>> राहूलच्या हल्ल्यावर सीतारमणांची प्रतिक्रिया
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १ लाख ७६ हजार कोटी रुपयांची रक्कम भारत सरकारकडे हस्तांतरीत केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण संतप्त झाल्या आहेत. राहूल गांधी यांनी सदर वक्तव्य करण्याआधी कॉंग्रेसच्या माजी वित्तमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला आपण महत्त्व देत नाही अशी टिप्पणी सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत केली.
विशेष म्हणजे आरबीआयच्या राखीव निधीच्या अनुषंगाने असलेल्या मतभेदांमुळे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व नंतर डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदत्याग केला होता.
काल सकाळी राहूल गांधी यांनी आरबीआय तथा केंद्र सरकारच्या वरील निर्णयासंदर्भात मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. देशाची आर्थिक स्थिती खालावली असून त्यातून सावरण्यासाठी काय करावे याबाबत केंद्रीय वित्तमंत्री गोंधळलेल्या आहेत. देशाच्या स्वनिर्मित आर्थिक आपत्तीतून कसे बाहेर यावे हे त्यांना कळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आरबीआयच्या राखीव निधीची चोरी केली असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला होता.
निधी वापराबाबत निर्णय नाही
वरील रक्कम हस्तांतरीत करण्यासंदर्भात आरबीआयनेच जालान समिती स्थापन केली होती. त्यामुळे आरबीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आहे. आरबीआयकडून मिळालेल्या रकमेचा वापर कसा करायचा याबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचे सीतारमण यांनी सांगितले.