आरोग्य सेवेतील 3 कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन; आरोग्यमंत्री राणेंकडून कारवाई

0
4

रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवेतील दोघा कामचुकार चालकांना काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सूचनेनंतर सेवेतून निलंबित करण्यात आले. त्याशिवाय उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील अशाच अन्य एका कामचुकार कर्मचाऱ्यालाही सेवेतून निलंबित करण्यात आले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाला दिलेल्या आकस्मिक भेटीच्या वेळी वरील तिघाही जणांचा कामचुकारपणा समोर आल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. यशवंत गावठणकर, सुबोध नाईक व गुरुदास अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
निलंबित करण्यात आलेले रुग्णवाहिकेचे चालक हे रुग्णवाहिका नादुरूस्त करून ठेवून ड्युटीवर न येता घरी बसून राहत असल्याचे राणे यांनी काल इस्पितळाला दिलेल्या आकस्मिक भेटीच्यावेळी उघड झाले हाते. असे करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणे असून, अशा गोष्टी सहन केल्या जाणार नसल्याचे राणे यांनी पत्रकारांना बोलताना स्पष्ट केले. सध्या सरकारी रुग्णवाहिकांची संख्या कमी असून, सर्व रुग्णवाहिका व शववाहिका या 108 सेवेखाली आणण्याचा सरकारचा विचार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.