>> 2 घरांतून 7 लाखांचा ऐवज लंपास; अन्य घरांतून किरकोळ वस्तू चोरीला
आल्त दाबोळी येथील एकतानगर वाड्यात एका रात्रीत चोरट्यांनी 6 घरे फोडली. दोन घरांतून 7 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली, तर इतर घरांतून किरकोळ वस्तू चोरीला गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 ते शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
सविस्तर माहितीनुसार, घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे आल्त दाबोळी येथील एकतानगर भागातील 6 घरांतील ऐवजावर डल्ला मारला. त्या 6 घरांपैकी 4 घरांत चोरट्यांना विशेष काही मिळाले नाही; मात्र 2 घरांतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून चोरट्यांनी 7 लाखांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी सकाळी पोलिसांना चोरीची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून पंचनामा केला. सदर प्रकरणात चोरांच्या टोळीचा हात असावा, असा दाट संशय आहे. एकतानगर येथील त्या वसाहतीतीलकाही लोक रात्री 1 वाजेपर्यंत जागे असतात. त्यामुळे सदर चोरी रात्री 2 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. एकतानगर येथे दाट वस्ती असलेल्या 40 हून जास्त घरांपैकी सहा घरात राहणारे कुटुंबीय काही निमित्ताने घर बंद करून बाहेर गेलेली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरांत प्रवेश केला.
सहा घरापैंकी चार घरातून चोरट्यांना चोरून नेण्यासारखे विशेष काही मिळाले नाही. मात्र मौला शेख यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि 20 हजाराची रोख रक्कम मिळून 6 लाखांचा, तर अन्य एका घरातील 1 लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मयुर सावंत यांनी दिली.