आसाममध्ये पुन्हा हिंसा उसळली असून बोडो अतिरेक्यांनी काल वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करत ४० जणांची गोळ्या झाडून हत्या केली. सोनिटपूर व कोकराजहर जिल्ह्यातील ग्रामीण भागांना अतिरेक्यांनी लक्ष्य केले. सोनिटपूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी ३० जणांना तर कोकराजहर जिल्ह्यात ६ जण अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्यांत ६ महिलांचा समावेश आहे. जखमींचा आकडा दहाच्या आसपास आहे. सोनिटपूर जिल्ह्यात बिसवनाथ चारैली येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात २४ जण मारले गेले तर देकीअजुली येथील हल्ल्यात ६ जण अतिरेक्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले. सोनिटपूर येथील हल्ल्यात ठार झालेले सर्वजण आदिवासी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजुक्ता पराशर यांनी दिली.
अतिरेक्यांच्या सशस्त्र गटाने अरुणाचल प्रदेश सीमेजवळील चारैली उपविभागाअंतर्गत येणार्या सोनाजुली येथे बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात २४ नागरिक ठार झाले तर ६ जण जखमी झाले. हा हल्ला आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या आंतरराज्य सीमेवर झाला. पहिला हल्ला पाकिरीगुरी येथे झाला. या हल्ल्यात चार महिला मारल्या गेल्या तर चार जखमी झाल्या.