>> मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त; सर्व खात्यांतील पदे आयोगामार्फतच भरणार
यापुढे सर्व सरकारी खात्यांतील पदे ही गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्यात येणार असून, त्यामुळे यापुढे सरकारी नोकऱ्यांसाठीचे फसवणुकीचे बंद होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सरकारी खाती, महामंडळे व स्वायत्त संस्था यांची पदे राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली की कुणीही उमेवारांकडून ‘मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो’, असे सांगून त्यांना गंडा घालू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा सरकार लवकरच सरकारी नोकऱ्यांसाठीच्या पदांची जाहिरात गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे काढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेनुसार पदे भरण्यात येणार असून, परीक्षा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारी नोकरीचे असमिष दाखवून ज्या लोकांकडून भामट्यांनी पैसे घेतले आहेत, त्या लोकांनी त्यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकारी नोकरीसाठी पैसे देण्या-घेण्याची जेवढी प्रकरणे घडलेली आहेत, त्या सर्व प्रकरणांची तपाशीलवार चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
जी पदे भरण्यासाठी सरकारने जाहिरातही प्रसिद्ध केलेली नाही, अशा पदांसाठी सुशिक्षित लोकही भामट्यांच्या अमिषाला बळी पडून त्यांना पैसे देतात याचे आपणाला आश्चर्य वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.