- स्वाती हे. अणवेकर
(म्हापसा)
तेल हा वनस्पतीज पदार्थ असल्याने त्यापासून कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण मुळीच नाही. कारण कोलेस्टेरॉल हे प्राणिज आहारात सापडते जसे साय, तूप, चीज, बटर, मांस, अंडी इ पदार्थात हे असते. त्यामुळे हे पदार्थ जास्त व चुकीच्या पद्धतीने खाल्ले असता तुमचे कोलेस्टेरॉल वाढू शकते.
बरेच लोक समजतात की तेल जेवणात वापरल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि त्यामुळे त्यांचे म्हणणे असे असते की जेवणामध्ये तेल न वापरलेले चांगले. पण हादेखील त्यांचा मोठा गैरसमज आहे हे त्यांना माहीत नाही. कारण तेल हे वनस्पतीपासून काढले जाते. अर्थात तेलबिया वापरून त्यापासून तेल काढले जाते. आणि तेल हा वनस्पतीज पदार्थ असल्याने त्यापासून कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण मुळीच नाही. कारण कोलेस्टेरॉल हे प्राणिज आहारात सापडते जसे साय, तूप, चीज, बटर, मांस, अंडी इ पदार्थात हे असते. त्यामुळे हे पदार्थ जास्त व चुकीच्या पद्धतीने खाल्ले असता तुमचे कोलेस्टेरॉल वाढू शकते.
उलट तेल हे तुमचे वाईट कोलेस्टेरॉल कमी करू शकते.
आता आपले चुकते कुठे ते पाहूया. जेव्हापासून हृदयाला घातक म्हणून घाण्यावर अर्थात तेल फिल्टर करून वापरणे मागे पडले आणि पाश्चात्य देशांना अनुसरून आपल्या देशात देखील हे तेल रिफाईन्ड करून वापरले जाऊ लागले तेव्हापासून सगळे गणित बिघडले आणि हे असे तेल हे आपल्या हृदयालाच नाही तर सबंध आरोग्याला कसे अपाय करते ते आपण पुढे पाहूया.
त्याआधी फिल्टर तेल आणि रिफाईन्ड तेल ह्यामधला मोठा फरक आपण जाणून घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या देशात अजून बरेच लोक रिफाईन्ड तेल वापरणे हे आरोग्यासाठी उत्तम मानतात. जेव्हा तेलबियापासून तेल घाण्यावर काढले जायचे आणि ते तेल गाळून वापरले जायचे तेव्हा आपल्या देशात हृदयविकार एवढा कुठे होता?
कारण हे तेल अगदी नैसर्गिक असते ते कोल्ड प्रोसेसने काढले जाते आणि ह्यात त्या तेलबियांमध्ये असणारे सगळे घटक शाबूत असतात. तसेच त्याला त्या तेलबियांचा गंध येतो, तसेच एक विशिष्ट रंग असतो आणि हे तेल थोडे जाडसर असते. ह्याउलट रिफाईन्ड तेल हे रिफाईन करताना उच्च तापमानावर तापवले जाते आणि काही रसायने वापरून ते ब्लीच केले जाते ज्यामुळे त्याचा प्राकृत गंध, रंग आणि घनता नष्ट होते आणि ते रंगविरहित दिसू लागते.
माझा स्वतःचा अनुभव इथे मी सांगते. जेव्हा आपण एखादा पदार्थ रिफाईन्ड तेलामध्ये तळतो तेव्हा असे जाणवते की हे तेल लगेच उच्च तापमान गाठून तापते आणि एक वेगळाच वास त्याच्या तापण्याचा येतो. तसेच तुम्हाला आजूबाजूला उष्णता वाढलेली जाणवते. ह्याचे कारण ह्या तेलामध्ये ऑक्सिडेशन नावाची प्रक्रिया जी होते हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. ती लगेच होते कारण हे तेल लवकर तापते. कारण ते रिफाईन करताना तापवले जाते.
ह्याउलट जर तुम्ही फिजिकली रिफाईन्ड अर्थात फिल्टर तेल वापरले तर तुम्हाला असे जाणवेल की हे तेल तापायला बराच वेळ लागतो. तापल्यावर ते लवकर जळत नाही. त्यामुळे वेगळा वास येत नाही आणि आजूबाजूला उष्णता वाढून पदार्थ तळत असताना तुम्ही हैराण होत नाही. तुम्हीदेखील हा प्रयोग नक्की करून अनुभव घ्या म्हणजे तुमचा विश्वास बसेल.
* तसेच बरेच लोक घरी बराच वेळ तळणासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरतात. पण हे तेल जर करपले असेल तर ते न वापरणे योग्य आणि एकदा वापरलेले तेल हे १-२ दिवसात वापरून घ्यावे नाहीतर फेकून द्यावे. कारण हे तेल शरीराला अत्यंत हानीकारक असते. कारण ह्यात ट्रान्सफॅट भरपूर तयार होते जे आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत.
* आपल्या आहारात आपल्याला २०-२५ मिली तेल दर दिवशी बाहेरून अर्थात आहारातून घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जेवणात जर तेल वापरणे बंद केले तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल जसे त्वचा कोरडी रूक्ष व निस्तेज होणे, एक्झिमा होणे, केस गळणे, हाडे ठिसूळ होणे, सांधे दुखणे, नसांचे आरोग्य बिघडणे. कारण तुम्ही आहारात तेल मुळीच घेतले नाही तर तुम्ही आहारातून घेतलेले फॅटमध्ये विरघळणारे जीवनसत्त्व शरीरात नीट शोषली जाणार नाहीत आणि वरील तक्रारी सुरू होतील.
आता तेल कुठले वापरावे – तर तेल कुठलेही वापरा जसे तिळाचे, खोबरेल, शेंगदाणा, सूर्यफूल इ. पण ते फिजिकली रिफाईन्ड असेल हे मात्र बघा कारण आता सर्व कंपन्या हेच तेल काढू लागल्या आहेत आणि तसे ते जास्त महाग नसते व आपल्या व आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
आता रिफाईन्ड तेल वापरल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते देखील जाणून घेऊया
१) कर्करोग :-
निकेल हा धातू तेल रिफाईन करताना वापरला जातो जो शरीरात श्वसन संस्था, यकृत, लिवर त्वचा इ मध्ये कर्करोग व अन्य व्याधी निर्माण शकतो.
२) पचन संस्थानाचे विकार :-
तेल रिफाईन करताना त्यात वापरले जाणारे सोडियम हायड्रॉक्साइड व अन्य प्रिझर्व्हेटिव्ह हे पचन संस्थेचे विकार निर्माण करू शकतात जसे अल्सर, गॅस्ट्रोइन्ट्रायटीस, ट्यूमर इ.
३) श्वसनाचे विकार :-
तेल रिफाईन करत असताना त्यात ब्लिचिंग, डि वॅक्सिंग, डि ओडरायझिंग, डि गमिंग, डि ऍसिडिफिकेशन अशा बर्याच घातक प्रक्रिया त्यावर केल्या जातात. त्यामुळे तेलामधील क्लोरोफिल हा नैसर्गिक घटक कमी होतो तसेच त्याची चव, गंध, आणि पोषक मूल्य ह्यात विपरीत बदल होतो. त्याचप्रमाणे ह्या प्रक्रिया केल्याने तेलाची ज्वलनशीलता वाढते. अर्थात ते लवकर ऑक्सिडाइज होते व ते लवकर खराबदेखील होते. त्यामुळे बरीच वर्षे ह्याचा वापर केल्यास श्वसन संस्थेचे विकार उत्पन्न होऊ शकतात.
४) हृदय विकार :-
तेल रिफाईन करत असताना उच्च तापमानावर तापवले गेल्याने त्यातील सर्व नैसर्गिक व पोषक घटक नष्ट होतात व त्यामध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
तसेच सतत रिफाईन्ड तेल वापरल्याने मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, ऍलर्जी तसेच लवकर म्हातारपण येणे, वंध्यत्व इ.ची शक्यता वाढते.
त्यामुळे हा लेख वाचून आता आपण नक्की रिफाईन्ड तेल वापरणे सोडून द्याल व फिल्टर तेल जेवणात वापराल ह्यात शंका नाही.