आले नवीन वर्ष

0
86
  • – मीना समुद्र

या तारखेची सीमारेषा ओलांडतानाही काही नवेसे, हवेसे खुणावत असते आणि आशेच्या हिंदोळ्यावर पुन्हा आपण झुलत राहतो. नव्या वर्षासाठी कितीतरी संकल्प उरी बाळगलेले असतात. गेली दोन वर्षे तर महामारीने जगाला संत्रस्त करून सोडले. शारीरिक, आर्थिक, भावनिक, मानसिक सगळीच हानी झाली. आता तिसरी लाटही येऊ पाहतेय, पण दरम्यानच्या काळात माणसाची आशा तेवत राहिल्यानेच उल्हासाचा, आनंदाचा प्रकाश आपण पाहू शकतो आहोत…

वर्ष निसटले चोरपाऊली, उरले होऊन तारीख केवळ
संकल्पाचे नवे धुमारे, पुन्हा झटकतील सारी मरगळ
चुकले त्याला अनुभव म्हणुनी, हुकले त्याला हसून टाळू
डाव तोच पण मांडू नव्याने, जोवर शिल्लक मुठीत वाळू
मर्मग्राही कवी गुरू ठाकूर यांच्या या ओळी वाचताना आठवण आली ती जात्या वर्षाच्या निरोपासाठी आणि येत्या वर्षाच्या स्वागतासाठी आमच्या हाउसिंग सोसायटीत डिसेंबर महिन्याच्या शेवटी सर्वांच्या सोयीने जागविलेल्या रात्रींची. येथे नव्याने राहायला आल्यावर सर्वांच्या ओळखीसाठी आणि सर्वांच्या परिचयाने जवळ येण्यासाठी ते एक सुंदर निमित्त होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर साधारणपणे उत्साही मंडळींची लगबग सुरू होई. नववर्ष साजरे करण्यासाठी आराखडा तयार होई. योजना, वस्तूंच्या याद्या, कार्यक्रमाला लहानांपासून थोरांपर्यंत सहभाग अपेक्षित असल्याने ‘संगीतखुर्ची’, ‘पासिंग द पार्सल’सारखे खेळ ठरविणे, बच्चे कंपनीच्या नाचगाण्यांची प्रॅक्टिस, एखादी नवीन वेगळीच कल्पना, बरेचसे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या बसण्याची व्यवस्था, लायटिंग, माईक… एक ना दोन… सगळ्या गोष्टींच्या तयारीसाठी कामं वाटू घेणे आणि गृहिणींना पाककौशल्य दाखविण्याची संधी, एखाद्या रिकाम्या घरात गप्पाटप्पा करत खेळीमेळीने चाललेली त्यांची कार्यक्रमाची तयारी, भोजनासाठीच्या पदार्थांची सर्वांना आवडेल अशी निवड, आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रमा दिवशी म्हणजे नववर्षाच्या आदल्या रात्री नाचगाणी, गप्पा आणि अतिशय मुक्त वातावरणातल्या भेटीगाठी, विचारपूस होई. रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांनी आणि छोट्यांच्या पळापळीने गच्ची दणाणून जायची. इथे-तिथे सजावटीत लावलेल्या रंगीत फुग्यांनी आणि दिव्यांनी सजलेली गच्ची अतिशय सुंदर वातावरणनिर्मिती करायची. कार्यक्रमानंतर खेळीमेळीने, आनंदाने सहभोजन आणि मग सहकारानेच सर्व आवरणं. नव्या वर्षाची सुरुवात अशी आनंदात होई.

डिसेंबर महिनाच मोठा हुरहुर लावणारा. पाहुणेरावळे, मित्रमंडळी, उरलीसुरली कामं, नव्या वर्षासाठी घर आणि परिसराची स्वच्छता अशा कामांनी तो गजबजलेला असतानाच वर्ष चोरपावलांनी केव्हा निघून गेलं कळतच नव्हतं. तारखा उलटत राहतात… ठरवलेलं केलं नाही, हाती काहीच राहिलं नाही याच्या जाणिवेने मनाला मरगळ येते. ‘सुरुवात होता होता पुढे ठाकलासे अंत’ अशी अवस्था होते. पण या तारखेची सीमारेषा ओलांडतानाही काही नवेसे, हवेसे खुणावत असते आणि आशेच्या हिंदोळ्यावर पुन्हा आपण झुलत राहतो. नव्या वर्षासाठी कितीतरी संकल्प उरी बाळगलेले असतात. गेली दोन वर्षे तर महामारीने जगाला संत्रस्त करून सोडले. शारीरिक, आर्थिक, भावनिक, मानसिक सगळीच हानी झाली. आता तिसरी लाटही येऊ पाहतेय, पण दरम्यानच्या काळात माणसाची आशा तेवत राहिल्यानेच उल्हासाचा, आनंदाचा प्रकाश आपण पाहू शकतो आहोत.

कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता सरणार्‍या वर्षाची कहाणी सांगते. उगवत्याला वंदन हीच जगाची रीत. आपली साथ आतापर्यंतचीच होती हे विसरू नका अशी मर्यादेची जाणीव हे वर्ष करून देते. मी जाते वर्ष आहे, मला विसरा आणि नववर्षाच्या स्वागताला सज्ज व्हा असे ते वर्ष सांगते. येत्या वर्षासाठी शुभ आशिष देऊन ते जाणारे… सरते वर्ष टाटा करते ही कल्पना.
निरोपाची घडी नेहमीच मोठी कठीण असते. पण तीच अतिशय उल्हासाने साजरी करून जगरहाटीप्रमाणे किंवा चक्रनेमिक्रमाने येणार्‍या नववर्षाचे स्वागत श्रीमती शांता शेळके यांच्या कवितेतही अतिशय सकारात्मकतेने आलेले दिसते. आपल्या जीवनाचे पुस्तक कसले, त्यात काय आहे, त्याची लिपी कोणती याची जाणीव आपल्याला नसते. पण एक अदृश्य हात पानांमागून पाने अविरत उलटत राहतो. ‘गतकालाचे स्मरण जागता वाटुन येते मनामधे भय’ ही त्या कवितेची पंक्ती जीवनातल्या कठीण, दुःखी, अवघड प्रसंगांची जाणीव करून देते. गेल्या दीड-दोन वर्षांच्या जागतिक गंडांतराच्या काळात सगेसोयरे गमावून, भरणपोषणाचा आणि एकूणच जगण्याचा मार्ग गमावून बसलेले बहुसंख्य लोक हताश आणि मरणभयाने पछाडलेलेच राहिले. आता नव्या वर्षाच्या नव्या पानात तरी काही प्रसन्न आशय असेल का? अशी शंका मनाला चाटून जात असतानाच समोरचा अखंड गरजणारा सागर पाहून दिलासा मिळतो की इथेही कणाकणाने खचणारी वाळू आहे, तरीही नवनवीन लाट उठताना किनारा तिला कुरवाळू पाहतो… आणि हसता हसता डोळे पुसत बाहू पसरून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कवयित्री सज्ज होते.

आपल्या मानगुटीवर बसलेल्या आणि गळा कसणार्‍या प्राणांतिक संकटांवर आपण अशीच मात केली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि मानवहितदक्ष अशा स्वयंसेवकांनी निर्भीडपणे महामारीशी झुंज देऊन मानवांचे प्राण वाचवले. संशोधकांनी अथक परिश्रमाने लस शोधून जगताचे रक्षण केले. २०१९ ते २०२० हे वर्ष ‘विकारी’ म्हणजे अनारोग्य वाढविणारे ठरले. २०२० ते २०२१ या वर्षाने ‘शर्वरी’ (रात्र) या नावाप्रमाणे जगाला अंधारात लोटले. पण आता २०२१ ते २०२२ हे साल मात्र ‘प्लव’ या नावाने ओळखले जाईल, म्हणजेच ते ‘तारक’ (तारणारे) ठरेल. वराहसंहितेत सांगितल्याप्रमाणे अतिशय दुःख आणि कठीण परिस्थितीतून वाट काढत हे वर्ष वैभवात नेईल. आपल्या ऋषिमुनी-साधकांचे पुरातन आणि सनातन असे शास्त्रशुद्ध विचार आणि त्यांचे ज्ञानाधारित भविष्य, तसेच अनुभवाधारित कथन किंवा दृष्टांताचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरून ते संपूर्ण मानवजातीला शुभफलदायी होवो अशीच नववर्षाच्या या सुरुवातीला शुभेच्छा द्यावीशी वाटते. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वैयक्तिक संकल्प आहेत ते वाचन, लेखन, चालणे, आपले आणि इतरांचे आरोग्यरक्षण यांत सातत्य राखण्याचे. स्वच्छता, व्यायाम (योगादी क्रिया), काळानुसारी सर्व नियम पाळून भेटणे; सण-समारंभ साजरे करणे; ओळखी-मैत्री-नाती वाढविणे आणि जपणे; पर्यावरण, निसर्ग जपणे; झाडे लावणे, तसेच सामूहिक संकल्पही मनाला उभारी देतात.
नव्या वर्षाचे नवे पान उलटणे याचा अर्थ जुने सर्व टाकून देणे, त्याज्य मानणे असा नाही तर उपकारक, आरोग्यकारक, आनंददायक असे जे काही असेल त्या सर्वांचे मनःपूर्वक, मनःपूत स्वागत करणे. देण्यासारखा आनंद दुसरा नाही. जुन्याचा जुनेपणा त्यातल्या चुका टाळून, नैराश्य, कष्टभोग विसरून नव्याचा अंगीकार खुलेपणाने करणे आणि चांगल्याचा, शुभाचा स्वीकार करणे, त्यासाठी स्वतःला झेपेल अशी वेळ ठरवणे, नियम बनविणे हे फारसे कठीण नसते. आपल्याला नेहमीचे, सवयीचे असलेले बाजूला सारताना, दूर करताना हुरहुर वाटणे आणि तुटलेपणा जाणवणे स्वाभाविक असते. पण त्यावर मात करून नव्या दिमाखाने, नव्या उत्साहाने, नव्या स्वप्नांनी नववर्षाचे स्वागत करू आणि हाउझीच्या खेळात ‘टू लिटल डक्स’ अशा प्रकारे ज्या अंकाचा आनंददायक उल्लेख होतो, असे २२ (२२) साल आता उजाडले आहे. त्यांच्याप्रमाणेच नव्या निर्भर, मुक्त उत्साहाने त्याचे स्वागत करूया. रेल्वे इंजिन, बोटीवरचे भोंगे, फ्लेअर्स, फटाके यांनी तर जल्लोषात स्वागत झालेच आहे. मनुष्यत्वाच्या, संवेदनशीलतेच्या जाणिवा विकसित करू आणि ‘हे विश्‍वचि माझे घर’ ही व्याख्या आपल्या भारत देशाने जगाला पटवून दिली त्याच जाणिवेने, त्याच कर्तव्यनिष्ठतेने वेदकालीन ऋषींनी सांगितलेली ही ‘वैश्‍विक निडं’ ही कल्पना प्रत्यक्षात जपत राहू. भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आणि गोमंतकाच्या मुक्तीची षष्ट्यब्दीपूर्ती होत असताना महामारीमुक्त जगाची पूर्ती या तारक वर्षाने करावी असेच वाटते. तशी शुभचिन्हेही २२ या शुभ आकड्यात दिसत आहेत आणि निदा फाजली यांच्या शब्दात म्हणावेसे वाटते आहे- (अनुवाद ः इब्राहिम अफगाण)
झोपेच्या गडद काळोख्या गुहेत
पुन्हा प्रकाश फुटला
आकाश उघडलं
रस्ते प्रकाशले
दवात भिजलेल्या हवेच्या चाहुलीने
घरट्यात पक्षी कुजबुजले
मग आलं निस्तेज डोळ्यात तेज
आणि कर्णबधिरांना श्रवण
आणि मिळाली निष्प्राण श्‍वासांना ऊर्जा
आयुष्याने पुन्हा नवीन स्वप्न लिहिलं आहे
उत्सवाचा झेंडा उभारा
पुन्हा सूर्य उगवला आहे
आणखी एक दिवस जगायला मिळाला आहे…