>> दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; सोमवारी सुनावली जाणार शिक्षा
आयरिश तरुणी डॅनियली मेकलोग्लीन (28) खून प्रकरणी विकट भगत याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल दोषी ठरविले. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांच्या न्यायालयाने खून, बलात्कार व पुरावा नष्ट करणे या कलमानुसार त्याला दोषी ठरवले आहे. आता येत्या सोमवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.
डॅनियलचे खून प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते. डॅनियल ही मार्च 2017 मध्ये एका मित्रासोबत सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आली होती. 2017 साली 13 मार्च रात्री ते 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास डॅनियलचा खून झाला होता. यानंतर दक्षिण गोव्यातील काणकोण येथील पाळोळे किनाऱ्याजवळील रामबाग येथे निर्जनस्थळी एका शेतात विवस्त्र स्थितीत डॅनियलचा मृतदेह आढळला होता. तिच्या चेहऱ्यावर व डोक्यावर जखमा
होत्या.
तत्कालीन पोलिस निरीक्षक व विद्यमान उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या प्रकरणाचा छडा लावला होता. त्यांनी संशयावरून काणकोण येथील विकट भगत याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीत विकट भगतने बलात्कार करून नंतर डॅनियलचा खून केल्याचे उघड झाले होते.
न्यायालयाने काल भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून), 276 (बलात्कार) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) या गुन्ह्यांखाली विकटला दोषी ठरविले आहे. सरकारी वकील देवेंद्र कोरगावकर यांनी या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील अरुण ब्राझ डिसा यांनी अशिलाविरुद्ध कुठलाही पुरावा नसल्याने त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. दोषी ठरवल्यानंतर विकट भगतला सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
डॅनियलची आई व अन्य कुटुंबीय कालच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने विकट भगतला दोषी ठरवल्यानंतर कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अखेर आठ वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला. न्यायदेवतेचे आम्ही आभारी आहोत.