आयपीएल फ्रेंचायझींना राखता येणार पाच खेळाडू

0
69

लिलावापूर्वी प्रत्येक सहभागी फ्रेंचायझीला केवळ पाच खेळाडूंना राखता येणार आहे. आपल्या संघातील खेळाडूला राखण्यासाठी लिलावादरम्यान ‘राईट टू मॅच’चा पर्यायही फ्रेंचायझींसमोर ठेवण्यात आला आहे. आयपीएलची संचालन परिषद व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समिती सदस्यांच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

लिलावासाठीची प्रत्येक फ्रेंचायझीसाठीची रक्कम ६६ कोटींवरून (२०१६ व २०१७ लिलाव) वाढवून ८० कोटींपर्यंत करण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स या दोन फ्रेंचायझी निलंबनानंतर पुढील वर्षी पुनरागमन करत आहेत. त्यांना २०१५ साली संघात असलेल्या तसेच मागील दोन वर्षांत रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स व गुजरात लायन्सकडून खेळलेल्या आपल्या खेळाडूंना या दोन फ्रेंचायझींना राखता येणार आहे. परंतु, या दोन फ्रेंचायझी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फ्रेंचायझीकडून खेळलेल्या खेळाडूंना मात्र चेन्नई व राजस्थानचा संघ राखू शकत नाही. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळलेल्या संजू सॅमसनला राखण्याचा अधिकार दिल्ली डेअरडेव्हिल्सला मिळेल. राजस्थानची फ्रेंचायझी त्याला ‘राईट टू मॅच’द्वारे किंवा थेट राखू शकणार नाही.

पाचपैकी केवळ तीन खेळाडूंना फ्रेंचायझींना थेट राखता येणार आहे. एकाही खेळाडूला न राखल्यास लिलावामध्ये ‘राईट टू मॅच’द्वारे मात्र त्यांना कमाल तीनच खेळाडू संघात घेता येतील. ‘राईट टू मॅच’मध्ये दुसर्‍या फ्रेंचायझीने लावलेल्या सर्वोच्च बोलीच्या बरोबरीने बोली लावून आपल्या संघात यापूर्वी असलेल्या खेळाडूला राखता येते.

भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केवळ कमाल तीन व कमाल दोन विदेशी व दोन स्थानिक खेळाडूच फ्रेंचायझीला राखता येतील (थेट व लिलावाद्वारे मिळून). फ्रेंचायझीने तीन खेळाडू राखण्याचा निर्णय घेतल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसर्‍यासाठी ११ कोटी व तिसर्‍यासाठी ७ कोटी असे एकूण ३३ कोटी फ्रेंचायझीच्या ८० कोटींमधून वजा केले जाणार आहेत. केवळ दोन खेळाडू राखल्यास १२.५ कोटी व ८.५ कोटी अशी रक्कम असेल. एकच खेळाडू राखल्यास १२.५ कोटी मोजावे लागतील. लिलावापूर्वी राखलेल्या स्थानिक खेळाडूसाठी ३ कोटी रुपये फ्रेंचायझीच्या खात्यातून वजा होतील. २०१९ साली एकूण रक्कम ८२ कोटी तर २०२० साली ८५ कोटींपर्यंत ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे संचालन परिषदेचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या भारतीय खेळाडूंसाठी १०, २० व ३० लाख आधारमूल्य असलेले तीन गट होते. आता २०, ३० व ४० लाख असे गट असतील. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या भारतीय खेळाडूचे किमान आधारमूल्य ३० लाखांवरून ५० लाख करण्यात आले आहे. फ्रेंचायझींना आपल्या रकमेपैकी किमान ७५ टक्के रक्कम खर्च करणे अनिवार्य असून कमाल २५ व किमान १८ खेळाडू संघात असणे गरजेचे आहे. मागील वेळी कमाल खेळाडूंची संख्या २७ होती.

राजस्थान रॉयल्सची गोची; चेन्नईकडे अनेक पर्याय
नवीन नियमामुळे चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंग धोनी, रविचंद्रन अश्‍विन, फाफ ड्युप्लेसिस, बाबा अपराजित, अंकुश बैन्स, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ब्रेंडन मॅक्कलम, ड्वेन स्मिथ, अँडी टाय, इरफान पठाण व ईश्‍वर पांडे यांच्यापैकी निर्धारित खेळाडू राखण्याचा पर्याय आहे. राजस्थानचा संघ केवळ अजिंक्य रहाणे, स्टीव स्मिथ, अंकित शर्मा, रजत भाटिया, जेम्स फॉल्कनर व धवल कुलकर्णी यांच्यात निवड करू शकतो.