आशेचा किरण

0
39

बर्‍याच कालावधीनंतर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेच्या खाली गेली ही अत्यंत दिलासादायक आणि आश्वासक बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि त्याहून भयप्रद अशा दुसर्‍या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असताना प्रत्यक्षात वाढत्या लसीकरणामुळे म्हणा किंवा ईश्वरकृपेने म्हणा, परंतु रुग्णसंख्या घटू लागलेली दिसते आहे हे सुचिन्हच म्हणायला हवे. हे चित्र असेच राहिले तर कोरोना महामारी ‘पँडेमिक’ कडून ‘एंडेमिक’ कडे म्हणजे ‘महामारी’ कडून ‘स्थानिक’ आजारात रूपांतरित होईल अशी आशा करायला सध्या वाव आहे. अर्थात, जगाच्या काही भागांमध्ये पुन्हा एकवार कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे हेही दुर्लक्षिण्याजोगे नाही. त्यामुळे ‘मास्कमुक्ती’चा टप्पा गाठायला अद्याप तरी अवकाश आहे.
राज्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍यांचे प्रमाण अजूनही फार मोठे आहे आणि ही चिंतेची बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हे रुग्ण का दगावत आहेत याचे उत्तर आरोग्यसेवेतील कोणीही अद्याप दिलेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भयावह मृत्युसत्र सुरू होते तेव्हा सरकारने लोक उशिरा उपचारासाठी येत आहेत म्हणून मरत आहेत असा कांगावा चालवला होता. प्रत्यक्षात रुग्णांना उशिरा उपचार मिळण्यामागची कारणे वेगळी होती. इस्पितळे रुग्णांनी खचाखच भरल्याने खाटाच उपलब्ध होत नव्हत्या. परंतु त्या मृत्यूंचे खापर सरकारने जनतेच्या माथी मारले होते.
सध्या जे मृत्युसत्र चालले आहे, त्यामागे कोरोनाचा घातक व्हेरियंट असावा अशी दाट शंका येते. आरोग्य खात्याने नुकतीच एक आकडेवारी दिली आहे, त्यानुसार पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेल सायन्सेसकडे जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी गेलेल्या गोव्याच्या जवळजवळ ४५२ नमुन्यांपैकी तब्बल २७१ नमुने हे घातक अशा ‘डेल्टा’ व्हेरियंटचे असल्याचा निष्कर्ष कळवला आहे. म्हणजेच राज्यातील कोरोना रुग्णांचे जवळजवळ साठ टक्के नमुने हे घातक डेल्टा व्हेरियंटचे आहेत. कप्पा आणि डेल्टा प्लसचाही संसर्ग अजून काही रुग्णांमध्ये आढळलेला आहे आणि पुण्याहून अजून तीनशेहून अधिक नमुने तपासून यायचे आहेत. त्यामुळे राज्यामध्ये अजूनही कोरोनाचे डेल्टा, डेल्टा प्लससारखे घातक व्हेरियंट चलनात असावेत अशी मोठी शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या कमी रुग्णसंख्येने समाधान न पावता येणार्‍या सणासुदीच्या दिवसांत अधिक खबरदारी घेण्यात जनतेकडून कसूर होणार नाही हे कटाक्षाने पाहिले गेले पाहिजे.
दुसर्‍या लाटेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ९२ टक्के लोकांचे लसीकरण झालेले नव्हते असे आरोग्य खात्याने म्हटले आहे. अनेकांचा केवळ एकच डोस झालेला होता. त्यांना दुसरा डोस न मिळण्यामागे अर्थातच केंद्र सरकारने वाढवलेला कालावधीच कारणीभूत होता हे उघड आहे. राज्यात सर्वच्या सर्व पात्र जनतेने कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्याचा सरकारचा दावा असला तरी दुसरा डोस न मिळालेल्यांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. दोन लाखांहून अधिक व्यक्तींनी पहिला डोस घेऊन ८४ दिवसांचा कालावधी उलटला तरीही दुसरा डोसच घेतलेला नाही असे दिसते आहे. यामागे नागरिकांची अनास्था आहे की आता कोरोना संपला हा गैरसमज हे कळायला मार्ग नाही, परंतु संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय कोरोनावरील सुरक्षा कवच काम करू शकत नाही हे आतापर्यंतच्या अनुभवातून सिद्ध झालेेले असल्याने संपूर्ण लसीकरण हाच कोरोनामुक्तीचा राजमार्ग ठरतो.
ब्रिटनमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढलेली दिसते. परंतु ते गावीही नसलेले गोवा सरकार यूकेमधील चार्टर विमानांना पायघड्या अंथरायला निघाले आहे. एकीकडे सणासुदीच्या काळामध्ये जनतेला निर्बंधांची आठवण करून देत असताना दुसरीकडे ‘सनबर्न’ सारख्या अनावश्यक गर्दी खेचणार्‍या संगीत महोत्सवांच्या आयोजनास परवानगी देते आहे ही विसंगती आहे आणि ती संकटांना आमंत्रण देऊ शकते.
राज्याला आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात नेत्यांच्या मोठमोठ्या सभा, बैठकांची मालिका सुरू होईल. दिवाळीनंतर शाळा महाविद्यालये सुरू होतील. अठरा वर्षांखालील मुलांचे लसीकरण अजून व्हायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव सरकारला आणि तिच्या तज्ज्ञ समितीला असेल अशी आशा आहे. कोरोना रुग्णसंख्या अत्यल्प दिसणे हा सद्यपरिस्थितीत आशेचा किरण असला तरी त्यावर आपणहून ओढवून घेतलेल्या नव्या संकटाची सावली पडू नये हे पाहणे सरकार आणि जनता ह्या दोन्हींचे कर्तव्य आहे हे विसरले जाऊ नये.