कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर राज्याची आर्थिक घडी नीट जाग्यावर आणण्यासाठी कोणती पावले उचलावीत त्याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सांगितले.
ही समिती प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी असेल अशी माहिती मंत्री श्री. राणे यांनी दिली. यापूर्वी काही उद्योगपती व अन्यांचा समावेश असलेली जी समिती स्थापन करण्यात आली होती ती केवळ सूचना करण्यासाठी असल्याचे राणे म्हणाले. राज्याचे आर्थिक क्षेत्रात पुनरुज्जीवन कसे करता येईल यासाठीची ती समिती असून ती फक्त सूचना करेल. मात्र प्रत्यक्षात काय करावे त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार असल्याचे राणे म्हणाले.
या समितीवर आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, भारतीय उद्योग महासंघाचे प्रतिनिधी, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल अशी माहिती मंत्री श्री. राणे यांनी यावेळी दिली.