आयुष्य हे…आम्ही घडवू तसं…!

0
4
  • रमेश सावईकर

आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवणे हे आपल्या हाती आहे. आयुष्यात आपण जे विहित कर्म करतो ते सत्कर्म असावे. कर्मयुक्त भक्ती ईश्वराला अधिक पसंत आहे. त्या सत्कर्मात परमार्थ असावा. त्यागाची भावना माणसांमध्ये वृद्धिंगत झाली तर तो परमार्थाला महत्त्व देईल. आपल्या आयुष्यात ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून आपण कार्यशील राहिलो तर आपलं आयुष्य सत्कारणी लागेल अन्‌‍ जीवन कृतार्थ बनेल.

कालचक्र आपल्या गतीनं फिरत असतं. त्याचं फिरणं चालूच राहणार. वर्ष येतं निसटतं, नवीन वर्ष उजाडतं. आपण नव्या वर्षाचं उमेदीनं, उत्साहानं स्वागत करतो. नवीन वर्ष निश्चितपणे काहीतरी चांगलं आपल्यासाठी घेऊन आलं आहे, अशी आपण समजूत करून घेतो. आपल्या आयुष्यातलं एक वर्ष सरून गेलेलं असतं. त्या गतसालात आपण काय कमावलं आणि काय गमावलं, याचं गणित मांडणं आवश्यक असतं. पण आपण ते करतोच असं नाही.
काळाच्या तुलनेत एक वर्ष म्हणजे काहीच नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक-एक वर्ष कितीतरी महत्त्वाचं असतं. कितीतरी लक्ष योनी फिरून आपणाला ईश्वरकृपेने मनुष्यजन्म प्राप्त झालेला असतो. मनुष्य म्हणून आपल्याला उगाच इहलोकी पाठवलेलं नसतं. ठरावीक असं विहित कर्म करण्याकरिता मनुष्यजन्म असतो, याची जाणीव आपण ठेवली तरच आपण गतसाली काय गमावलं, काय कमावलं याचा विचार करू शकतो.
जीवन हे सुंदर आहे; ते अतिसुंदर बनवणं आपल्या हाती आहे. त्याकरिता या जीवनावर मनापासून प्रेम करायला हवं. म्हटलंच आहे- ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ म्हणजे आपल्या जीवनाचे सोने होईल. त्याकरिता सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा स्रोत आपल्यामध्ये निर्माण होऊन तो सदैव प्रवाहित ठेवणे जमायला हवे.

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आयुष्य म्हणजे सुख-दुःखाच्या नाजूक धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. आयुष्यात दुःखाचे प्रसंग येतात त्यावेळी आपण स्वतःला सावरायला हवं. दुःखानं खंगून जाता कामा नये. आज आपल्या वाट्याला जे दुःखाचे संकट आलेय, त्यामुळे भविष्यातील महासंकट टळले आहे, असा विचार करून प्राप्त परिस्थितीवर मात करायला हवी.

आनंदाचे-सुखाचे क्षण, घटनाही आपल्या आयुष्यात येतात. त्या आनंदात आपण हुरळून जाता कामा नये. आयुष्यातील सुखाचे क्षण हे अळवाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखे असतात. ते हातातून केव्हा निसटून जातात हे कळतदेखील नाही. हे खूप हवेसे वाटणारे क्षण हे आपल्या आयुष्यातले ‘सौख्यदान’ असते. चमकणारे, झगमगणारे असे सोनेरी क्षण आयुष्यात येतात अन्‌‍ हातातून निसटून जातात. त्या क्षणांना आपले कायमचे सोबती आपण बनवू शकत नाही.
आयुष्यात सुख-दुःख अनुभवताना आपणाला कोणाची तरी साथ हवी असते. आजच्या विभक्त कुटुंबात आपण त्याला पारखे झालो आहोत. कोणी विचारपूस करणारं, दिलासा देणारं भेटलं तरी तोसुद्धा दिखाऊपणाचा आव असतो. ना त्या माणसाच्या मनात मायेची भावना, ना आपुलकी! आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कोसळून पडली आहे. एकत्र किंवा संयुक्त कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबपद्धतीत ‘इन मीन तीन’ माणसं. तिघांचं तोंड तीन दिशांना. ना तिघांमध्ये सुसंवाद, ना संपर्काचं अभेद्य जाळं. आधुनिक भाषेत बोलायचं झाल्यास, विश्वाशी संपर्क ठेवणारं ‘नेटवर्क’ चालू असतं. पण चार भिंतीत एकत्र राहणाऱ्या तिघांत नेटवर्क नसतं. त्यामुळे प्रत्येकाचे स्वतंत्र विचार, एकाकी निर्णय, स्वावलंबनाच्या नावाखाली ‘स्वैर’ वागणं आदी बाबी आल्याच. प्रत्येकाचं जग वेगळं. स्वतःभोवती वर्तुळाचा परिघ घालून घेतलेलं जीवन. त्यामुळे स्वतःचे ताणतणाव स्वतःच भोगायचे. त्यातून मार्ग स्वतःच काढायचा. असं हे आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला येतंच. दोष म्हणून कोणाला द्यायचा. परिस्थिती बदलली आहे म्हणून असं घडतं, अशी अधिकशः माणसांची गोड समजूत असते. त्यामुळे दोषांचे खापर परिस्थितीच्या माथ्यावर फोडायचं आणि आपण निर्दोष म्हणून मिरवायचं. वास्तविक ईश्वराने आम्हाला ‘स्थिती’ दिली आहे. आपण त्या ‘स्थिती’ला ‘परिस्थिती’ बनवलीय. आम्हीच त्याला सर्वस्वी कारणीभूत आहोत.
संयुक्त कुटुंबपद्धती संस्कृती नि संस्कारांच्या मजबूत अधिष्ठानावर उभी होती. लहानपणी मुलांवर संस्कार करणारे आई-वडील नि आजी-आजोबा असायचे. मूल चुकलं की त्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम कुटुंबातील ज्येष्ठ माणसं करायची. कुटुंब चालविणारा कुटुंबप्रमुख असायचा. सदस्यांची मते नि मने जाणून योग्य असा अंतिम निर्णय तो घ्यायचा. आयुष्यातील अनुभवांनी तो सक्षम झालेला असल्याने त्याचे निर्णय संपूर्ण कुटुंबाच्या हिताचेच ठरायचे. सर्व माणसांना मायेची पाखर, आपुलकीची ऊब मिळायची. माणसंच नव्हे तर घराच्या भिंतीही माणसाळल्यागत सर्वांना मायेचं संरक्षण द्यायच्या. सुखाचा आनंद सगळ्या कुटुंबाला मिळायचा. दुःखद प्रसंगाच्या वेळी माणसांना एकमेकांचा धीर मिळायचा. त्यामुळे दुःख पचवणे, त्यातून पुढं जाणे सोपे व्हायचे. एकप्रकारे घरातील इतर माणसं कठीण प्रसंगीही निर्धास्त व्हायची. आयुष्यात पुन्हा नव्याने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभं राहणं प्रत्येकालाच सुलभ-सोपं व्हायचं. संयुक्त कुटुंबव्यवस्थेचा सर्वात मोठा हा फायदा. त्याची जाणीव माणसाला तो एकाकी पडला, वाट्याला नैराश्य आलं की होते.

वात्सल्यरहित कुटुंबात माणसाचं आयुष्य हे अधिक आव्हानात्मक बनलंय. त्यामुळे इथली ‘दया’ हवेतच चाचपायची. आपला जन्म फाटका आहे अशी श्रद्धा झाल्याने तो फाटका पुन्हा पुन्हा शिवायचा आणि जीवनाचे हे सारे सोस असेच पुन्हा पुन्हा सोशीत राहायचे. ‘आपलं आयुष्य कसं असावं, कसं बनवावं हे आपल्या हाती नाही’ असं म्हणून या जीवनास पुन्हा क्षमा करायची.

माणसानं आपलं आयुष्य स्वतः घडवायचं असतं आणि ते स्वतः जगायचं असतं. ‘असेच हे कसेबसे जगायचे’ असे आपण ठरविले तर जीवनात आपण काहीच मिळवू शकणार नाही. जीवनात धन-संपत्ती अफाट मिळविली आणि पदरी ना सुख, ना समाधान अशी स्थिती असेल तर जीवनाची- आयुष्याची फलश्रुती ती काय? आयुष्यात समाधान प्राप्त होणं आणि समाधानी असणं ही सर्वात मोठी कमाई असते.
आपली प्रकृती काय आहे, गुणधर्म कोणता याचा विचार करून सात्विकतेचे आचरण करीत, निर्व्याज भावनेनं ‘सत्कर्म’ करून ते ईश्वराला समर्पित केल्याने आपणाला सात्त्विक, मानसिक नि आध्यात्मिक समाधान लाभते. त्या समाधानाच्या बळावर आपले आयुष्य आपण कृतार्थ बनवू शकतो. आपला हिंदू सनातन धर्म भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानावर भक्कमपणे उभा आहे. संस्कृती जतन केली पाहिजे, असं आपण म्हणतो त्यावेळी संस्कृती नि सभ्यता यांतील फरक आपण जाणून घेण्याची गरज आहे.

संस्कृती ही गतकालीन असते. तिचे वर्तमान रूप म्हणजे सभ्यता. संस्कृती उन्नत होते म्हणजे तिचे सभ्यतेत रूपांतर होणे होय, असे मत विख्यात तत्त्ववेत्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या एका पुस्तकात मांडले आहे. कर्म, भक्तिज्ञान, त्यागाचा महिमा ही भारतीय संस्कृतीची खरी अंगे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवणे हे आपल्या हाती आहे. आयुष्यात आपण जे विहित कर्म करतो ते सत्कर्म असावे. कर्मयुक्त भक्ती ईश्वराला अधिक पसंत आहे. त्या सत्कर्मात परमार्थ असावा. त्यागाची भावना माणसांमध्ये वृद्धिंगत झाली तर तो परमार्थाला महत्त्व देईल. आपल्या आयुष्यात ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून आपण कार्यशील राहिलो तर आपलं आयुष्य सत्कारणी लागेल अन्‌‍ जीवन कृतार्थ बनेल.
हिंदू धर्मात सहिष्णुतेला फार महत्त्व दिलं गेलं आहे. एकता, समानता, शांती आणि सलोखा निर्माण होण्यासाठी ‘मानवता हाच खरा धर्म आहे’ अशा दृढ श्रद्धेने माणूस कार्यरत राहिला तर संत ज्ञानेश्वरांना पसायदानात अभिप्रेत असलेली विश्वात्मक शांतता प्रस्थापित होऊ शकेल. आयुष्यावर बोलण्यासारख्या अशा खूप बाबी आहेत. हे आयुष्याबाबत थोडंसं. आयुष्य हे… जसं भासतं तसं नसतं, ते आपण बनवू तसं असतं हे मात्र नक्कीच. आपणच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत!