आरजीच्या नऊ उमेदवारांची घोषणा

0
33

>> १५ डिसेंबरपर्यंत ४० नावे जाहीर करणार

गोवा विधानसभेची आगामी २०२२ ची निवडणूक लढविणार्‍या रेव्होल्युशनरी गोवन (आरजी) या संघटनेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात बाजी मारली आहे.

आरजीने नऊ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी काल जाहीर केली. यावेळी आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी पोगो बिल हा आरजीचा मुख्य अजेंडा असेल असे सांगितले. त्या शिवाय गोव्यात उभारण्यात येणार असलेल्या कन्नड भवनासह इतर राज्यांच्या भवनांना आरजीचा कडाडून विरोध करणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

रेव्होल्युशनरी गोवन्स ही संघटनेचे उमेदवार गोवा सु-राज पार्टीच्या निवडणूक चिन्हाचा वापर करून विधानसभा निवडणूक लढविणार आहे. या संघटनेकडून येत्या १५ डिसेंबरपर्यंत ४० मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या संघटनेचे प्रमुख मनोज परब यांनी नऊ मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हा गट बनवण्यात सिंहाचा वाटा असलेले वीरेश बोरकर व विश्‍वेश नाईक यांचा समावेश आहे. त्यात सांत आंद्रे – वीरेश बोरकर, प्रियोळ – विश्‍वेश नाईक, कुडचडे – आदित्य देसाई, कुडतरी – रूपर्ट पेरेरा, नुवे – आरवीन डिकॉस्टा, कळंगुट – फ्रान्सिस्को गोन्साल्वीस, कुंकळ्ळी – विल्सन कार्दोज यांचा समावेश आहे. मात्र आरजीचे प्रमुख मनोज परब नक्की कुठून रिंगणात उतरणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.