- रमेश सावईकर
शिशिरातील ‘पानझड’ ही नकारात्मकता झटकून टाकण्याचे प्रतीक आहे, तर वसंत ऋतूत झाडाला नवपालवी येते ती नवचैतन्य, नवा उत्साह, नव्या ऊर्जाप्राप्तीचं प्रतीक आहे. वसंत ऋतूत निसर्ग लोभस रूप धारण करतो. निसर्ग हा कलाकार आहे. त्याच्या विविध कलांचा आविष्कार वसंतात घडलेला आपणास पाहायला मिळतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे.
वसंत हा वर्षातील एकूण सहा ‘ऋतूंचा राजा’ म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार चैत्र व वैशाख हे वसंत ऋतूचे दोन महिने. पण दिनदर्शिकेनुसार माघ वद्य पक्षात वसंत सुरू होतो. माघ कृष्ण पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो. शिशिर ऋतू संपायला येतो न येतो तो वसंताची चाहूल लागते. ‘पानझड’ संपून झाडे, वृक्षवल्लींना नवीन पालवी फुटण्याची लक्षणे दिसू लागली की समजावे- आला, वसंत ऋतू आला! ‘वसंत ऋतु हा बहरा आला; अति आनंदे लता बहरल्या’ असे एका गीतात म्हटले आहे.
शिशिरातील ‘पानझड’ ही नकारात्मकता झटकून टाकण्याचे प्रतीक आहे, तर वसंत ऋतूत झाडाला नवपालवी येते, ती म्हणजे नवचैतन्य, नवा उत्साह, नव्या ऊर्जाप्राप्तीचं प्रतीक आहे. वसंतात सृष्टीत मोठा बदल घडतो. निसर्ग हा मुळातच माणसाचं आकर्षण आहे ते त्याच्या सौंदर्यामुळे. पण वसंत ऋतूत निसर्ग लोभस रूप धारण करतो. निसर्ग हा कलाकार आहे. त्याच्या विविध कलांचा आविष्कार वसंतात घडलेला आपणास पाहायला मिळतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. वसंत ऋतूचे वर्णन प्राचीन काळापासून ते कवी कालिदास व नंतरच्या अनेक कवींनी केलं आहे. ब्राह्मण ग्रंथातील तैतरीय ग्रंथात वसंत ऋतूचं वर्णन केलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत ‘ऋतुनाम कुसुमाकर’ असे म्हणून ऋतुराजी वसंताची बिरुदावली लावली आहे.
वसंताचे कृषी संस्कृतीशी जवळचे नाते आहे. तो नवचैतन्य, उत्कर्षाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीपासून (फाल्गुन कृष्णपंचमी) देशभर वसंतोत्सव सुरू होतो. वेगवेगळ्या देशांत वसंत ऋतूचे महिने भिन्न आहेत. युरोपमध्ये मार्च-एप्रिल तर ऑस्ट्रेलियामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर हे वसंत ऋतूचे महिने आहेत.
वसंत ऋतूत आकर्षक वाटणारा निसर्ग लोभस वाटतो. निसर्ग सोळा कलांनी फुलून येतो. वेगवेगळ्या सौंदर्यकलांमुळे तो मनुष्य, पशुपक्षी आदींना आकर्षण ठरतो.
माणूस अस्वस्थ झालेला असतो तेव्हा अस्वस्थ प्रकृतीला ‘स्वस्थ’ बनविण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवे. निसर्ग मानवाला वेदनामुक्त करतो. निसर्गाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होऊन विशेष प्रभाव पडतो. हा परिणाम चिरगामी असतो. निसर्गात अहंशून्यता असते म्हणून तो प्रभूच्या (भगवंत) अधिक जवळ असतो. प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो. त्याचा हात फिरला तर आपलं संपूर्ण जीवन बदलून जाईल. निसर्गाची सुंदरता व मानवाची रसिकता याचा आविष्कार घडविणारा हा ‘वसंत’ राजा आहे.
निसर्ग हा सुख-दुःखाच्या द्वंद्वापासून दूर असतो. निसर्ग प्रभुस्पर्शाने फुलून येतो. म्हणून माणूस निसर्गाच्या सान्निध्यात जेवढा अधिक जाईल, राहील तेवढा त्याच्यावर प्रभूचा हस्तस्पर्श होऊन त्याचं जीवन पार बदलून जाईल. आशा व सिद्धी यांचा संगम होईल. कल्पना व वास्तवता यांचा संगम होईल. स्वप्नशीलता जाऊन वास्तव जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लाभेल.
जीवन व वसंत एकरूप करून टाकले तर मानवाला आपली संस्कृती ‘संत’ वाटेल. संत म्हणजे ज्याच्या जीवनात वसंत फुलून येतो तो संन्ता! यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा असा हा ‘वसंत’ आहे. सौंदर्य, संगीत, स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार झाला तर आपण वसंताचे वैभव जाणले असे होईल.
जीवनात वसंताचा ऱ्हास झाला तर सौंदर्य, रसिकता, मृदुलता मानवाला विनाशाच्या गर्तेत ढकलून देईल. वसंताचा उत्साह हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा जो खरा पुजारी असेल तो जीवनात कधीच निराश होणार नाही.
उत्तरायण सुरू झाल्यावर निसर्गाची रंगपंचमी सुरू होते. माघ महिन्यातच वसंताची चाहूल लागते. माघ शुद्ध पंचमी जी ‘रंगपंचमी’ म्हणून संबोधली जाते, त्या तिथीपासून ‘वसंतोत्सव’ सुरू होतो. प्राचीन काळात मानव निसर्गाच्या अधिक सान्निध्यात राहायचा. त्यानुसार व्यवहार व्रते, सण, उत्सव या अनुषंगाने आखण्यात आलेले दिसतात. कृष्ण हा देव असून त्याची आराधना केली जाते. सर्व कलांची देवी सरस्वती व धन-संपत्ती देवता लक्ष्मी यांचे महत्त्व अधिक आहे. लक्ष्मीदेवी या पंचमीला प्रगट झाली म्हणून या रंगपंचमीची महती विशेष आहे. हा उत्सव अतिशुभ मानतात. प्राचीन काळात ‘सुवसंतक’ या नावाने वसंतोत्सव साजरा करीत. देवतांची पूजा करून त्यांना नवीन धान्य, फळे अर्पण करून नंतरच ती खायला सुरुवात करण्याची प्रथा होती. शतपथ, तैतरीय ब्राह्मण ग्रंथात वसंत ऋतूत औषधी निर्माण होतात असा उल्लेख आढळतो. वसंत ऋतूत फळांचा राजा संबोधला जाणारा ‘आंबा’, बाहेरून काटे व अंतरात गोडवा असणारा ‘फणस’, काजू व इतर फळे यांचा मौसम सुरू होतो. याशिवाय ‘रानमेवा’ उत्पन्न होतो. रानमेव्यात चुन्ना, करवंदे, चारा आदींचा समावेश होतो. भाजीपाला तयार होतो. शिशिर ऋतूत जाणवणारा फुलांचा दुष्काळ दूर होऊन फुलझाडांना फुलांचा बहर येतो. गुलमोहराचा बहर तर एक विशेष आकर्षण असते. सृष्टिसौंदर्यात फुलाफळांची भर पडते. पळस, सावरी, पांगारा, शाल्मली, सोनचाफा, नागचाफा, पांढरा-लाल चाफा, भुईचाफा, केवडा आदी फुलझाडांचा बहर आसमंतात पसरून हवा सुगंधित करून सोडतो. आपल्या गोव्यात बकुळीची फुले आणि ‘सुरंगा’च्या झाडांना बहर येतो. शांत-कोमल, नाजूक अशा बकुळीच्या फुलांचा सडा झाडाखाली पडतो. दवबिंदू झेलीत बकुळीची फुले ताजीतवानी होतात. त्यांना हस्तस्पर्श झाला की हस्तांनाही बकुळीचा सुवास येतो. केशरी, पिवळा, गुलाबी, लाल, पांढरा अशा अनेक रंगछटांनी निसर्गाचं- फुलांचं वैभव संपन्न होतं.
वसंत पंचमीला सरस्वती, लक्ष्मी आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. वसंतोत्सव हा निसर्गाचा आनंदी उत्सवसोहळा आहे. हा सृजनसोहळा आम्ही मनात साठवून ठेवूया.
वसंतात मदनोत्सव साजरा करण्यात येतो. मदन (अनंत)- मकरध्वज यांचे पूजन करून नाच, गाणे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. वनविहार, जलक्रीडा होतात. उत्तर भारतात सूर्यरथ मिरवणूक काढून वसंतोत्सव साजरा केला जातो.
वसंतोत्सवाची सांगता फाल्गुन महिन्यात झाली तरी चैत्र-वैशाखातही वसंत ऋतूचे उत्सव- सोहळे साजरे होतात. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्री उत्सव गोव्यात प्रामुख्याने साखळी येथे श्रीपांडुरंग देवस्थानात चैत्र शुद्ध नवमी ते पौर्णिमेपर्यंत चालतो.
या वर्षी वसंत ऋतू चैत्र कृष्ण पंचमीला म्हणजे 12 एप्रिल रोजी संपून 19 एप्रिलपासून ग्रीष्म ऋतू सुरू होतो. हवेतील उष्णतामान वाढून उष्णतेचे दिवस आले की समजावे वसंत येऊन गेला अन् ग्रीष्म ऋतू आला. हा वसंत ऋतू ज्यावेळी बहरून येतो त्यावेळी नवचैतन्य, नवउत्साहाची पर्वणी घेऊन येतो. निसर्गसौंदर्याचं आकर्षक नि लोभसवाणं रूप, सृष्टीचा फुला-फळांनीयुक्त झाडे-वनस्पतींसह घेतलेला नवा पेहराव… सारं, सारं काही मानवी जीवनाला नवी ऊर्जा देतं. नकारात्मकता शिशिराच्या पानझडीसह गळून पडते नि माणसाच्या जीवनात सकारात्मकतेची नवी ऊर्जा प्राप्त झाल्याने जीवनात ‘वसंत’ बहरतो अन् ओठांवर शब्द पुटपुटू लागतात- ‘वसंत हा ऋतु बहरा आला!’
सहा वेगवेगळ्या ऋतूंचे वेगवेगळे सोहळे. त्या सोहळ्यात माणूस आपलं भान हरपून जातो. तथापि, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर या सहा ऋतूंत जर सर्वांचा राजा कोण असेल तर तो म्हणजे ‘वसंत.’ म्हणून त्याला ‘वसंत राजा’ संबोधले आहे. या पार्श्वभूमीवर म्हणावेसे वाटते-
वसंत ऋतूचे लोभस सोहळे
येथेच माझे भान हरपावे!
या जन्मावर, या जगण्यावर
शतदां प्रेम करावे!