– डॉ. स्वाती अणवेकर
जरी हृदय हे कायम रक्ताने भरलेले असले तरी हृदयामार्फत वहन केले जाणारे हे रक्त मात्र हृदयाचे पोषण करू शकत नाही. हृदयाला रक्त पुरवठा करून पोषण देण्याचे महत्त्वाचे कार्य करोनरी आर्टरी करते.
हृदय हे सर्वांत ताकदवान स्नायूंपासून बनविलेले आहे. हे स्नायू नियमितपणे आकुंचन व प्रसरण पावत असतात. हृदयाशी जोडलेल्या आणि महत्त्वाचे कार्य करणार्या काही प्रमुख रक्तवाहिन्या आहेत.
१) एओर्टा, २) सुपिरियर व्हेना कॅव्हा, ३) इन्फिरियर व्हेना कॅव्हा,
४) पल्मोनरी आर्टरी – अशुद्ध रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडे
५) पल्मोनरी आर्टरी – शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे
६) करोनरी आर्टरी – हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा
हृदयाच्या आत चार कप्पे असतात आणि ते आतून पोकळ असते. मानवी हृदय हे उजव्या व डाव्या अशा दोन विभागांमध्ये ‘सेप्टम’ नावाच्या पडद्याने विभागले जाते. हृदयाच्या वरच्या दोन्ही उजव्या व डाव्या कप्प्याला ‘ऍट्रियम’ म्हणतात तर त्याच्या खालच्या उजव्या व डाव्या कप्प्याला ‘व्हेन्ट्रिकल’ म्हणतात. ऍट्रियममध्ये सिरांमार्फत रक्त आणले जाते तर व्हेन्ट्रिकल्स धमन्यांमध्ये रक्तवहन करतात. ऍट्रिया व व्हेन्ट्रिकल्स एकत्रितपणे काम करत आकुंचन-प्रसरणामार्फत हृदयाबाहेर रक्त पाठवतात. जेव्हा हे रक्त या प्रत्येक कप्प्यातून बाहेर निघते तेव्हा ते त्यामध्ये असणार्या झडपांमधून बाहेर पडते. ट्रायकस्पिड व मायट्रल व्हॉल्व्ह हे ऍट्रिया व व्हेन्ट्रिकल्सच्या मध्ये असतात. एओर्टा व पल्मोनरी व्हाल्व्हज् हे व्हेन्ट्रिकल्स व हृदयाकडून निघणार्या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये असतात. या झडपा फक्त एकाच दिशेने उघडतात त्यामुळे रक्तवहनाची दिशा योग्य राखली जाते.
आता आपण हृदयामार्फत रक्तवहन कसे होते ते पाहू या. ः
प्रथम सुपिरिअर व इन्फिरिअर व्हेना कॅव्हा या दोन मोठ्या सिरांमार्फत अशुद्ध रक्त उजव्या ऍटिॅयममध्ये आणले जाते. मग उजव्या ऍट्रियममधून ते उजव्या व्हेन्ट्रिकलमध्ये आणले जाते. यावेळी ट्रायकस्पिड व्हाल्व्ह उघडते. जेव्हा उजवे व्हेन्ट्रिकल पूर्ण भरते तेव्हा ट्रायकस्पिड व्हाल्व्ह पूर्ण बंद होतो. आता जेव्हा उजवे व्हेन्ट्रिकल आकुंचन पावते तेव्हा पल्मोनरी व्हाल्व्ह उघडते व रक्त हृदयातून पल्मोनरी आर्टरीमार्फत फुफ्फुसाकडे पाठवले जाते. मग फुफ्फुसातून पल्मोनरी व्हेनमार्फत डाव्या ऍट्रियममध्ये रक्त आणले जाते.
जेव्हा डावा ऍट्रियम आकुंचन पावतो तेव्हा हे शुद्ध रक्त डाव्या व्हेन्ट्रिकलला पूर्ण भरते तेव्हा मायट्रल व्हाल्व्ह बंद होतो. आता डावा व्हेन्ट्रिकल आकुंचन पावतो व एओर्टिक व्हाल्व्ह उघडतो आणि हे शुद्ध रक्त एओर्टामार्फत सर्व शरीरात पोहोचविले जाते.
आता आपण करोनरी आर्टरी म्हणजे काय ते समजून घेऊ. ः
जरी हृदय हे कायम रक्ताने भरलेले असले तरी हृदयामार्फत वहन केले जाणारे हे रक्त मात्र हृदयाचे पोषण करू शकत नाही. हृदयाला रक्त पुरवठा करून पोषण देण्याचे महत्त्वाचे कार्य करोनरी आर्टरी करते.
करोनरी आर्टरीज दोन असतात- उजवी व डावी. उजवी करोनरी आर्टरी ही उजव्या ऍट्रियम व व्हेन्ट्रिकलला रक्तपुरवठा करते. डावी करोनरी आर्टरी डाव्या ऍट्रियम व व्हेन्ट्रीकलला रक्तपुरवठा करते. जेव्हा करोनरी आर्टरीची पोकळी आतून थोडी कमी होते तेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. ह्यालाच करोनरी आर्टरी डिसीज असे म्हणतात.
हृदयाचे ठोके कसे निर्माण होतात ते आता आपण पाहूया ः
ऍट्रिया व व्हेन्ट्रिकल हे एकत्र काम करून आकुंचन व प्रसरणाचे कार्य आलटून पालटून करतात. तेव्हाच हृदयाचा ठोका पडतो व रक्तसंवहन देखील होते.
ऍट्रियामध्ये असणारे सायनो-ऍट्रियल नोड हे नैसर्गिक पेसमेकरचे काम करते. सायनोेऍट्रियल नोड हृदयाला संवेदना देते व ऍट्रियाचे आकुंचन होते. व त्यानंतर ऍट्रिया व व्हेन्ट्रिकलमध्ये असणारा ऍट्रिओ-व्हेन्ट्रिक्युलर नोड हे व्हेन्ट्रिकलकडे ही संवेदना जाण्याआधी त्याची तीव्रता कमी करते. हीस पर्किन्ज फायबर्स हे व्हेन्ट्रिकलच्या भींतिंना संवेदना देतात ज्यामुळे त्यांचे आकुंचन होते. अशा प्रकारे हृदयाचे ठोके तयार होतात ज्याला आपण ‘दिल की धडकन’ म्हणतो.
हृदयाच्या ठोेक्यांचे योग्य प्रमाण हे ६० ते १००/ मिनिट असायला पाहिजे. ते जर ६० पेक्षा कमी असेल तर त्याला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. याउलट ते जर १०० पेक्षा जास्त असले तर त्याला म्हणतात टॅकीकार्डिया.
आता मला वाटते आपल्या सर्वांनाच आपले हृदय कसे असते व ते कसे कार्य करते हे नीट समजले असेल. त्यामुळे आता पुढील लेखापासून आपण हृदयाचे वेगवेगळे आजार पाहू या.