- श्अनुप प्रियोळकर
प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचा हा कार्यक्रम त्यांच्या मूळगावी, म्हणजे अर्थातच त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीची अनेक वर्षे ज्या वास्तूत गेली, त्या वास्तूत होणे हे अनेकार्थांनी संयुक्तिक वाटले. ह्या कार्यक्रमात सहभागी होता आले, त्याविषयी –
आरवलीतील समवयस्कांचे ‘जयाभाई’, लहानांचे व कुटुंबाचे ‘जयाकाका’ आणि आमच्यासारख्या इतरांचे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध साहित्यित श्री. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाच्या निमित्ताने त्यांच्या मूळ गावी आरवली- शिरोडा येथे आयोजित कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अनंत आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यात सहभागी होण्याचे भाग्य माझ्यासारख्या अनेक चाहत्यांना लाभले. अद्वितीय असे लेखन व वैयक्तिक जीवनप्रवासातील त्यांच्या आचरणाचा सुगंध अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या मनात ताजा व टवटवीत आहे याची प्रचीती यानिमित्ताने आली.
14 ऑगस्ट 2024 पासून प्रारंभ झालेल्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा योग ‘सृजनसंवाद- गोवा’ या संस्थेला आला हे आमचे अहोभाग्य! प्रथितयश अशा या लेखकाच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करावा, असा विचार त्यांच्या साहित्यावर मनोमन प्रेम करणाऱ्या अनेकांच्या मनात गेले काही महिने घोळत होता. ‘सृजन संवाद’ने ही जबाबदारी घेतली. दळवींचा मुलगा श्री. गिरीश यांच्याशी असलेल्या स्नेहभावाचा आधार घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली. हा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी, म्हणजे अर्थातच त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीची अनेक वर्षे ज्या वास्तूत गेली, त्या वास्तूत होणे हे अनेकार्थांनी संयुक्तिक वाटले.
दळवी साहेबांचे पुतणे श्री. सचिन दळवी व त्यांचे कुटुंब ज्या वास्तूत राहतात, त्या मूळ वास्तूची देखभाल त्यांनी अगदी चोख ठेवली आहे. शतकोत्तर वर्षांआधी उभी केलेली ही वास्तू आजही दळवीसाहेबांच्या कर्तृत्वाची साक्ष देते. बहुतांश वास्तूचे अस्तित्व पारंपरिक पद्धतीने राखून- केवळ आजच्या घडीला आपल्या राहणीमानाला आवश्यक तेवढ्याच सुविधा सामावून- घराचे मूळचे घरपण जपून ठेवण्यात श्री. सचिन व त्यांचे कुटुंबीय प्रयत्नशील असतात आणि त्यात त्यांना आनंदही वाटतो.
विशेष म्हणजे, दळवींच्या ‘महानंदा’ या कथेवर आधारित तयार झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरण याच वास्तूत झाल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर अमाप आनंद विलसत असतो.
मी स्वतः दळवी साहेब मुंबईत असताना या वास्तूला भेट दिली होती.
बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 च्या संध्याकाळी चार वाजल्यानंतर दळवी साहेबांच्या घराकडे येणाऱ्या वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली व उपस्थिती लक्षणीय झाली. साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अपेक्षा केलेली व त्यांच्याबद्दल प्रेम वाटणारी ज्येष्ठ मंडळी उपस्थित झाली आणि आरवलीचे ते घर व परिसर गजबजून गेला. ह्या उपस्थितीची अपेक्षा असल्याने सचिनने घराच्या वरच्या मजल्यावर बैठकीची व्यवस्था करून उपस्थितांना कार्यक्रमाचा आनंद अनुभवू देण्याची जय्यत तयारी केली होती. एकंदर कार्यक्रमाची व्यवस्था अगदी चोख व मनाला समाधान देणारी होती.
साहित्यप्रेरणा कट्ट्याचे सदस्य श्री. विनय सौदागर यांनी बरोबर 4.30 च्या ठोक्याला ‘कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, सर्वांनी स्थानापन्न व्हावे’ अशी उपस्थितांना विनंती केली. कार्यक्रमस्थळी आलेली मंडळी ही केवळ गर्दी वाढवणारी नव्हती, तर दर्दी लोकांची होती. आणि त्याहूनही अधिक ज्यांनी दळवी साहेबांना प्रत्यक्ष पाहिले, त्यांचा सहवास अनुभवलेला होता, अशा लोकांची होती. काहींनी त्यांना मासळी मार्केटमध्ये अगदी साध्या माणसासारखे मासळी विकत घेताना पाहिले होते, तीही या सोहळ्यात सामील झाली होती. त्यांच्या जाण्याला आज 30 वर्षे पूर्ण होऊनही त्याच आत्मीयतेने लोक जमत होते. एवढा सन्मान क्वचितच एखाद्या साहित्यिकाच्या वाट्याला आला असेल, असे त्या क्षणी वाटून गेले. उपस्थितांच्या गप्पागोष्टीत त्यांचे लेखन, त्यांचा साधेपणा व आपल्या भोवती कुठल्याही प्रकारचे वलय निर्माण न करता आरवली गावाबद्दल त्यांना असलेला अभिमान हे विषय प्रामुख्याने चर्चिले जात होते. प्रमुख वक्त्या व कोकणच्या साहित्यिक सौ. वृंदा कांबळी यांनी त्यांच्या लेखसंग्रहांवर व त्यांचा आरवलीतील वास्तव्याशी असलेला संबंध याकडे लक्ष वेधून त्यांच्या वाङ्मयीन वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही व शिरोडा पंचक्रोशीतील उद्योजक श्री. भाई मंत्री यांनी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दळवीसाहेबांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे असे सांगून यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या मनोगताच्या शेवटी ते म्हणाले की, “दळवी साहेबांची मृत्यूपूर्व आरवलीला भेट देण्याची इच्छा होती, पण त्यांच्या आजारपणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही, याची खंत माझ्या मनाला सतत सतावत असते.”
कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने मी अनुभवलेला त्यांचा स्नेह व दोन्ही कुटुंबांना एकमेकांबद्दल असलेले प्रेम व जिव्हाळा याबद्दल विचार व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे, ज्या पाळण्यात दळवी साहेबांच्या आयुष्याची सुरुवात झाली, त्यात त्यांची प्रतिमा व निवडक पुस्तकांचे पूजन करून शताब्दी महोत्सवाची सुरुवात केली. एकंदरीत कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या मूळगावी व त्याहूनही त्यांच्या वास्तूत होणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही, हा विचार मनाच्या कप्प्यात ठेवून प्रत्येकाने निरोप घेतला.