आसवांना वेळ नाही…

0
271
  • पौर्णिमा केरकर

आमटे परिवाराची नवी पिढी बदलत्या प्रवाहात समाजसेवेत नवं काहीतरी आणू पाहात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसे जोडली जात आहेत. हे असं सारं सुरू असताना एकदमच डॉ. शीतल यांची आत्महत्या धक्कादायकच आहे.

शृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाईन
दुःख उधळावयास आता
आसवांना वेळ नाही…
बाबा आमटेंनी लिहिलेले हे गीत डॉ. भारती आमटे यांच्या मुखातून मी ऐकले त्याला आता एक दशक उलटून गेले. असे असले तरी या गीताची आर्तता हृदयाला जी भिडली आहे ती काही केल्या विसरता येत नाही. डॉ. शीतल आमटे बाबांची नात. पण एवढ्यापुरतीच त्यांची ओळख मर्यादित नाही हे तर सर्वश्रुतच आहे. असे म्हणतात की महावृक्षाखाली छोटी-मोठी झाडे वाढत नाहीत. जरी त्यांच्या छत्रसावलीत जन्म घेतला तरी वाढ खुरटतेच! परंतु असे अनेक दाखले सर्वच क्षेत्रांत आढळतील की असा भरभक्कम आधारवड आपल्या सहवासात येणार्‍यांना योग्य दिशा आणि मार्ग दाखवतो. गरज असते ती अशा आधारवडाचा आदर्श नजरेसमोर ठेवण्याची. आमटे परिवार हा फक्त महाराष्ट्राचा नाही तर तो देशाचा गौरव आहे. ‘माणुसकी’ या शब्दाचा नेमका अर्थ उमगायचा असेल तर याच परिवाराकडे बोट दाखवावे लागते.

वेदनांना, यातनांना सजवायचे काम केले ते याच परिवाराने. स्वतःची, स्वतःच्या परिवाराची आणि शक्य तर आपल्या नातेवाईकांची दुःखे कुरवाळत असताना आपण अनेकांना बघतो. अशीच माणसे घरात बसून चहा-कॉफीचे घोट घेत घेत ‘समाजसेवा’ या विषयावर गहन चर्चा करतात. असे करताना बाबा आमटेंनी कशी लोकांची सेवा करायची होती, त्यांनी कसं सगळं चुकवलं याचाही सल्ला देण्यास मागेपुढे होत नाहीत. आणि आता तर डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमुळे तर ‘बाबा आमटे यांच्या नातीची आत्महत्या’ या शीर्षकाअंतर्गत जेव्हा बातमी प्रसारित होते तेव्हा मनात विचार येतो की, आमटे परिवारसुद्धा शेवटी माणूसच ना, त्यांनाही उद्विग्नता येत असेलच की! याचा अर्थ आत्महत्येचे समर्थन अजिबात नाही. बाबांची गोष्ट वेगळी होती. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा जाणूनबुजून त्याग केला. त्यांना तेवढीच भरभक्कम साथ लाभली ती साधनाताईंची. ते नुसतेच कर्तव्य नव्हते तर ती निष्ठा होती. ते ध्येय होते. समर्पित जीवन जगताना माझं-तुझं हे द्वैतच मुळात उरत नाही. साधनाताई बाबांमध्ये एकरूप झाल्या होत्या आणि बाबा कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात. इथे अपेक्षा कोणाचीच कोणाकडून नव्हती. पैसा फक्त सेवेसाठी गरजेचा. सेवा करायची तीसुद्धा त्यांच्यातील एक बनून. कुष्ठरोगी आणि बाबा यांत अंतर नव्हते. बाबा मिसळले होते त्यांच्यात. त्यासाठी ते महान होते. हा सेवाभाव फक्त सहानुभूती किंवा त्यांची कीव करून मुद्दामहून ओढून-ताणून आणलेला नव्हता म्हणून ते म्हणू शकले, पायांत असंख्य संकटे, समस्यांचे साखळदंड असले म्हणून काय झाले? मी गतीचेच गीत गाईन. एवढी कामे सभोवताली पडलेली आहेत. वेदना, यातना तर असंख्य असतानाही अश्रू ढाळण्यासाठीही आपल्याकडे वेळ नाही.

त्यांच्या या निष्ठेमुळेच तर ते पहाडाएवढी संकटे झेलूनही अविचल राहिले. ‘थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा, आणि धुंद वादळास कोठला किनारा?’ अशा तेजपुंज कविता लिहिणार्‍या बाबांचे कार्य कधी थांबणे शक्य होते का? ‘आनंदवन’ हे अनेकांचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे. सेवेच्या क्षेत्रात नवनवीन क्षितिजे बाबांनी शोधली. ते अपघाताने सेवेच्या क्षेत्रात आले नव्हते. त्यांचा तो श्वास होता. त्यांच्या या अदम्य जिज्ञासेची, अभंग इच्छाशक्तीची झळ बसली ती दोन मुलांना- प्रकाश व विकास यांच्या बालवयाला! त्यांनीही सेवा हाच धर्म मनाला. सेवेतच आपलं आयुष्य काढलं. आई-वडिलांनी दिलेले संस्कारांचे काम पुढे न्यायचे… तेही त्यांनी दाखविलेला मार्ग नजरेसमोर ठेवून, सर्वांना बरोबर घेत. त्यांनी माणसांना जगविण्याचे काम केले. नवनवीन प्रयोग करीत प्रवाहाला जुळवून घेतले. एक सशक्त, भरभक्कम कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. बाबांनी स्वतःप्रमाणेच आपल्या मुलांनाही त्यात सामावून घेतले. माणसे उगाच मोठी होत नाहीत. त्यामागे अथक परिश्रम असतात. कामाप्रति प्रेम आणि निष्ठा या गोष्टी गरजेच्या असतात. बाबांनी तर हे विचार मुलांमध्ये रूजविलेच, पण समाजमनात वंचित, दुबळे, दुःखीतांप्रति संवेदनशीलता जागविली.

डॉक्टरची मुले डॉक्टर, अभियंता आपल्या मुलांनी अभियंताच व्हावे अशी अपेक्षा बाळगून असतात. अशी सर्रास उदाहरणेही आपण पाहतो. समाजाचे समीकरणच असे झालेले आहे. परंतु समाजसेवक आपल्या मुलांमध्ये समाजसेवेचीच रूजवण करीत आहे, आणि ती भावनासुद्धा धेयवादाने प्रेरित होत प्रवाहित होते हे कदाचित एकमेव उदाहरण असेल. मुलांना शिकवायचे ते पैसे कमविण्यासाठी, हे जिथे समाजाचे समीकरण बनलेले आहे तेथे शिक्षणसुद्धा सेवाव्रती असायला हवे, ही भावना बाबांच्या मुलांनी स्वतःच्या मुलांमध्ये रुजविली. डॉक्टर व्हायचे ते पैसे कमविण्यासाठी नाही तर आदिवासींना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हावी म्हणून!
दशकापूर्वी ‘आनंदवन’-‘हेमलकसा’ या जागांना भेट देण्याचा योग जुळून आला. बाबा नव्हते पण त्यांच्या साधनेचे दर्शन घडले. बाबांनीच म्हटले होते… ती वेदनेची साधना झाली म्हणून सर्व शक्य झाले. ‘आनंदवन’च्या भेटीत डॉ. शीतल यांच्याशी निसटता परिचय झाला होता. पुढे त्यांचे काम कळले. मध्यंतरी कोरोना काळात स्क्रीन एडिक्ट झालेल्या आपल्या मुलाला त्यांनी अतिशय कौशल्याने त्यातून बाहेर काढले. यासंदर्भात त्यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. प्रगल्भतेच्या जोडीला असलेली त्यांची कल्पकता, त्याला साजेलशीच बुद्धिमत्ता निदर्शनास आली. आमटे परिवाराची नवी पिढी बदलत्या प्रवाहात समाजसेवेत नवं काहीतरी आणू पाहात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसे जोडली जात आहेत. हे असं सारं सुरू असताना एकदमच डॉ. शीतल यांची आत्महत्या धक्कादायकच आहे असं फक्त नसून समाजसेवेत आताआताच होत असलेल्या बदलांचा सखोल विचार करायला लावणारी आहे. व्यथांनाही आलेले स्वप्नांचे मोहोर बाबा जगले, तशीच आश्वासकता त्यांच्यात निर्माण केली. कुष्ठरोग्यांना, दुःखीत वंचितांना फक्त ‘आनंदवना’तच नाही तर घराघरांत सन्मान मिळायला हवा ही त्यांची इच्छा होती. बाबांचे स्वप्न कवितेत त्यांनी मांडले-
अजून दुःखं बाकी आहेत
त्यांच्याशी नाती सांगणारी
कलावंत मने हवी आहेत
दुःख गोंजारायला नव्हेत
तर हे जग सुंदर बनवायला हवीत
समाजाच्या दुःखाशी नाते सांगणार्‍यांना शतकांची कुंपणेही अडवीत नाहीत. ते शब्दांना कुरवाळत नाहीत की दुःखांनाही गोंजारत बसत नाहीत. बाबांच्या कविता, त्यांचे प्रचंड सकारात्मक विचार डॉ. शीतल यांनी आत्मसात केले नसतील का? समाजसेवत वावरणार्‍या मनाला जेव्हा निराशा घेरते तेव्हा पर्याय आत्महत्या हाच असावा का? विचार करावाच लागेल… त्यासाठी महामानव बाबांचे शब्दच आठवावे लागतील-
अंधाराची भीती नव्हती, अंधारात प्रकाश होता
संकटाची धास्ती नव्हती, मनगटात मस्ती होती
एकटा कधीच नव्हतो, माणूसच दैवत होते
वेदना जाणवली नाही; तीच साधना झाली व्यथांनाही कवेत घेत. त्यांच्याशी नाते जोडून बाबा चालतच राहिले, गतीचे गीत गात राहिले म्हणूनच तर आसवे ढाळण्याकरिता उसतंच त्यांना मिळाली नाही.