणी हे गोड, थंड, टॉनिक आहे, जे पचनशक्ती वाढवते.
शुक्राणूंची संख्या वाढवते. पचनास हलके असते.
निर्जलीकरण सुधारते आणि पित्तदोष नियंत्रित करते.
पित्तशामक, अनुलोमक आणि शूलप्रशमन असल्याने शहाळ्याचे पाणी तृष्णा, दाह आणि पित्तविकारात व रसक्षयात देतात.
कोवळ्या फळाचा गर आम्लपित्तात व खोबरे मलानुलोमन व आध्यानहर असल्याने पित्तज परिणामशूलात, अमाशयव्रणात कोवळे खोबरे किंवा शहाळ्याचे पाणी द्यावे.
क्षार भेदन असल्याने गुल्म आणि कफजशूलात आणि पुष्प स्तंभक असल्याने निराम अनिसार- रक्तातिसारात द्यावे.
जल, पुष्प आणि कोवळे फळ रक्तपित्तशामक म्हणून योजावे.
पक्व फळ उष्ण असल्याने वाजीकरण आणि आर्तवजनन म्हणून वाजीकरण योगात व कष्टार्तवात उपयोगी पडते.
ताजे फळ सामान्य दौर्बल्य आणि कृशतेत उपयोगी.

तेल क्षयरोगात.
हे पचनाला हलके असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी नियंत्रित केल्याने ऑक्सिडेटिव्ह पेशींचे नुकसान कमी होते.
बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असल्यामुळे किडनी स्टोन काढण्यासाठी नारळाचे पाणी उपयुक्त आहे.
यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
हे डोळ्यांच्या स्नायूंना बळ देते आणि रात्रीची दृष्टी चांगली ठेवते.
इलेक्ट्रोलाइट असंतुलन करते म्हणून ते ज्या रुग्णांना डिहायड्रेशन, ताप, जास्त तहान आणि लघवीला त्रास होतो अशा रुग्णांना दिले जाऊ शकते.
हे सूर्य संरक्षण, मॉइश्चरायझर म्हणून उपयोगी पडते.

विविध स्त्रीरोग व प्रसूती रोगांत उपयोग. योनी भागात शुष्कता जाणवत असल्यास या तेलाने स्नेहन करावे.
प्रसूती पश्चात आईचे व बाळाचे उत्तम स्नेहन होण्यासाठी नारळाच्या तेलाने मालिश करावे.
अतिआम्लता, अल्सरमध्ये याचा उपयोग होतो.
केसगळती, कोंडा, त्वचेचे विकार यामध्ये तेलाचा उपयोग होतो.
त्वचा आणि चेहरा चिकचिकीत, ऑईली झाल्यास नारळाचे पाणी चेहऱ्याला लावून ठेवावे. त्याने त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यास मदत होते.
ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर तत्त्वे असतात, ज्याने त्वचेला फायदा होतो.
निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून, त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा. त्वचा ग्लो होते.
काळवंडलेली, निस्तेज त्वचा झाल्यास नियमित नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज करावा.
गर्भधारणेत, गर्भारपणात आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यावे म्हणजे बाळाची कांती सुधारते. सोडियम, पॉटेशियमची कमतरता भरून येते.
निरोगी हृदयासाठी, हृदय निरोगी राहण्यासाठी नारळ खाणे खूप महत्त्वाचे आहे. रोज सकाळी 1 चमचा नारळाचे तेल प्यावे.
केसगळती होत असेल तर केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. याने केस मुलायम होतात, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होते. त्याचबरोबर नियमित केसांना नारळाचे कोमट करून तेल लावावे.
वजन घटल्यास नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्‌‍स असले तरी हे फॅट्‌‍स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत व नारळाच्या सेवनाने सारखी सारखी भूक लागत नाही. त्यामुळे भुकेवर नियंत्रण राहते.

नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आहे, जे पौष्टिक तत्त्व मेंदूच्या पेशींना सक्रिय करतात. त्यामुळे मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. स्मृती व बुद्धी तल्लख होते. म्हणून बुद्धीच्या देवतेला आवडणारे हे खोबरे प्रत्येकाने आहारीयबरोबर औषधीय म्हणून सेवन करण्यास काहीच हरकत नाही.
तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग केला जातो. फोडणीसाठी, तळण्यासाठी याचा उपयोग होतो. नारळामधील लॅक्टिक ॲसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
तेल केश्य, कुष्ठघ्न आणि व्रणरोपक आहे. व्रणात कापूर मिसळून करवंटी जाळून केलेले तेल तारुण्यपीटिका व व्रणात वापरावे.