पोलीस कोठडीतून पळून गेलेल्या चोरट्याने केलेल्या आरोपांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल केला. दरम्यान, सिद्दिकीचा व्हिडिओ प्रथम ज्याला मिळाला. त्याची अगोदर चौकशी केली जाणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल केले.
राज्यातील विरोधक सिद्दिकीच्या तालावर नाचत आहेत. या प्रकरणात आयआरबी पोलीस शिपाई अमित नाईक याला बडतर्फ केले असून, या प्रकरणात गुंतलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. तसेच, गुन्हा विभागाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सिद्दिकीने एक आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संशयित आरोपी स्वतःला वाचविण्यासाठी कोणतेही वक्तव्य करू शकतो. त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल संबंधित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. आपण पोलीस महासंचालकांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून, त्याला पुन्हा पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.