गाझा आणि इस्रायल यांच्यातील युद्ध जेवढे लांबत चालले आहे, तेवढीच गाझापट्टीतील लाखो पॅलिस्टिनी नागरिकांची स्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. 24 तासांच्या आत गाझापट्टीच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे निघून जा असे इस्रायलने फर्मावल्यानंतर लाखो नागरिकांनी दक्षिणेकडे पलायन केले. गाझावर अहोरात्र बॉम्बवर्षाव जरी सुरू असला तरी अद्याप इस्रायलने प्रत्यक्ष गाझामध्ये मात्र पाऊल ठेवलेले नाही. नागरिकांना दिलेली मुदत उलटून गेली, तरीही इस्रायलने गाझाच्या उत्तर भागात चढाई न करण्यामागे काही खास कारणे आहेत. पहिले सर्वांत महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे तेथे हमासने वर्षानुवर्षे खपून खोदून ठेवलेले सुसज्ज भुयारांचे आणि बंकरांचे जाळे. ह्याच्याच बळावर हमास अजूनही इस्रायलच्या दक्षिणेच्या वस्त्यांवर क्षेपणास्त्रे डागत राहिली आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा इस्रायलने गाझावर चढाई करण्याची अशीच तयारी चालवली होती, तेव्हापासूनच हमासने अब्जावधी डॉलर खर्चून हे जमिनीखालील भुयारांचे आणि बंकरांचे जाळे विणायला सुरुवात केली. इस्रायललाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनीही अशा प्रकारची भुयारे हुडकणारे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य दिले. मात्र गाझासारख्या दाट लोकवस्तीच्या भागातील जमिनीखाली अगदी पस्तीस मीटरपर्यंत खोल असलेल्या ह्या भुयारांचा आणि जमिनीखालील हमासच्या सुसज्ज तळांचा माग काढणे तेवढे सोपे नाही. शिवाय वळणावळणाच्या गुंतागुंतीच्या ह्या भुयारांमुळे गाझामध्ये रणगाडे आणि आर्मर्ड वेहिकल्स घुसवणेही आत्मघाती ठरू शकते याची इस्रायलला पूर्ण कल्पना आहे. शिवाय सततच्या बॉम्बहल्ल्यांनी झालेल्या प्रचंड पडझडीमुळे ती प्रत्यक्षात गाझामध्ये नीट चालू तरी शकतील का याबाबतच साशंकता आहे. इस्रायलने चढाईत दिरंगाई करण्याचे दुसरे कारण आहे ते हमासने ठेवलेल्या ओलिसांची मोठी संख्या. सात ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने तब्बल दोनशे इस्रायली लोकांना गाझामध्ये पळवून नेल्याचा कयास आहे. त्यामुळे जमिनीवरील चढाईच्या रागाने हमास त्यांची कत्तल करील आणि त्याचे खापर आपल्यावर येईल याची नेतन्याहू सरकारला जाणीव आहे. ओलीस धरल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी तेल अवीवमध्ये आंदोलन चालवलेले आहे. इस्रायलने गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांचा मानवतावादी नजरेतून विचार करावा, त्यांना हमासच्या कृत्यांची सामूहिक शिक्षा देऊ नये ह्या भूमिकेला इस्रायल जुमानायला तयार नाही, कारण ज्या हैवानियतीचे दर्शन सात ऑक्टोबरला हमासकडून झाले, त्या जखमा तो देश विसरलेला नाही. मात्र, त्यामुळे गाझापट्टीतील पॅलिस्टिनी नागरिकांच्या हालांना पारावार उरलेला नाही. गाझाचे पाणी, वीज, इंधन, औषधे सगळे काही इस्रायलच्या मेहेरबानीवर अवलंबून. त्यामुळे युद्ध सुरू होताच इस्रायलने हे सगळे रोखून धरले. गाझामधील एकमेव वीजकेंद्र इंधनाअभावी बंद पडले, खाण्यापिण्याचे, औषधांचे साठे कमी पडू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघासह ज्या आंतरराष्ट्रीय संस्था गाझामध्ये निवासी छावण्या चालवत आहेत, त्यांच्या आधारे आम गाझावासीय कसेबसे जगत आहेत. हमास मात्र माघार घेण्याच्या स्थितीत अजिबात दिसत नाही. आपल्या नागरिकांची त्यांना फिकीर दिसत नाही. उलट त्यांचीच मानवी ढाल करून हमास लढत आली आहे. निवासी इमारती, शाळा, इस्पितळांमध्ये त्यांनी आपले तळ उभारल्यानेच इस्रायलला त्यावर बॉम्बफेक करावी लागली. हमासची भिस्त इस्रायलच्या आजूबाजूच्या इस्लामी देशांवर आणि त्यातील पॅलेस्टाईन समर्थक नागरिकांवर आणि विशेषतः हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनांवर आहे. लेबनॉन आणि सीरियामधून इस्रायलविरुद्ध ज्या प्रकारे हल्ले आता सुरू झाले आहेत, इराण ज्या प्रकारे महायुद्धाची भीती दाखवू लागला आहे, आतापर्यंत अमेरिकेच्या धाकाने गप्प बसलेल्या इतर इस्लामी राष्ट्रांमध्येही ज्या प्रकारे गाझातील पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ आवाज उठू लागले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणे आता त्या अरब देशांच्या सत्ताधीशांनाही दिवसेंदिवस कठीण बनू लागले आहे. गाझातील नागरिकांची सारी भिस्त आता ईजिप्तवर आहे, गाझासाठी आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघही तेथेे लागलेला आहे. परंतु इस्रायलने रस्ते निकामी करून आणि ईजिप्तला राफाह सीमा उघडण्यास परवानगी नाकारून गाझावासीयांची कोंडी केली आहे. हमासचा नायनाट करतानाच ह्या हिजबुल्ला, इस्लामी जिहाद आदी दहशतवादी संघटनांचाही नायनाट जरूरी आहे, कारण हे आयसिसचे नवे अवतार भविष्यात अवघ्या जगाला दहशतीच्या छायेत आणल्याखेरीज राहणार नाहीत. विज्ञान – तंत्रज्ञानाची कास धरलेले आधुनिक जग आणि हे अजूनही मध्ययुगीन जगात जगणारे माथेफिरू यांच्यातील ही सारी लढाई आहे.