आयुर्वेद व होमिओपॅथीसाठी ‘नीट’ परीक्षासक्ती यंदा नको

0
77

>> मुख्यमंत्र्यांचे आयुष मंत्रालयाला पत्र

 

आयुर्वेदिक व होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास यंदाच्या वर्षापासून ‘नीट’ परीक्षा सक्तीची केली जाऊ नये अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आयुष मंत्रालयाला लिहिले आहे. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आल्याने वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होणार असल्याने आपण वरील विनंती केली असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एम्‌बीबीएस् तसेच बीडीएस् (दंत वैद्यकीय अभ्यासक्रम) शेवटच्या क्षणी ‘नीट’ सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा त्याच प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्नरत आहोत, असे पार्सेकर म्हणाले. कालच आयुष मंत्रालयाला त्यासंबंधीचे पत्र पाठवले आहे. त्याशिवाय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशीही आपण याप्रश्‍नी दूरध्वनीवरून बोललो असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी जीसीईटीसाठीची तयारी केलेली आहे. आता शेवटच्या क्षणी त्यांना ‘नीट’ परीक्षा द्यावी लागल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यंदा त्यांना जीसीईटीला बसू द्यावे व पुढील वर्षापासून ‘नीट’ सक्तीची करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.