आर्थिक स्थितीवरून चिदंबरम यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

0
129

तिहार तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्याच्या २४ तासांच्या आत खासदार तथा माजी केंद्रीय वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवरून केंद्रातील मोदी सरकारचे वाभाडे काढले. चुकीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. मात्र केंद्र सरकारला त्यातून सावरण्यासाठी काय करावे तेच कळेनासे झाले आहे. या सर्वांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
तुरुंगात १०६ दिवस राहिल्यानंतर आपण अधिक कणखर बनल्याचे चिदंबरम म्हणाले. देशाला आर्थिक महासंकटात टाकणार्‍या नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीची जीएसटी अंमलबजावणी यासारख्या चुकांचे समर्थन करण्याच्या दुराग्रही व हट्टी वृत्तीचे दर्शन हे सरकार घडवित असल्याची टीका त्यांनी केली.

आर्थिक वर्षाचे ७ महिने उलटल्यानंतरही भाजप सरकारला वाटते की देशाच्या अर्थव्यवस्थेतील सध्याच्या समस्या या चक्रीय आहेत. सरकारचा हा समज साफ चुकीचा आहे. सरकारचा समज साफ चुकीचा आहे कारण या सरकारला याविषयी काहीच कळेनासे झाले आहे. या संदर्भात पीएमओमधून निर्णयांबाबतचे असलेले केंद्रीकरण व त्याच्या जोडीला संबंधितांचा दुराग्रहीपणा यामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे चिदंबरम् म्हणाले. देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करतानाच चिदंबरम यांनी काश्मीरी जनतेला त्यांच्या लोकशाही हक्कांप्रती आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. गेल्या ४ ऑगस्टपासून काश्मीरी जनतेला त्यांच्या लोकशाही हक्कंापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने परवानगी दिल्यास आपण जम्मू-काश्मीरला भेट देणार असल्याचे ते म्हणाले.

कांद्यावरून मोदी सरकारच्या
मानसिकतेचे दर्शन
देशभरातील कोट्यवधी लोक अन्नातील महत्त्वाचा घटक असलेला कांदा प्रचंड महागल्याने तो मिळवण्यासाठी संघर्षाच्या स्थितीत असताना देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारमन आपल्या कुटुंबातील कोणी कांदा खात नाही असे वक्तव्य करतात. यावरून या सरकारची सर्वसामान्य लोकांबाबत काय मानसिकता आहे ते स्पष्ट होते असे चिदंबरम म्हणाले.