भारताच्या लोकेश राहुल याने आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ५-० अशी जिंकलेल्या भारतीय संघाचा राहुल अविभाज्य घटक होता. या मालिकेत राहुलने २२४ धावा केल्या होत्या. राहुलने सहाव्या स्थानावरून प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळविले. रोहित शर्माने तीन क्रमांकांची उडी घेत दहावे स्थान आपल्या नावे केले आहे. श्रेयस अय्यर (+ ६३, ५५वे स्थान), मनीष पांडे (+ १२, ५८वे स्थान) यांनीदेखील भरारी घेतली आहे. आयसीसीने क्रमवारी जाहीर करताना पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील मालिकेतील कामगिरीदेखील गृहीत धरली आहे. ‘टॉप १०’मधील भारतीयांची संख्या तीन झाली असून विराट कोहली चार सामन्यांत १०५ धावा केलेला विराट कोहली नवव्या स्थानी आहे.
भारतीय गोलंदाजांचा विचार केल्यास जसप्रीत बुमराह याने २६ स्थानांची उडी घेत ११वा क्रमांक मिळविला आहे. युजवेंद्र चहल (+ १०, ३०वे स्थान), शार्दुल ठाकूर (+ ३४, ५७वे स्थान), नवदीप सैनी (+ २५, ७१वे स्थान), रवींद्र जडेजा (+ ३४, ७६वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने मालिकेतील १६० धावांच्या जोरावर २३व्या स्थानावरून १६वे स्थान प्राप्त केले आहे. टिम सायफर्ट (७३वरून ३४वे स्थान) व रॉस टेलर (५० वरून ३९वे) यांना चांगल्या कामगिरीचा लाभ झाला आहे.
फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझम याने ८७९ गुणांसह आपला पहिला क्रमांक राखला आहे. बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बाल याने ११स्थानांची सुधारणा करत फलंदाजीत ५०वा तर अल अमिन हुसेन याने २५स्थानांची प्रगती करत गोलंदाजीत ५१वा क्रमांक मिळविला आहे.