आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यघटना मार्गदर्शक

0
4

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे प्रतिपादन; गोवा विद्यापीठ मैदानावर 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

आमच्या देशाची राज्यघटना म्हणजे फक्त एक कायद्याशी संबंधित दस्तऐवज नसून, ही राज्यघटना म्हणजे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व अशा न्यायमूल्यांचे जतन करणारा एक करारनामा आहे, असे उद्गार काल गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले. ताळगाव येथील गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनावेळी त्यांनी काल वरील उद्गार काढले. आधुनिक काळातील आव्हानांना आम्ही कसे सामोरे जायचे याचा मार्गही आम्हाला आमची राज्यघटना दाखवत असून, ती आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे, अशा शब्दांत पिल्लई यांनी भारतीय राज्यघटनेचा गौरव केला.
या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम, पोलीस महासंचालक आलोक कुमार, आमदार, सरकारी सचिव, विविध सरकारी खात्यांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर व अन्यांनी आम्हाला आमच्या विविधतेतील एकता कशी अबाधित ठेवायची, याचा मार्ग दाखवला. आमच्या देशाचे स्वातंत्र्य, एकता व बंधुत्व अबाधित ठेवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वस्वाचा त्याग केला व प्रसंगी आपल्या प्राणांचीही आहुती दिली, त्या सर्वांचा आम्हाला विसर पडता कामा नये व या पवित्र दिनी आम्ही सर्वांनी त्यांना प्रणाम करायला हवा, असे राज्यपालांनी नमूद केले. लष्कर, पोलीस व नागरी सेवेतील जे लोक आजची सुरक्षा व रक्षण यासाठी झटत आहेत, त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचेही पिल्लई यांनी यावेळी स्पष्ट केले.
1961 साली जेव्हा गोवा पोर्तुगीज राजवटीच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा तोही भारतही प्रजासत्ताकाचा बनला. निसर्ग सौंदर्य, संस्कृती व जातीय सलोखा या सर्वच बाबतीत उल्लेखनीय असलेल्या गोव्याने तेव्हापासून आतापर्यंत केलेली प्रगती ही नजरेत भरण्यासारखी आहे, अशा शब्दांत यावेळी राज्यपालांनी गोव्याचे कौतुक केले.
गोव्यातील लोक हे शांतताप्रिय असून, त्यामुळे येथे धार्मिक सलोखा आहे. आणि त्यामुळेच सुंदर असे निसर्ग सौंदर्य असलेले गोवा हे पर्यटकांचे आवडते असे पर्यटन स्थळ आहे. आता पर्यटन व क्रीडा यांच्या जोडीनेच गोवा हे एक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येऊ लागले असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ घेत स्वयंपूर्ण गोवा ही योजना सुरू केली. केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या योजनेखाली 2024-25 या वर्षी 450 हेक्टर एवढ्या जमिनीत 5.39 लाख एवढी झाडे लावण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी दिली.
गोवा सरकारने भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत-गरीब कल्याण’ कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियान सुरू केले आहे. गावांचा विकास साधून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे, अशा शब्दांत राज्यपालांनी राज्य सरकारची प्रशंसा केली.

भारताचा वारसा पुढे नेताना काबो राजभवन येथे ‘वामनवृक्ष कला उद्यान’ उभारण्यात आले आहे. तेथे चंदन वृक्षांचे उद्यान, औषधी वाटिका, गोशाळा, अयूर फणस वृक्षांचे उद्यान, तसेच गोव्याच्या वंशाची गाय असलेल्या श्वेतकपिलाचे जातीच्या गायीचे संवर्धन केले जात आहे. त्याशिवाय गोव्याच्या कावी कलेचे जतन करण्यासाठी पावले उचलली जात आहे, असे राज्यपाल म्हणाले.

50 गरजुंसाठी अन्नदान योजना
राजभवनने 50 गरीब व गरजू लोकांना रोज अन्नदान करण्याची योजना सुरू केली आहे. यापुढे अन्नाबरोबरच गरजूंना वस्त्रेही पुरवण्यात येणार आहे. गोव्यातील लोकांनी गोवा हे शांती, प्रगती व समृद्धी याचे प्रतीक बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी राज्यपालांनी केले.

अधिकाऱ्यांचा सन्मान
यावेळी उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राज्यपालांच्या हस्ते उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि प्रधान मुख्य वनपाल प्रवीण कुमार राघव यांना ‘मुख्यमंत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

विकासात गोवा देशात तिसरा
गोव्याची प्रगती व विकास यासाठी गोवा सरकार झपाट्याने काम करीत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. गोव्याने रस्ते, पूल, रेल्वेमार्ग व विमानतळ याचे चांगले जाळे विणले आहे. गोवा हे देशातील वेगाने प्रगती करणारे राज्य ठरले असून, देशातील वेगाने प्रगती करणाऱ्या पहिल्या तीन राज्यांत गोव्याचा समावेश आहे. साधनसुविधांच्या बाबतीत गोव्याने चांगली प्रगती साधली असल्याचे 11 व्या वित्त आयोगाने नमूद केले असल्याची माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.