– डॉ. संग्रामकेसरी दास, प्राध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय, शिरोडा
आयुर्वेदात असे म्हटलेलेच आहे की, ‘जगत्येवम् अनौषधम्!’ अर्थात या जगातील प्रत्येक गोष्ट ही या ना त्या औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. आपल्या देशात औषधी वनस्पतींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतात पाच लाखांहून अधिक लोक आयुर्वेद, युनानी, सिद्ध, पारंपरीक वैद्यकीचा व्यवसाय करतात. २० हजारांहून अधिक औषधी निर्मितीचे कारखाने आहेत. त्यासाठी लागणारा ९५% कच्चा माल हा जंगलातून मिळविला जातो. परिणामी या नैसर्गिक स्त्रोताची दिवसेंदिवस हानी होत आहे. औषधी वनस्पतींची लागवड हा विषय अजूनही दुर्लक्षितच आहे. सध्या देशातून रू. ३,५०० कोटी औषधी वनस्पतींची निर्यात केली जाते. चीन कडून रू. १८,००० ते २२,००० कोटी वनस्पतींची निर्यात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात औषधी वनस्पतींत भारताचा वाटा १% हून कमी आहे. आपण म्हणतो की, आपण कच्च्या मालाबाबत परिपूर्ण आहोत, मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आज अनेक औषधी जसे कापूर काचरी, दालचिनी. कापूर चीनमधून ९०% गुग्गुळ, श्वेत मुसळी पाकिस्तानातून, सर्पगंधा, सारीवा म्यानमारमधून, जायफळ श्रीलंका आणि इंडोनेशियातून आपल्याला आयातच कराव्या लागतात. दुसर्या बाजूस आधुनिक वैद्यकशास्त्राचे अनेक तोटे लक्षात घेता, आयुर्वेदिक वैद्यकांकडे जनतेचा कल वाढत आहे. म्हणूनच औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन याची नितांत गरज आहे.
अशा वनस्पतींची यादी आपल्याकडे आहे की, ज्या गोव्यातील हवामानात चांगल्या पद्धतीने वाढू शकतील. त्यांच्या काही स्थानिक जाती अनेक वर्षे गोमंतकातच वाढल्याने रोगाला बळी पडण्याचे त्यांचे प्रमाण कमी आहे. यामध्ये खालील वनस्पतींचा समावेश आहेः-
कुमारी (कोरफड), सुवर्णपत्री (सुवर्णमुखी), पिप्पली (पिंपळी), शतावरी, मण्डूकपर्णी (गुडेरी), सर्पगंधा (अडकी), वासा (अडुळसा), गुडुची (गुळवेल), भुम्यामलकी (भूईआवळा), कालमेघ (किरात), भृंगराज(माका), शालपर्णी (सालवण), लताकरंज (सागरगोटा)
वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्यासाठी त्यांची योग्य ती विभागणी केली पाहिजे. जसे,
१) वार्षिक किंवा द्विवार्षिक पीक देणार्या.
२) आंतर पीक घेता येण्याजोग्या.
३) शेताच्या हद्दीवर वाढवता येण्याजोग्या.
४) रेताड किंवा नापीक जमिनीत वाढवता येणार्या.
की ज्यामुळे अधिकाधिक उत्पन्न घेता येईल. योग्य वेळी पिकांची कापणी होईल, मजुरी खर्च कमी होईल, योग्य वेळी वीर्यवान औषधांची उपलब्धी होईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची किंमत कमी असेल.
लागवडीशिवाय देखील नैसर्गिक स्त्रोतांची हानी केल्याशिवाय त्यापासून फळे, फुले, बिया इत्यादी माल जमवणे देखील महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे एखाद्याला रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल आणि औषधांची होणारी नासाडी थांबेल. जसे, हरडे, बेहरडे, बिब्बा यांची फळे, काजरा, खाजकुली यांच्या बिया, धायटी, नागचाफा यांची फुले इत्यादी.
अनेक औषधी वनस्पतींची मागणी अधिक व पुरवठा कमी असल्याने बाजारात त्यांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक वनस्पती दुर्मीळ बनल्या आहेत. नॅशनल मेडिसिनल प्लांटस् बोर्ड, नवी दिल्ली या संस्थेकडून सुमारे १३ द्रव्यांची यादी केली गेली आहे. की ज्यांची मागणी बाजारात सर्वाधिक आहे. त्यांच्या लागवडीकरता सरकारतर्फे अनुदानही दिले जाते. त्यातील काही वनस्पती द्रव्ये पुढीलप्रमाणेः-
आमलकी (आवळा), अशोक, अश्वगंधा, बिल्व (बेल), भुम्यामलकी (भूईआवळा), ब्राह्मी, गुडुची(गुळवेल), काममेघ (किरात), सफेद मुसळी, सर्पगंधा (अडकी). इ.
नर्सरी डेव्हलपमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, प्लांट प्रोसेसिंग युनीट आणि व्हॅल्यू ऍडीशन इत्यादीसाठी मिळणार्या सरकारी अनुदानाचा आणि योजनांचा लाभ घेऊन, बाजारातील औषधी वनस्पतींचा तुटवडा लक्षात घेता, येथील हवामान व जमीन यांच्या योग्य अभ्यासाने केलेली औषधी वनस्पतींची लागवड नक्कीच किफायतशीर ठरेल व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, यात शंकाच नाही.
या संबंधातील अधिक विस्तृत माहिती येत्या दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान काणकोण येथे संपन्न होणार्या गोवा प्रदेश भारत स्वाभिमान किसान पंचायत संघटनेच्या दुसर्या अखिल गोवा कृषक गौरव महोत्सव देण्यात येणार असून त्याचा लाभ समस्त गोमंतकीयांनी घ्यावा हीच सदिच्छा!