>> औषधांच्या तुटवड्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा आदेश
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सकाळी पणजी आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली असता या केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे संतप्त बनलेल्या आरोग्यमंत्र्यांनी आरोग्यसेवा संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी व पणजी आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. प्रितम नाईक या दोघांनाही कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचा आदेश आरोग्य सचिवांना दिला. तसेच मधुमेहाच्या औषधांसह सर्व औषधे ४८ तासांत पणजीसह सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंबंधी बोलताना विश्वजित राणे म्हणाले की, पणजी आरोग्य केंद्रात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. मधुमेह रुग्णांसाठी लागणारे मेटमोर्फिन हे औषध या केंद्रात असायलाच हवे. मात्र, तेही नसल्याचे आढळून आल्याचे ते म्हणाले. होमियोपॅथी औषधांसाठीही मेटमोर्फिनची गरज भासते, असे सांगून औषधांचा एवढा तुटवडा असताना वरील अधिकार्यांपैकी कुणीही औषधांची मागणी केली नाही. त्यामुळे या केंद्रात उपचारासाठी येणार्या रुग्णांचे हाल होत असल्याचे आपणाला या केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी बोलल्यानंतर कळून चुकल्याचे राणे यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून पणजी आरोग्य केंद्रात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. मात्र, असे असताना डॉ. संजीव दळवी व डॉ. प्रितम नाईक यांनी त्याबाबत कुणालाही कळवले नाही. तसेच संबंधीतांकडे औषधांची मागणीही केली नाही. हा बेशिस्तपणा खपवून घेण्यासारखा नाही. त्यामुळेच आपण वरील दोघांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश आरोग्य सचिवांना दिला असल्याचे राणे यांनी सांगितले. वरील दोघांनाही याबाबत सविस्तर असे स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आले आहे.
राज्यातील सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रे तसेच शहरी आरोग्य केंद्रांवरील सर्व समस्या दूर होईपर्यंत पुढील २-३ महिन्यांपर्यंत राज्याबाहेर न जाण्याचा आदेशही आपण आरोग्यसेवा संचालनालयाच्या संचालकांना दिला असल्याचेही राणे यांनी सांगितले.