आरोग्य खात्याच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची संपाची नोटीस

0
124

>> आरोग्य मंत्र्यांचा बडतर्फीचा इशारा

आरोग्य खात्यामधील चतुर्थ श्रेणी (एमटीएस) कर्मचार्‍यांनी तीन दिवसांच्या संपाची नोटीस दिल्याने आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी या संपाच्या पार्श्‍वभूमीवर एस्मा लागू करून संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांना कामावरून बडतर्फ करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, गोवा मजदूर संघाचे अध्यक्ष पुती गावकर यांनी आरोग्य मंत्री राणे यांच्या एस्मा लागू करण्याच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. आरोग्य खात्यातील बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी येत्या ११ ते १३ डिसेंबर २०१९ दरम्यान संपाची नोटीस दिली आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर एस्मा लागू करण्यासाठी फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. एस्मा लागू केल्यानंतर कामावर गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली आहे. संपात सहभागी होणार्‍या वाळपई मतदारसंघातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना पहिल्यांदा बडतर्फ करण्याची सूचना करणार आहे. संपात सहभागी होणार्‍यांची गय केली जाणार नाही, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांना देण्यात आलेली कामे नियमितपणे करीत आहेत, असे कामगार नेते गावकर यांनी सांगितले.