>> ‘एआयएफएफ’च्या कार्यकारी समिती बैठकीत झाला निर्णय
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीने ३ (विदेशी) + १ (आशियाई) हा नियम आयलीग स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील फुटबॉलचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या एआयएफएफने सांगितले की, इंडियन सुपर लीगचे आयोजक ‘एफएसडीएल’ हे महासंघासोबत काम करून येत्या दोन महिन्यांत विदेशी खेळाडूंबाबतची अंतिम रुपरेषा निश्चित करणार आहे.
एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यासाठी एएफसीच्या नियमांप्रमाणे किमान २७ सामने खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे आयएसलमधील क्लबांनी किमान सामन्यांवर लक्ष केंद्रीत न करता अधिकाधिक सामने खेळून भारतीय फुटबॉलला पुढे नेण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही महासंघाने केले. महिलांची १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा केवळ तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्यामुळे याचा परिणाम भारतीय संघाच्या तयारीवर होणार नसल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. आयएसएल व आय लीगमधील संघांनी ‘इंडियन वूमन लीग’साठी आपापले संघ तयार करण्याचे आवाहनही पटेल यांनी केले. क्लबांच्या सहभागाशिवाय भारतात महिला फुटबॉल टिकणे शक्य नसल्याचे पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले.
कार्यकारी समितीने आपल्या बैठकीत पी.के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, अब्दुल लतीफ, अशोक चॅटर्जी, राजेंद्र मोहन यांच्या निधनाबद्दल एक मिनिट स्तब्ध राहून शोक व्यक्त करण्यात आला. महासंघाच्या या व्हच्युर्ल बैठकीला पटेल यांच्या व्यतिरिक्त वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रता दत्ता, सचिव कुशल दास, एफएसडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन बेन उपस्थित होते.