‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’मध्ये सहभागी होण्यासाठी नताशा उत्सुक

0
115

गोव्यात होणार्‍या आयर्नमॅन ७०.३ च्या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे सहा वेळा आयर्नमॅन विश्‍व अजिंक्यपद जिंकलेली ऍथलिट नताशा बॅडमन हिने काल मंगळवारी सांगितले.

रविवार २० रोजी होणार्‍या स्पर्धेेतील प्रमुख आकर्षण असणार्‍या नताशाने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. ‘आयर्नमॅन ७०. ३ गोवा’चा मार्ग पाहून त्याबद्दल त्यांनी या परिषदेत आनंद व्यक्त केला. पोहण्यासाठी समुद्र चांगला आहे आणि सायकल चालविण्यासाठी आणि धावण्यासाठी निवडलेले रस्तेही रंजक दिसतात, तरी गोव्यातील उष्णता आणि आर्द्रतेची सवय लावावी लागेल, असेही यावेळी तिने सांगितले. ‘स्विस स्पोर्ट्सवूमन ऑफ दी ईयर’ चा किताब त्यांनी दोन वेळा मिळवला आहे. आयर्नमॅन ट्रायथलॉन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार्‍या त्या पहिल्या महिला नसल्या तरी सहा वेळा त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. १९९८, २०००, २००१, २००२, २००४ आणि २००५ साली त्यांनी हवाई आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आहे.

ट्रायथलॉन इंडिया आणि आयर्नमॅन स्पर्धांमधील वाढत्या आवडीबद्दल त्या म्हणाल्या, गोवा आणि भारतात होणार्‍या पहिल्या आयर्नमॅन ७०.३ च्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ८०० पेक्षा अधिक भारतीय ट्रायथलिट्सनी सहभाग घेतला असल्याचे ऐकून माझी उत्सुकता वाढली आहे. भारतातील फिटनेस आणि क्रीडा क्षेत्रातील वाढती आवड यामुळे लक्षात येते. आतापर्यंत माझ्या कारकीर्दीत यश संपादन करीत थरारक क्षण अनुभवल्यानंतर अधिकाधिक लोकांना आयर्नमॅन उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देण्याचे माझे ध्येय आहे.

आयर्नमॅन ७०.३ रेसचे संचालक आणि २० वेळा आयर्नमॅन रेस पूर्ण केलेले दीपक राज सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ते म्हणाले की रेससाठी मिळालेला भारतीय ऍथलिट्‌सचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. आमची शर्यत केवळ २७ दिवसात पक्की झाली. पदार्पण करणार्‍या देशातील कोणत्याही पहिल्या आयर्नमॅन स्पर्धेसाठीची ही सर्वात जलद नोंदणी आहे.