कूट म्हणजे कोडं. कूट म्हणजे पर्वत (जसा चित्रकूट) तसाच कूट या शब्दाचा अर्थ आहे गहन, रहस्यमय, गुहेसारखा गूढ नि खोल. परमेश्वराला गीतेत ‘कूटस्थ’ असं म्हटलंय.आपल्या लोकसंस्कृतीत अशी कोडी, उखाणे, प्रश्नमालिका खूपच असतात. कहाण्या, गीत, नृत्यं, नाट्य इतकंच काय पण काही क्रीडाप्रकारातूनही व्यक्त होतात. अशा प्रश्नोत्तरात लावणीचा सवाल-जवाब (कलगीतुरा), तेनाली रमण, बिरबल असा हजरजबाबी माणसांचे किस्सेही येऊन जातात. साहित्याचं, संस्कृतीचं हे एक हलकंफुलकं तितकंच खोल-विचारप्रवर्तक असं अंग आहे.
लाह्या फुटाव्यात तशी ही प्रश्नोत्तरं क्षणभर करमणूक जरूर करतात, पण एकांतात, निवांतात चिंतन करायला भाग पाडतात. असं चिंतनच आपलं वर्तन सुधारतं नि जीवन बदलून टाकतं. विचारातली क्रांती उच्चार-आचारात सहज उतरते. तसं घडलं तरच श्रवण, श्रुत ज्ञान, बहुश्रुतता याला अर्थ असणार आहे. नाहीतर आहेच – ‘नळी फुंकली सोनारे | इकडून तिकडे गेले वारे ॥ असो.
काही मनोरंजक तितकीच उद्बोधक प्रश्नोत्तरं तीही आरोग्य नि सुखीसमाधानी समृद्ध जीवन यांच्या संदर्भात पाहू या. त्यावर सहचिंतन करु या-
* धन्यानां उत्तमं दाक्ष्यं, धनानां उत्तमं श्रुतम् |
लाभानां श्रेष्ठं आरोग्यं, सुखानां तुष्टिः उत्तमा ॥
– अर्थ सोपा नि स्पष्ट आहे. धन्याना – धन्य लोक हे अंगच्या गुणांमुळे नि कर्तृत्वामुळे श्रेष्ठ बनतात. केवळ श्रीमंत, सत्ताधारी, प्रसिद्ध व्यक्ती धन्य असेलच असं नाही. तसंच धन्य बनण्यासाठी व्यक्ती महानच असली पाहिजे असंही नाही. अगदी लहान व्यक्तीही धन्य बनू शकतात. ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ नावाचा जो विचार आहे त्यात सामान्यांपासून असामान्य लोकांपर्यंतचे संसार येतात. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते यावर चिंतन नंतर होईल. आत्ता एकच महत्त्वाचा – सर्वांत महत्त्वाचा गुण धन्य लोकांचा सांगितला आहे- तो म्हणजे दाक्ष्यं म्हणजे दक्षता, सावधपणा, खबरदारी, पूर्वतयारी नि या सार्या गुणांबरोबरच हवं चातुर्य नि हवा प्रामाणिकपणा. या गुणांनी युक्त व्यक्तीकडेच ‘दाक्ष्य’ हा गुण असतो. श्रीगजानन महाराज (शेगांव) यांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. या संदर्भात चिंतनीय आहे. तिमाजी नावाचा एक नोकर. शेतातील धान्याचं रक्षण करण्याचं त्याचं काम. एके रात्री त्याचा डोळा लागला. तो झोपेत असताना काही गाढवं धान्याच्या राशीला लागली नि धान्य फस्त करू लागली. शेवटी शेताच्या मालकाचे सद्गुरू श्रीगजानन महाराजांनी जाऊन त्या गाढवांना दूर घालवलं नि तिमाजीला उठवून ते घरी निघूनही गेले. जागा झालेल्या तिमाजीच्या लक्षात आलं तेव्हा तो त्या धान्याच्या राशीकडे धावला. आपल्यामुळे मालकाचं किती नुकसान झालं ते ठरवण्यासाठी तो मालकाकडे आला पण मालक आपल्या सद्गुरुंकडे जाण्याच्या घाईत असल्याने ‘नंतर पाहू’ असं म्हणून निघून गेले. – या प्रसंगात तसं पाहिलं तर तिमाजी दक्ष नव्हता. तो ढाराढूर झोपला होता. आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी सावध नव्हता. पण हे झालं शारीरिक पातळीवर. जागा झाल्यावर आपल्यामुळे झालेलं धान्याचं नुकसान पाहून तो हळहळला. मानसिकरीत्या तो दक्ष होता. प्रामाणिक नि सावध होता. मालकाकडे धावत जाऊन, आपला गुन्हा कबूल करून, झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची तयारी दाखवली. या प्रायश्चित्त घेण्याच्या तयारीत त्याचा ‘दाक्ष्य’ म्हणजे दक्षता – कर्तव्यदक्षता – काम करण्यात कसूर झाली तरी शिक्षा भोगण्याची तयारी दिसून येते. यासाठीच हा प्रसंग श्रीगजाननविजय चरित्रात वर्णन केलाय, सद्गुरु महिमा तर आहेच.
* धनानां उत्तमं श्रुतम् – श्रुत म्हणजे श्रवणातून मिळवलेलं ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तीला बहुश्रुत म्हणतात म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या विषयांवर, निरनिराळ्या अधिकारी व्यक्तींकडून ऐकून – अनुभवून ज्ञान मिळवलेली व्यक्ती. असं ज्ञान (श्रुतम्) हे सर्वोत्तम धन आहे. विशेष हे की वाटलं तरी हे धन संपत नाही, उलट वाढतंच. हे चोरता येत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही; राजा याच्यावर (ज्ञानावर) कर लावू शकत नाही; इतकंच काय पण वारसही या धनावर वारसाहक्क सांगू शकत नाहीत. निःसंशय उत्तमात उत्तम धन आपलं ज्ञानच होय. ज्ञानी व्यक्तीच खर्या अर्थानं धनवान असते.
* लाभानां श्रेष्ठं आरोग्यम् – आरोग्य खरंतर धन्य बनवणारं, सर्वश्रेष्ठ धन आहे. सार्या उत्तम वस्तूंचा आस्वाद घेण्यासाठी आरोग्य हवंच. धनलाभ हा त्या दृष्टीनं खालच्या पातळीवरचा आहे. कारण रोगी माणूस कितीही धनी असला तरी सर्वार्थानं समाधानी, आनंदी बनू शकत नाही. उदा. गुरुदेव आपल्या श्रीमंत शिष्याकडे येतात. तो धान्याचा मोठा घाऊक व्यापारी असतो. साक्षात् गुरुदेव मोकळेपणानं म्हणतात- ‘काहीही चालेल. आम्ही सगळं आनंदानं खातो.’ घराची मालकीण आचार्याला बोलावून सांगते – ‘खीर कर, पण साहेबांना साखरेशिवाय. वरण-आमटी कर माझी पण मिठाशिवाय. मुलाचा रस्सा मसाल्याशिवाय. मुलीला तळलेलं घालू नकोस. भाजलेलं, उकडलेलं चालेल.’ हे ऐकून गुरुदेव मिस्किलपणे म्हणाले, ‘एवढं मोठं धान्याचं कोठार. पोत्यांनी – डब्यांनी गच्च भरलंय. पण तुम्ही सगळं खाऊ शकत नाही.’ म्हणजे आरोग्य असेल तर वैभवाचा उपभोग घेता येतो. सर्वांत मोठा लाभ आरोग्य हाच होय.
प्रपंचात तसेच परमार्थात उपासना करतानाही आरोग्य हा सार्याचा मुकुटमणी आहे हेच खरं.
* सुखात सर्वोत्तम सुख कोणते? – सुखानां उत्तमा तुष्टिः ॥
म्हणजे तुष्टी – संतोष, समाधान हेच सर्वोत्तम सुख आहे. एरवी सुख-दुःख देहाचं असतं. आपण ज्याला सुखसोयी सुविधा म्हणतो किंवा आरामदायी वस्तू म्हणतो (कंफर्ट्स अँड प्लेजर्स) त्या देहाला सुख देतात. पण खरं समाधान मनालाच लाभतं. तुष्टी म्हणजे तहान-भूक, देहाच्या इतर गरजा यांची पूर्ती नव्हे. वस्तूंनी लाभणारी तृप्ती नव्हे. तर मनाचा संतोष – समाधान – आनंद. सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश, मान-अपमान, मिलन-वियोग अशा कोणत्याही परिस्थितीत मन आनंदात, बुद्धी स्थिर ठेवणं हे खरं टिकाऊ समाधान.
या सार्यांच्या मुळाशी नि तळाशी आरोग्य हा घटक असतोच. आरोग्य नसेल तर धन-धान्य-संपत्ती-प्रतिष्ठा यांपैकी कशाचाच उपभोग घेता येणार नाही. सर्वोच्च, सर्वोत्तम उपलब्धी (अचीव्हमेंट्) आरोग्य हीच!
* आणखी काही विचारप्रवर्तक सुभाषितं –
सुखं स्वपिति अऋणवान्, व्याधिमुक्तश्च यो नरः |
सावकाशैस्तु यो भुंक्ते, यस्तु दारैः न संगतः ॥
सुखानं कोण झोपू शकतो? उत्तर आहे – जो कर्जमुक्त (अऋणवान्) आहे; जो रोगमुक्त (निरोगी, आरोग्यवान) आहे; जो शांतपणे, सावकाश भोजन करतो नि जो स्त्रीच्या म्हणजे कामवासनेच्या आहारी जात नाही असा माणूस सुखानं शांतपणे आरामात झोपू शकतो.
हे वरवर पाहिलं तरी पटणारं आहे. कर्जाचा बोजा डोक्यावर नाही असं थंड, हलकं डोकं (व्यक्ती) शांत झोपू शकतं. कर्जाचं ओझं फिटत नसेल तर अगदी आत्महत्या करणारी अनेक माणसं आपण पाहतो. अशी व्यक्ती खरी सुखीसमाधानी असते जी ऋणमुक्त आहे. हे अर्थातच आर्थिक ऋण आहे. एरवी माता-पिता-आचार्य (गुरुदेव) यांच्या ऋणात राहणाराच शांत झोपू शकतो.
दुसरी गोष्ट जी शांत झोपेसाठी आवश्यक आहे ती म्हणजे आरोग्यवान, व्याधिमुक्त व्यक्ती. एकवेळ देहाचं अनारोग्य झालेलं. ते सहन करता येईल. पण शरीर आणि मनबुद्धी दोन्ही शांतस्थिर असतील तर ती व्यक्ती शांत झोपू शकते. आनंदात जगू शकते. महाभारतातील भीष्माचा म्हणजेच देवव्रताचा पिता शांतनू हा अशी व्यक्ती होता. त्याचं शरीर (म्हणूनच वृत्ती) नावाप्रमाणंच ‘शांत-तनू’ होती. तनामनाचं आरोग्य, स्वास्थ्य सांभाळण्यासाठी त्याचं मार्गदर्शन घ्यायला, इलाज करून घ्यायला अनेकानेक रुग्ण देशाच्या सर्व भागातून शांतनूला भेटायला येत. त्याच्या दर्शन-स्पर्शनानं नि दिलेल्या औषधानं त्यांना समाधान मिळे. ‘आरोग्यं धनसंपदा’ हे सर्वस्वी सत्य आहे.
जरी आज अस्तंगत झाल्यासारखा वाटला तरी ‘शुभं करोति’ हा घरातील सर्व मंडळींना – निदान लहान मुलांनी, एकत्र येऊन स्वतःवर केलेला संस्कार आहे. रोज करायचा असल्यानं तो नित्यनेम आहे. त्यातील महत्त्वाचा शब्दप्रयोग म्हणजे ‘आरोग्यं धन संपदा’ – आरोग्य ही धन्य करणारी संपत्ती. या सायंप्रार्थनेत पैसा मिळवून आर्थिक सुबत्तेला प्राधान्य दिलेलं नाहीये. शरीरमनाच्या आरोग्यालाच खरी संपत्ती, खरी समृद्धी मानलीय. आरोग्यविषयक सुभाषित ग्रंथात तर या विषयाला केंद्र मानून अनेकानेक सुभाषितं रचली गेलीयत. हे ग्रंथ, लिहिणारे लेखक, ग्रंथात ज्यांच्या तोंडी ही सुवचनं आली आहेत ती पात्रं यात भरपूर विविधता आहे.
यातीलच एक महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करणारं सुभाषित पाहू या –
धन खरं कशाला म्हणायचं? धन या संकल्पनेचे विविध पैलू सांगितलेयत-
* धनं रुपं अवैक्लव्यं, धनं कुलं सुमंगलम् |
धनं यौवनं अम्लनं, धनं आयुः निरामयम् ॥
या सुभाषितात धन म्हणजे रूप-कुल-यौवन-आयुष्य हे सांगताना प्रत्येक गोष्टीचं वैशिष्ट्य किंवा गुण सांगितलाय. त्यावर सहचिंतन केलं पाहिजे.
* धनं रुपं अवैक्लव्यम् – माणसाचं रूप हे त्याचं धन आहे. स्त्रियांच्या बाबतीत तर हे अधिकच खरं आहे. पण केवळ देखणं, सुंदर रूप हे धन नाही तर जे रुप (म्हणजे त्यामागचं मन) विकाररहित आहे. लगेच खचणारं, वैफल्यग्रस्त होणारं, निराशेनं काळवंडणारं रुप नव्हे, जे सतत उल्हास-उमेद-चैतन्य यांनी उत्फुल्ल म्हणजे काठोकाठ भरलेलं, पूर्ण उमललेलं आहे ते रुप खरं धन आहे. केवळ रंगरंगोटी (मेक्अप) असं रूप सजवू शकत नाही. अंगकांती (ग्लो) आतून ते जाळते (ग्लोज फ्रॉम् विदिन् ) असं म्हणतात ते खरं आहे.
* धनं कुलं सुमंगलम् – मंगल म्हणजे पवित्र म्हणजे सुसंस्कारित, सुसंस्कृत कुळ हे धन आहे. जात-वर्ण-प्रतिषा-ज्ञान-शिक्षण यापेक्षा संस्कार घडवणारं कुटुंब ही खरी संपत्ती.
* धनं यौवनं अम्लनम् – तारुण्य हे धन आहे. पण धनदांडग्यांचं अतिरेकी तारुण्य नव्हे. कधीही न थकणारं (अम्लान), सदा ताजं टवटवीत राहणारं यौवन ही खरी धनसंपदा आहे.
* धनं आयुः निरामयम् – आरोग्यपूर्ण आयुष्य ही सर्वांत मोलाची संपत्ती आहे. बाकी सार्या प्रकारच्या संपत्ती या निष्प्रभ आहेत. रोगट आहेत. आरोग्य हीच खरी संपत्ती हे मान्य असलं तरी कळून वळत नाही म्हणून जीवनात फळत नाही अशी आपली स्थिती होऊन राहिलीय. ही दुर्दैवी परिस्थिती पूर्वीपासून आहे म्हणूनच तर ऋषींना प्रार्थना करावी लागली ना?…. सर्वे सन्तु निरामयाः॥