आश्‍वासनानंतर बेमुदत उपोषण पुढे ढकलले

0
96

आज सर्वपक्षीय सभेचे आयोजन

गोवा नोकरभरती आणि रोजगार सोसायटीने कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेतलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी एकालाही सेवेतून काढून टाकण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन काल सरकारने दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज ९ रोजीपासून सुरू करण्यात येणार होते ते बेमुदत उपोषण एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय या कामगारांच्या संघटनेने घेतला असल्याचे या कामगारांचे नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, तसे असले तरी आज मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेली सभा ठरल्याप्रमाणे ४ वा. होईल. गोव्यातील ज्या संघटना व जे पक्ष यावेळी हजर राहून या कामगारांना पाठिंबा देऊ इच्छित आहेत त्यांचे स्वागतच केले जाणार असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी काल सरकारच्यावतीने आपणाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एकाही सुरक्षा रक्षकाला सेवेतून काढून टाकण्यात येणार नाही. मात्र, आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सेवेत सामावून घेण्यास सहा महिन्यांचा अवधी लागेल असे सावंत यांनी चर्चा करताना स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. यावेळी आपण सावंत यांच्याकडे सर्वांना सेवेत कायम करण्याची मागणी आहे, तिही मान्य व्हायला हवी असे सांगितले. सर्वांना सेवेत सामावून घेणार असल्याचे लेखी आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात यावे अशी मागणी आपण यावेळी सावंत यांच्याकडे केली. मात्र, लेखी आश्‍वासन देण्यास त्यांनी नकार दिल्याचे राणे म्हणाले. सरकारने आंदोलनाच्या आठ दिवसांच्या काळात प्रथमच सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असलेले आमरण उपोषण एका दिवसाने पुढे ढकलले असल्याचे राणे म्हणाले. गोवा भरती व रोजगार सोसायटीने १२०० जणांची सुरक्षारक्षक म्हणून भरती केली होती. त्या सर्वांना सामावून घेतले जावे अशी मागणी आहे. प्रुडंट मिडियाने सरकारचा प्रतिनिधी म्हणून प्रमोद सावंत व कामगारांचा प्रतिनिधी म्हणून आपणाला व स्वाती केरकर यांना एकत्र आणून चर्चा घडवून आणली होती. यावेळी सावंत यांनी दिलेल्या आश्‍वासनाने कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता शिथील करू : मुख्यमंत्री

मनुष्यबळ महामंडळाकडे अर्ज करण्याची सूचना

सामान्य माणसांचा कळवळा असलेले आपले सरकार आहे. नोकरभरती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना वयोमर्यादा किंवा शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत अडथळे येत असतील तर ते दूर करण्याची तयारी सरकारने ठेवल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. वयोमर्यादेमुळे ज्या कामगारांना सेवेत घेणे अडचणीचे होत आहे, त्यांना ‘हाऊस किपींग’चे काम दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. मनुष्यबळ विकास महामंडळाने नोकरभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रोजगार सोसायटीच्या कामगारांनी नोकरीसाठी विधीवत अर्ज करावेत, त्या सर्वांना महामंडळात सामावून घेतले जाईल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिले. सध्या महामंडळाने ५०० कामगारांना सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आपल्या हिताचा विचार करून कामगारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही पार्सेकर यांनी केले. सामान्य जनतेकडे भाजप सरकारने नेहमीच सहानुभूतीने पाहिले. १८ ते २० वर्षे आरोग्य खात्यात अधांतरी बनलेल्या मलेरिया विभागातील ६५ कर्मचार्‍यांना आपल्याच सरकारने न्याय दिला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील १९८ कंत्राटी कामगारांनाही आपल्याच सरकारने सेवेत नियमित केले. गोमंतकीय युवकांना नोकर्‍यांच्या संधी मिळाव्या म्हणून जी-४ ही सेक्युरिटी कंपनीचे कंत्राट रद्द करून भरती रोजगार सोसायटीतर्फे स्थानिक युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती केली, याच पद्धतीने उरलेल्या कर्मचार्‍यांनाही न्याय मिळेल, असे ते म्हणाले. उपोषणास बसलेल्या कामगारांची काही नेते दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून जे नेते त्यांना फूस देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी त्यांच्या कल्याणाचा विचार केलेल्या नाही. ते नेते आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सोसायटीच्या कामगारांचा गैरवापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आरोग्यमंत्री असताना सोसायटीचे कामगार संपर्कात होते. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आले नाहीत. त्यांच्याशी चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. जे नेते त्यांना सरकारी नोकर्‍या मिळवून देण्याची आश्‍वासने देत आहेत. त्यांच्यापेक्षा या सामान्य कामगारांची व्यथा आपल्या सरकारला अधिक भावते, असे पार्सेकर म्हणाले.