>> इंडिया आघाडीच्या नेत्यांचा भाजपवर आरोप
राज्यातील आरोग्य सेवा कोलमडल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे लोकांनी मतदान करण्यापूर्वी दोनदा विचार करावा असा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी इंडिया आघाडीच्या प्रवक्त्या मनीषा उसगावकर (काँग्रेस), ॲड. अश्मा बी (गोवा फॉरवर्ड) व सिसिल रॉड्रिगीस (आप) यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकार आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
ॲड. अश्मा म्हणाल्या की, भाजप सरकारने फातोर्डा येथे जिल्हा रुग्णालय सुरू केले आहे. मात्र, त्यात सुविधांचा अभाव आहे. हे रुग्णालय रुग्णांसाठी अटेंडन्स रूमसारखे झाले आहे. सुविधा नसल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येते. आयसीयू पूर्णपणे कार्यान्वित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जनतेला मूलभूत सेवा व्यवस्थित मिळत नाहीत. आरोग्य क्षेत्रात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
मनीषा उसगावकर म्हणाल्या की, भाजपने सुविधा देण्यापेक्षा भ्रष्टाचारावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच आरोग्य विभागात हाऊसकीपिंग घोटाळा झाला आहे. सर्वांत कमी बोली लावणाऱ्याला भाजपाच्या नेत्याला अपात्र ठरवून सर्वांत जास्त बोली लावणाऱ्याला कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे सरकारचे नुकसान होणार आहे. सर्वांत कमी बोली लावणाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, असे उसगावकर म्हणाल्या. सिसिल रॉड्रिगीस म्हणाल्या की, फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचारी नसल्याने दयनीय अवस्था आहे. तेथे कोणतेही सर्जन नाहीत. लिफ्ट काम करत नाहीत. या रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे, असे त्यांनी सांगितले.