- माधुरी रं. शे. उसगावकर
दिवाळीचा प्रत्येक उत्सव दिन हा असुरांचा संहार करण्याचा, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याचा सण आहे. म्हणून या दिवसांत मंगलमय दिव्यांनी सगळीकडे तेजोमय दीपावली साजरी केली जाते. दीप हे मानवमात्राला उर्जा व प्रकाश देऊन त्यांचे जीवन सुखदायी करतात. म्हणूनच दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये असाधारण महत्त्व आहे.
सोनेरी प्रकाशात पहाट न्हाऊन गेली
उत्कर्षाची उधळण झाली, आली दिवाळी
नवरात्रोत्सवापाठोपाठ दसर्याचे सीमोल्लंघन आणि कोजागिरीनंतर वेध लागतात ते दिवाळीचे. मधला पंधरवाडा दिवाळीच्या तयारीत कसा संपतो ते कळतच नाही. या दिवसात पावसाने पाऊसफुल्ल होऊन देशातून ‘एक्झिट’ घेतलेली असते. या काळात निसर्ग हिरवागार संपन्न झालेला असतो. वसुंधरा कुस उजवल्यासारखी तजेलदार दिसते. फुलाफळांच्या आणि पीकपाण्यांच्या रूपातून सृजनाचं गुपित उलगडणार्या सृष्टीमधून मानव आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवत असतो. मन कसं नवजीवनाने भरून निसर्गाप्रती कृतकृत्य होते. थंडीची नुकतीच चाहूल लागलेली असते. दिवाळी सोनेरी पावलांनी आपल्या घरी येते. तसं पाहता दिवाळी दरवर्षी येते पण प्रत्येक वर्षी नवीन उत्सवाची लाट आपल्याला उत्साही बनविते. अशा सुंदर विलोभनीय दृश्यात दीपावलीची चाहूल लागते.
उत्सव दिव्यांचा उत्सव प्रकाशाचा
सण मांगल्याचा सण सौख्याचा
आली दीपावली वर्षाव शुभेच्छांचा
आषाढापासून कार्तिकपर्यंत सणांची रेलचेल चालू असते. चातुर्मासातील सणोत्सवांचे नियमही महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे हिंदू संस्कृतीत प्रत्येक सण, नियम, व्रत यामागे विशिष्ट उद्देश नमूद आहेत. चातुर्मासात आहारनियमन सांगितले आहे. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. जडान्न पचण्यास जड असते. हलक्या आहाराने जठरास आराम मिळतो. शरीराला असा आहार पोषक असतो.
विविध रंगात नटलेल्या या पावन मासात दिवाळी हा सण संस्कृती व आरोग्याची जोड घेऊन येतो. सण, उत्सव, व्रत यांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे करण्याला फार महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात हिरवाईच्या विविध छटांच्या, फुलांच्या रंगगंधांचा उत्सव धरणीमातेवर निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार दिसून येतो. कोजागिरी पौर्णिमेचा ‘फील’ अनुभवल्यानंतर सृष्टी हळुहळू गुलाबी थंडीची शाल पांघरते. हवेतील सुखद गारवा आपल्याला नवा उत्साह व उमेद देतो.
दीपावली हा आपल्या देशातील सर्वांत मोठा सण. दिवाळी सर्वत्र साजरी होते. या सणाचा उगम उत्तर ध्रुव प्रदेशात झाला असे म्हणतात. हा दीपोत्सव सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. चौदा वर्षांचा वनवास संपवून लंकेतले युद्ध संपताच राम सीतेसह अयोध्येला परतला, तो याच दिवसात. त्याप्रित्यर्थ अयोध्यावासियांनी नगरभर् दीप उजळून आनंद साजरा केला, अशी कथा आहे. हिंदूंच्या पारंपरिक प्रथेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्यामागे धर्मशास्त्र, आरोग्यहित, पर्यावरण, सामाजिक, आध्यात्मिक विचार दडलेले असतात.
दीप म्हणजे प्रकाश. आवली म्हणजे ओळ. म्हणून दीपावली. ही प्रकाशाची ओळ (दिव्यांची रांग) ठरते. यातच दिवाळीच्या दिवसांचा समुदाय असतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या विविध दिवसात दिवाळी सणाच्या परंपरा, संस्कार, आहार विहार सामावलेले आहेत. अश्विन कृष्ण द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरा केला जाणारा लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात अंधःकाराला दूर करण्याचा सण म्हणजे हा दिवाळी सण.
दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. दिवाळीची सुरुवात वसुबारसेने होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्या दृष्टीकोनाने वसुबारस या दिवसाचे महत्त्व वेगळेच आहे. या दिवशी आश्विन वद्य द्वादशीला सवत्स गाईची पूजा केली जाते. ती कामधेनू असल्याने तिची पंचोपचार पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. पूर्वीच्या काळी – दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कुणाच्या?.. लक्ष्मणाच्या…. हे गीत गायले जायचे. हल्ली गोमातापूजन दूरच राहिलं. नैवेद्याचं पान दिलं म्हणजे झाली गोसेवा. सणासुदीला आठवणीने गायीची पूजा करण्याने आंतरिक शांती मिळते.
पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमुत्र आणि शेण अतिशय पवित्र आणि औषधी मानले जाते. याचे औषधी सेवन मनुष्याच्या वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे निवारण करू शकते. आपल्या गोमातेमध्ये अशी काही तत्त्वे आहेत की ज्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. गाईपासून मिळणारे दूध हे ‘अमृत’ आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे. पंचगव्य धूपन/हवनासाठी विविध प्रकारे वापरता येते. तसेच दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून यज्ञात पंचगव्याचा वापर केला जातो.
गाईच्या शेणापासून केलेली दंतमंजने, उटणे, साबण, उद्बत्ती, धूप व अन्य प्रकारही उपलब्ध आहेत. त्यांचा आपण यथायोग्य उपयोग करू शकतो.
आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून निघालेल्या धन्वंतरी या अवताराचा हा उत्सव मानला जातो. धन्वंतरी आरोग्याची देवता आहे. म्हणून वैद्य धन्वंतरी साजरी करतात असे म्हणतात.
धनत्रयोदशीसंबंधी असे सूत्र आहे- यमराजाने असे सांगितले की दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला दुःख येणार नाही. तेव्हा या दिवशी ‘यमदीपन’ही केले जाते. या दिवशी घराबाहेर किंवा उंबरठ्याखाली तेलाचा दिवा लावून त्या दीपवातीचा अग्रभाग दक्षिण दिशेस करतात. याने अपमृत्यू ओढवत नाही, असा समज आहे. या दिवशी निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. निरोगी दीर्घायुष्य केवळ प्रार्थना करूनच प्राप्त होणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी या सणातील नियमांचे सातत्याने पालन करणे अनिवार्य आहे. आरोग्य नियमनाचा संकल्प करणे फार महत्त्वाचे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी प्राधान्याने आरोग्याचा तर्कशुद्ध विचार आपल्या पूर्वजांनी केलेला दिसून येतो.
नरकासुराचा वध आश्विन वद्य चतुर्थीला झाला. त्राही भगवान करून सोडणार्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने संहार केला. नरकासुराचा वध आश्विन वद्य चतुर्थीस झाला. मरताना त्याने श्रीकृष्णाकडे वर मागितला की या तिथीला जो पहाटे अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ त्यावर कृष्णाने ‘तथास्तु’ म्हटले आणि परिणामी आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरकचतुर्दशी’ मानली जाऊ लागली.
अशी ही कथा आहे की नरकासुराने सोळा हजार राजकन्यांना बंदीवासात ठेवले होते. श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्या राजकन्यांना सोडवले. दीप प्रज्वलीत करून आनंदोत्सव साजरा केला. या दिवशी सूर्योदयापूर्वी तेलाने मालीश करून उटणे लावून गरम पाण्यात अभ्यंगस्नान करतात. पहाटेच्या गार हवेत गरम पाण्यात स्नान करताना मनाला सात्विक आनंद मिळतो. स्नानानंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीट (एक कडू फळ) चिरडण्याची आपल्याकडे प्रथा आहे.
पहाटे उठण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. ‘लवकर निजे तो लवकर उठे’ असे म्हटले जाते. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे साडेचार ते पाचच्या दरम्यान उठल्याने ताजेतवाने वाटते. शरीरक्रिया सुधारतात. स्नान, पूजा यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. आत्मविश्वास बळावतो. सकारात्मक वृत्ती निर्माण होते. सकारात्मकतेने संतुलित विचार येतात. परिणामी सहज कार्यसिद्धी होते. अभ्यंगस्नान, वृद्धत्व, वात, कफ यांना दूर ठेवतं. झोप चांगली लागते. तसेच त्वचेची कांती झळाळते. आरोग्यवर्धक उपाय प्रत्ययास येतात. असे अभ्यंगस्नानाचे आयुर्वेदात कितीतरी लाभ सांगितले आहेत, ज्याची फलश्रुती मिळते.
स्नानानंतर आंब्याच्या पानांचे तोरण झेंडूच्या फुलांसह मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते. अंगणात, दारात सुंदर रांगोळी काढली जाते. फुलांच्या, पणत्यांच्या पण सजावटीने घर, वृंदावनाचे सुशोभीकरण केले जाते. फुलापानांच्या रांगोळीवर पणत्यांची आरास फारच खुलून दिसते. त्यामुळे रांगोळीत नाविन्याची अनोखी छटा दिसून येते. हा एक पर्यावरणाचाही भाग होऊ शकतो. यामध्ये वापरण्यात आलेली फुले तसेच पानांपासून आपण सहज सेंद्रिय खत तयार करू शकतो.
दिवाळीचा प्रत्येक उत्सव दिन हा असुरांचा संहार करण्याचा, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याचा सण आहे. म्हणून या दिवसांत मंगलमय दिव्यांनी सगळीकडे तेजोमय दीपावली साजरी केली जाते. दीप हे मानवमात्राला उर्जा व प्रकाश देऊन त्यांचे जीवन सुखदायी करतात. म्हणूनच दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये असाधारण महत्त्व आहे.
दिवाळीच्या दिवशी पोह्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. इथे गोव्यात दुधातले, नारळाच्या रसातले, बटाटेपोहे, दह्यातले पोहे, वाटाण्याची उसळ आणि आंबाड्याची करम हे दिवाळीप्रित्यर्थ खास पदार्थ बनवले जातात. नवीन कपडे परिधान करून देवदर्शन केलं जातं, तसंच औक्षण केलं जातं. अशा संस्कारशिदोरीमुळे एकमेकांप्रति असलेले प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होतो. हा खजिना अनमोलच म्हणावा लागेल. कारण आजच्या चौकटाच्या कुटुंबात असे संस्कार पहावयास मिळणे दुरापास्त झाले आहे.
दिवाळीचा फराळ म्हणजे चविष्ट. निसर्गात सुरू झालेल्या थंडीला आणि त्यामुळे शरीरात प्रज्वलीत होऊ लागलेल्या अग्नीला हा फराळ पचायला जड तरी शरीराला पोषक असतो. आहार सात्विक असल्याने मनात राजसी भाव रूजतात. आयुर्वेदानुसार असा उपयुक्त आहार शरीरात ऊर्जा निर्माण करतो. आंबट-गोड चवीने जठराग्नी उद्दिपीत होण्यास मदत होते. हे शरीराला आवश्यक असते.
चौथा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. आश्विन वद्य अमावस्येस लक्ष्मीपूजन करतात. या वर्षी लक्ष्मीपूजन व नरकचतुर्दशी एकाच दिवशी करायचे आहे. आश्विन अमावस्येची रात्र लक्ष्मीची आराधना व उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ असल्याचे कथित आहे. ‘रुद्रयामल’ तंत्रानुसार लक्ष्मी भगवान विष्णूसह विश्वभ्रमण करते. तिला जी व्यक्ती तिची उपासना व आराधना करताना आढळेल तिच्या घरी ती निरंतर वास्तव्य करते.
लक्ष्मीबरोबरच कुबेराचे पूजन करावयाचे असते असे धर्मशास्त्र आहे. कुबेर संपत्तीचा स्वामी असल्याने त्याची उपासना केल्यास प्राप्त झालेल्या संपत्तीचा आपण दीर्घकाळ उपभोग घेऊ शकतो. लक्ष्मीचे वास्तव्य प्रत्येकाच्या घरी असावे याही उद्देशाने लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीच्या सणातील लक्ष्मीपूजन न्यारेच असते. दिव्यांची आरास, विविध सुंदर रांगोळ्या काढून लक्ष्मीपूजन केले जाते. बर्याच ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दिवाळी सण हा दिव्यांचा आहे. फटाकडे उडवण्याचा आतषबाजीचा नाही हे लक्षात ठेवावे. त्यामुळे फटाकेविरहित दिवाळी साजरी करावी. पर्यावरणाचा समतोल राखला जावा.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या छोट्या मोठ्या दुकानात दीपोत्सव करून लक्ष्मीपूजन करतात. वहीपूजन करून नवीन हिशेब सुरू केले जातात. पूजा झाल्यानंतर आल्यागेल्यांना प्रसाद म्हणून चुरमुरे, गोडधोड वाटण्यात येते.
आजच्या कलीयुगात प्रत्येकाला लक्ष्मीचा हव्यास असतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचे महत्त्व खरं तर सांगण्याची गरज उरली नाही. लक्ष्मीपूजन प्रदोष काळात करायचे असते. दिवेलागणीच्या वेळी श्रीलक्ष्मीसुक्ताचा पाठ अवश्य करावा असे धर्मशास्त्र सांगते
.
पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे
पद्मप्रिये पद्मदलायताक्षि
विश्वप्रिये विश्वमनोऽनुरूपे
त्वत्पादपद्म मयि सान्निधत्स्य
याचबरोबर कुबेराचे ध्यानही करावे असे शास्त्रात आहे. समृद्धीकारक मंत्रजप करावा. मंत्रजप करत राहिल्यास व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी निर्माण होत राहते. अपेक्षित परिणाम होतो अशी मंत्रामागील भूमिका, शास्त्र आहे. हे सर्व करण्यासाठी आजच्या धावपळीच्या युगात शक्य नाही. त्यामुळे जे आपल्याला शक्य आहे ते सश्रद्ध मनाने करावे. यामुळे मानसिक शांती लाभते व मनोबल वाढते. नवचैतन्यानंदाची उर्मी येते. सद्सद्विवेकबुद्धी जागृत होते. असे म्हणतात की ‘ज्याचे मन शांत तो खरा संत!’ पण आता शिक्षणामुळे म्हणा किंवा लागलेल्या निरनिराळ्या शास्त्रीय शोधांमुळे मनुष्याची देवावरची, धर्मावरची तसेच चांगुलपणावरची श्रद्धा कमी झाली. श्रद्धा कमी झाल्यामुळे मनुष्यमन अस्वस्थ होत आहे.
आजकाल विभक्त व लहान कुटुंबपद्धती असल्याने मुलांना आजी-आजोबांचा, काका-काकींचा सहवास मिळत नाही. मूल एकाकी बनते. घरात जवळपास समवयस्क किंवा मुलांसाठी मोकळा वेळ देणारे कोणी नसल्यामुळे मुलाला आपल्या भावना व्यक्त करायला काही मार्गच नसतो. त्यामुळे ते वाहवत जाण्याचीच भीति जास्त असते. आनंदी व निरोगी जीवनासाठी वयस्कर माणसांचा सहवास हवाच… पारंपरिक संस्कृतीचा, संस्कारांचा दिवा पुढील पिढीसाठी तेवत ठेवण्यासाठी!!
कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा हा दिवस विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा, फुले खोचतात. कृष्ण, गोपाळ, गाई-वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात. ग्रामीण भागात गाय बैलाची पूजा करतात. त्यांना सजवतात. फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालतात. खाण्यासाठी गोडधोड देतात. याला ‘धेंडलो उत्सव’ असेही म्हणतात.
या उत्सवदिनात निसर्गातील मुक्या प्राण्यांचा मान राखला जातो. भूतदया जागृत होते. प्राण्यांविषयीची कृतज्ञता दिसून येते. प्राणी- पक्षी हे अनादिकालापासून माणसाचे मित्र बनलेले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणारे ज्ञान, धर्म व ईश्वर कृपा यांच्यायोगे आपलं कल्याणच आहे, याची प्रचिती इथे येते.
पाचवा दिवस- कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज येते. यमराजाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इ. वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याचे औक्षण करते. त्याला दीर्घायुष्य मागते. भाऊ यथाशक्ती पैसे, कापड, दागिना वगैरे वस्तू ओवाळणीत देतो.
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया
या काव्यपंक्तीतून बहिणीच्या बंधुप्रेमाची उत्कटता व्यक्त होते. भाऊबीजेचा सोहळा म्हणजे बहिणीच्या निरागस पवित्र मंगल प्रेमाचा विलक्षण महिमा आहे.
दिवाळीचे हे उत्साही, आनंदी, मनमोहक रूप सर्वांगीण उत्कर्षाचे आहे. सणांच्या निमित्ताने पूर्वजांनी आपल्याला धर्माचे, आरोग्याचे नियमन सूचीत केलेले आहे. हे आम्हाला दैनंदिन जीवनात नित्य उपयोगी असते. हे अशक्य बिलकुल नाही. पहाटे उठणं, स्नान करणं, व्यायाम करणं, सात्विक आहार घेणं, योग्य विहार करणं हे सर्व योग्यरीत्या जमलं तर दिवाळीची काही नियमावली जोपासली तर रोजच्या आचरणात दिवाळीची अनुभूती येऊ शकते. मनात आणलं तर काय शक्य नाही? इच्छा असेल तिथे सवड असतेच. अहंचा पडदा दूर सारून हृदयात प्रेमाच्या पणत्या लावून आनंदाची उधळण करणार्या या सणातून आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशित होवो. अज्ञानाला मागे टाकून ज्ञानाचा प्रसार करणार्या या सणातून आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशित होवो. अज्ञानाला मागे टाकून ज्ञानाचा प्रसार करणार्या दीपावलीचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंददायी होवो. आरोग्याची वृद्धी होवो आणि सर्वांचे जीवन समृद्ध, मंगलमय होवो ही दिवाळीची शुभकामना!!