- पौर्णिमा केरकर
भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात लक्ष्मी बनून प्रवेश करायचा. धान्याची भरलेली पोती एकावर एक ठेवून घर समाधानाने हसवायचा.
ऋतू मग तो कोणताही असो, त्याला स्वतःचा चेहरा असतो. त्याच्या आगळ्या-वेगळ्या स्वरूपात तो सभोवतालाला पुरतेच वेड लावून जातो. सृष्टीचा पाचवा महिना श्रावण हिरव्यात निळाईचा साज लेवून समस्तांना पुरते वेड लावणारा. या ऋतूच्या लावण्याची किमया अधोरेखित करताना कवी-साहित्यिकांना कधीच थकायला झाले नाही. भक्तिरस आणि सौंदर्य यांची समरसता याच मासाला लगडलेली असून त्याला आगळे-वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. माणूससुद्धा याच महिन्यात खूप हलका आणि नितळ होत जातो. मनाची हीच नितळता त्याला पुढे भाद्रपदातील गणेश चतुर्थीला हवीहवीशी वाटत राहते, किंबहुना या नितळतेमधूनच हा संपूर्ण महिना त्याच्यासाठी आनंदाचा उत्कर्षबिंदू असतो.
या दोन्ही भक्तिप्रधान महिन्यांनंतर येणारा महिना म्हणजे आश्विन! या महिन्याचं नावच लडिवाळ सोनसळी झळाळी देणारं. मला आठवते माझे आणि माझ्या पिढीचे बालपण. ज्या पिढीने आश्विन मासाला अनुभवले आहे शेतातून लडिवाळपणे विहरताना… नुकतंच कुठं भात कापणीला आलेलं… पावसाचा ओलावा अजून जमिनीत तग धरून असायचा. अशा वेळेला ओलसर तर कधी अगदी कापलेल्या भाताच्या लोंब्यांचा वास नाकात भरून राहायचा. शेत, भात कापणीसाठी सज्ज व्हायचे. छोटी-छोटी पाखरे पिवळ्याधमक रंगाची, तर कुठे रंगीबेरंगी फुलपाखरे, भिर्मोटी, विविध रंगांची पाखरे, पक्षी सगळ्यांचा एक स्वैर विहार या शेतशिवारावर दिसायचा. आश्विन मला त्या शेतामधून झळझळीत वाहताना दिसायचा. तो पाखरू होऊन फुलझाडावर बसायचा. गवतावरून भर दुपारी मजेत हुंदडायचा. लहान मुलांना आपल्यामागे धावायला लावायचा… आश्विन त्यावेळी एखाद्या खोडकर मुलासारखा अल्लड, अवखळ धावत राहायचा… आश्विन मासाला ओढ लागायची ती घटस्थापनेची. आपला देश कृषिप्रधान. धनधान्याची समृद्धी मानवी मनाला लाभायची ती याच महिन्यात! दसरा सण मोठा त्याच्या आनंदाला तर कधीच नव्हता तोटा. भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात लक्ष्मी बनून प्रवेश करायचा. धान्याची भरलेली पोती एकावर एक ठेवून घर समाधानाने हसवायचा. नवरात्रांमध्ये या सुफलतेची, सृजनत्वाची पूजा व्हायची त्यावेळी ‘कृतज्ञता’ म्हणजे काय हेच घराला आश्विन शिकवायचा.
आत्ताच कुठेतरी पाऊस विविध रूपाने कोसळून थांबलेला. आश्विन येताना त्याचा तो ओलावा घेऊन यायचा. सकाळी सकाळी थोडंसं बाहेर गेलं तर दवबिंदू पायाला गुदगुल्या करायचे. तृणपात्यावरील दवबिंदूंनी आभाळ स्वतःमध्ये सामावून घेतलेलं… त्यात परत आणि इंद्रधनुष्यी रंग. हे सगळेच आश्विनचेच कौतुक. पायवाटांवर दूर-दूरपर्यंत पसरलेले हे असे सोनेरी हिरवे चैतन्य एक अनोखे रूपसौंदर्य बहाल करणारे होते. आश्विन असा आरस्पानी… निसर्ग आणि मानवी मनाला भक्तीचे पावित्र्य जसे प्रधान करायचा तसेच या भूमीप्रतीची कृतज्ञताही व्यक्त करण्याची शिकवण द्यायचा.
घटस्थापना ही तर गर्भाची पूजा… निर्मितीची पूजा… या महिन्यातच धरित्री गर्भश्रीमंतीत येते. धान्य पेरून त्याला दूध-हळदीच्या पाण्याने शिंपण केली की मग पेरलेल्या नऊ प्रकारच्या धान्याची रुजवण कोवळं हळवं रूप घेऊन हिरवे-पिवळे पाते लवलवीतपणे बाहेर येते. मला वाटतं घरात देवाच्या शेजारी, पवित्र जागेवर तसेच मंदिरातही रुजवण घालण्याची जी परंपरा आहे त्यातील मांगल्य आश्विन आजही जपताना दिसतो. आश्विन त्या कोवळ्या वयाला खूप खूप आवडायचा. त्यामागे अनेक कारणे होती. नवरात्रीतील नऊ रात्रींचा थाट काही औरच असायचा. विविध मंदिरांमधून देवीला अशी काही सजविली जायची की ती हुबेहूब जिवंत व्हायची. आश्विन मासाचे हे कसब आजही विविध मंदिरांतून अनुभवता येते.
आश्विनला जायांचा गंध आहे, तसेच प्राजक्ताचा दरवळ आहे. आश्विन पुरती सलगी करून राहायचा या दोन गंधांच्या सोबतीने, आणि माझी ओंजळ भरून वाहायची आबांच्या अंगणातील प्राजक्ताच्या त्या पडलेल्या फुलांनी… हलक्या हातानी फुले ओच्यात भरताना गंध भरभरून घ्यायचा… ही तर नेहमीची सवय होती. या गंधाने तन-मन तृप्त व्हायचे. आश्विन किती बिलगून गेला आपल्याला. तो दिसायचा त्यावेळीही फुलांमधून, पाखरांमधून, कापलेल्या भाताच्या लोंब्यामधून… वार्यावर अव्याहत विहरणार्या त्या गंधामधूनही याची जाणीव व्हायची. श्रावण मासाने माझ्या त्या बालपणाला मेंदी भरले तळहात हुंगायला लावले, तर आश्विनने प्राजक्तफुलांचा केसरी देठ कापून त्याच्या मेहंदीने तळहात रंगवून घेण्याचे वेड लावले. जायांचा तो गंध आश्विन रंध्रारंध्रात भरायचा. तो घमघमाट देहभान विसरून टाकायचा. तिन्हीसांजेला हा गंध अलगद घरात प्रवेश करायचा. त्यावेळी दिसत नसला तरी आश्विन आलाय… घरात तर तो कोपर्या-कोपर्यांमधून फिरत आहे… त्याचा हा असा न जाणवणारा, न दिसणारा स्पर्श आजही मनातळाला खुणावत असतो.
घटस्थापनेनंतर येणारा दसरा म्हणजे तर आश्विन मासाचे एक उत्साही मन. शिव लग्न म्हणजेच प्रकृती पुरुषाचे मीलन आणि त्यानंतर गावागावांत होणारे पावणेर. या पावणेराच्या निमित्ताने गाव जेवण व्हायचे. चांदिवड्याच्या पानावर गरम उकडा भात, त्यावरचे वरण आणि भाजी एखाद्या पंचपक्वांनापेक्षाही रुचकर असायचे हे असे जेवण! आश्विनने बहाल केलेली धनधान्याची तृप्तीच असायची. कृतज्ञ होणं म्हणजे काय असते हे आश्विननेच शिकविलेले आहे. ती कृतज्ञता होती निसर्गाप्रतीची, या भूमीप्रतीची. धान्य भरभरून आले घरात मग ते सगळ्यांच्या मुखी लागायला हवे. तिथे देवत्वाची आणि दिवत्वाची कल्पना होती. या कल्पनेतूनच पावनेराच्या रूपातील आश्विन प्रत्येकाला तृप्त करायचा. ही तृप्ती समाधानाचा परमोत्कर्ष होता. आश्विनने आपल्या गर्भात नेहमीच ओलावा जतन केलेला आहे. या ओलाव्यात आपुलकी आहे. त्याने समस्त सृष्टीला प्रेम दिले तसेच ते मानवी मनालासुद्धा दिलेले आहे. परंतु आपणच एवढे दुर्दैवी आहोत की, त्याचे हे अंतरंग आम्हाला कधी कळलेच नाहीत. ती कृतज्ञता, ती सोनसळी झळाळी, तो उत्साह, ते चैतन्य… आणि मुख्य म्हणजे विनम्र होणारं मन हे आज आपण हरवत चाललो आहोत.
नवरात्रीमध्ये झुल्यावर स्वैर विहार करणारी आदिमाया ही तर प्रतीक आहे या सगळ्या सुफलतेची! हे सृजनत्व जर आम्ही आज ओळखू शकलो तरच कोठेतरी आश्विन मासाची चाहूल आपल्याला सुखावून जाईल. या ऋतुगंधला स्पर्श करता येत नाही, दिसत नाही, तो खुणावतो. तो जाणून घ्यावा लागतो. तो आपल्याला सातत्याने जगणं शिकवतो, सहजपणाने बदलत राहतो, कोणी कितीही त्याच्यावर घाव घातले तरी बदल पचवत उत्साह पेरीत राहतो… आश्विन मास हा अशा नितळ, निरोगी आनंदाचा कंद आहे…