– डॉ. सोमनाथ कोमरपंत
याच पुस्तकात ‘जोगवा’ या आरती प्रभूंच्या पहिल्या कवितासंग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या प्रकाशित- अप्रकाशित कविता आलेल्या आहेत. जया दडकर यांनी महत्प्रयासाने अनेक व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने हा वाङ्मयीनदृष्ट्या मौलिक असलेला ठेवा उपलब्ध करून दिला आहे. या कवितांचा हा थोडक्यात रसास्वाद…
नुकतेच ‘मौज प्रकाशन गृहा’ने प्रकाशित केलेले चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांचे ‘एक लघुकादंबरी आणि काही कविता’ हे पुस्तक हाती आले. यात ‘रहस्यरंजन’ दिवाळी विशेषांक १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘झाडं नग्न झाली’ ही लघुकादंबरी समाविष्ट झालेली आहे. ‘रात्र काळी… घागर काळी’ या कादंबरीचे हे मूळ रूप. तिचा परामर्श या लेखात घेतलेला नाही.
याच पुस्तकात ‘जोगवा’ या आरती प्रभूंच्या पहिल्या कवितासंग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या प्रकाशित- अप्रकाशित कविता आलेल्या आहेत. जया दडकर यांनी महत्प्रयासाने अनेक व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने हा वाङ्मयीनदृष्ट्या मौलिक असलेला ठेवा उपलब्ध करून दिला आहे. या कवितांचा हा थोडक्यात रसास्वाद.या कवितांच्या प्रारंभी आरती प्रभूंच्या हस्ताक्षरांत त्यांची ‘मागणें’ ही कविता उद्धृत केलेली आहे. सुरुवातीला ते ‘पुष्पकुमार’ या टोपणनावाने कविता लिहायचे. साधारणतः १९५० ते १९५८ पर्यंतच्या काळातील या कविता आहेत.
‘भवितव्य’, ‘ऊठ जरा ऊठ जरा’, ‘दमलेल्या आशांनो’, ‘मुके पडसाद’, ‘पुढची स्वप्ने’ आणि ‘शिव शिव’ इत्यादी कविता आज वाचल्या तर त्या आरती प्रभूंच्या वळणाच्या कविता वाटत नाहीत. एक तर त्यांच्यावर पूर्वसूरींचा प्रभाव होता, शिवाय उद्बोधनाच्या प्रेरणेने त्या लिहिल्या होत्या. कविमनाच्या गंगोत्रीचा प्रवाह हा असाच असतो. पुढे मात्र त्या प्रवाहाला जीवनचिंतनाची मिती प्राप्त होते. जाणिवा प्रगल्भ होतात. आरती प्रभू यांच्या प्रतिभाधर्माचे वैशिष्ट्य असे की त्यांच्यावर भोवतालच्या निसर्गाचा व सांस्कृतिक संचिताचा प्रभाव पडला. कवितानिर्मितीचा निदिध्यास त्यांनी बाळगला. प्र. श्री. नेरूरकर, सी. श्री. उपाध्ये आणि मधु मंगेश कर्णिक या समवयस्क मित्रांबरोबर काव्यवाचन आणि काव्यचर्चा करण्यात त्यांनी तासन् तास घालविले. या ध्यासापायी लौकिक जीवनदेखील कःपदार्थ मानले. औपचारिक शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले; परंतु शब्दशक्तीची उपासना निष्ठेने केली. पुढच्या प्रवासाच्या पाऊलखुणा ‘काही कविता’मधून निश्चितपणे दिसून येतात. ‘जळगौरी’ या कवितेचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी रेखाटलेले निसर्गचित्र पाहण्यासारखे आहे ः
वंशवनाच्या पल्याड तेथे रुद्राचे राऊळसरोवराच्या तिरी वंशवनि वारा कंपाकुलपडछायांतुन कडेकडेच्या झुले कमळवेलघंटाध्वनि कधि कंपित करितो पैलतटी बैलसगळ्या नारी घडे घेउनी खिदळत येति इथेनितंबिनी कुणी गिरकी घेऊन जळात क्षण लवते…‘काजव्यांची रात्र’मधील क्षणचित्रही विलोभनीय आहे ःइकडून तिकडे जरा भिरभिरतो काजवारजनीच्या वेणीवरचे फूल गळले केधवापदतलि चिरडील कुणी जपे म्हणुनी वनराणीलपवी पानोपानींं मृदुल मृदुल वा तृणीकमालीच्या अंतर्विरोधाने व्यापलेल्या सृष्टीचे वर्णन तेवढ्याच तादात्म्याने कवीने रेखाटले आहे ःदुपार जळते दिशादिशांतुनकरपे माती खडकहि तडकुनझरी तरीही झिमझिम ओलीपान झिळमिळ्या रानी झिरपे(दिगंत मापी सप्तस्वरांनी)‘श्यामजांभळ्या मनी’ या कवितेत नितांत रमणीय वातावरणाचा वेध घेताना कवी उद्गारतो ःजरा नभाचीपुसट साउली तरलतंद्रिपरी,शितळ कोवळी जरि झुळझुळलीतरिहि जळावरगर्द सावळ्या खळाळल्याविणशहार साजुक भुरळभुलावणअलगद फाके जर्द झळाळीतरळे रेषा सोनजांभळीनाजुक भावभावनांची पखरण आणि विविध रंगांची भुलावण यांचा गोफ कवीने इथे गुंफलेला आहे. ‘पंगारा’, ‘आजोबा’, ‘चातकाच्या नेत्रामध्ये’, ‘पार्याची परडी’, ‘मन झुंजुमुंजू’, ‘थांबे सांजवारा’ आणि ‘चिमणी’ या निसर्गानुभूतीचे चित्रण करणार्या अप्रतिम कविता आहेत. त्यांतील प्रतिमासृष्टीचा आनंद घेण्यासाठी त्या मुळातून वाचायला हव्यात. आशयसौंदर्याचीही अनुभूती घ्यायला हवी. प्रेमानुभूतीचे चित्रण करणे हा आरती प्रभूंच्या कवितेतील महत्त्वाचा गुणविशेष. प्रियकर आणि प्रेयसी यांचे भावविश्व त्यांनी अलवारपणे चित्रित केले आहे. या दृष्टीने ‘तुझी माझी गाठ पडली’ या कवितेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शारीर संवेदनेला येथे कवी नाकारत नाही.
तुझ्या नखाच्या डंखानं गमातीला फुटला कढतकढत मत्तगंधआणि काळ्याभुर्या कुंदकाळीझाली उघडझाप काळोखाच्या पापण्यांची‘शुद्ध चवथीच्या रात्री’ या कवितेत मुक्त शृंगाराचे चित्रण आढळते. ‘सर्प’, ‘उभी ही कोण?’, ‘एक जुनाट जांभळ’, ‘सारंगी’ (१), ‘सारंगी’ (२), ‘रत्नांच्या नशेत’, ‘पुण्य उरी’ आणि ‘उधळण-गंधा’ या प्रीतिविश्वाचे चित्रण करणार्या कविता या संग्रहात आहेत. ‘रत्नांच्या नशेत’ या कवितेतील प्रियकर उद्गारतो ःतुझ्या चांदण्याच्या मना गंधाची किनारनिळ्या नवलाचे डोळे छंदीफंदी फारवर्षेतल्या विजेसही झोंबे तुझे वारेआणि तुझिया स्पर्शाने मौन ही झंकारेकाव्यनिर्मितीची प्रक्रिया आणि सृजनक्षण यांविषयीच्या कविताही ‘काही कविता’मध्ये समाविष्ट आहेत. ‘कवितेची कथा’ (१) मध्ये कवी उद्गारतो ःअशी माझी कथा अशी माझी व्यथाछंद माझा पिसा गीतजडितसादुःख सोनसळे असे ठिबकलेअर्थी शब्दांतून तीर्थची होऊनवाल्मीकीच्या हृदी अनुष्टुभ छंदीमीच ॐकारले कविता मी झालेकवितेची कथा! (२) मध्येही सृजनप्रक्रियेची नितांत रमणीय रूपकळा प्रतिमांकित होऊन आलेली आहे ःउमलते पाण्यावर निळ्या कमलांचीउर्वशीच्या डोळ्यांतली धुंदी अमृताचीनक्षत्रांच्या पापण्यांनी स्वप्नाळते उरीझंकारून शृंगारून स्मृति जरतारीअशा वेळी मोहरतो स्वर्गी कल्पवृक्षगगनाच्या गंधश्वासे भरून ये वक्ष‘ॐ’ या कवितेत पार्थिव जगात वावरतानाही कविमन अपार्थिव विश्वात कसे वावरते याचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे. ‘संत निघाले पुढे’, ‘कुणा कथायाचे?’, ‘अहं’, ‘कळ्याच होऊन’, ‘दार’, ‘अडसर दारातला’, ‘मला मृण्मयाला वेची’, ‘चपळ ससा भोळा भित्रा’, ‘मी न बुझणारा’ या वेगळ्या अनुभूतीच्या चिंतनगर्भ कविता आहेत. ‘तिने फुलायला हवे होते…’ ही तरल अनुभूतीची आणि आरती प्रभूंच्या प्रतिभाधर्माचे गुणवैभव प्रकट करणारी कविता आहे.