आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०१९-२०२३ सालासाठीच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये (एफटीपी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेसाठी विशेष स्थान देण्यात आले आहे. क्रिकेट मंडळाच्या खासगी टी-२० लीगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात आयसीसीने स्थान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आयपीएलच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य कोणतेही सामने खेळविले जाणार नाहीत. आयसीसीच्या या निर्णयामुळे बीसीसीआयची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर असलेली घट्ट पकड पुन्हा एकदा दिसून आली.
आयसीसीने तयार केलेल्या आराखड्यानुसार २०१९ साली ३ एप्रिल ते २६ मे हा कालावधी आयपीएलसाठी राखून ठेवण्यात आला आहे. आयपीएल समाप्तीनंतर काही दिवसांच्या आत म्हणजे ३० मे पासून क्रिकेट विश्वचषकाला इंग्लंडमध्ये प्रारंभ होणार आहे. विश्वचषकातील सामने १४ जुलैपर्यंत चालतील. २०२० साली १ एप्रिल ते ३१ मे या दिवसांत आयपीएल स्पर्धा खेळवावी लागेल. याच वर्षी २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. २०२१ साली ३१ मार्च ते ३० मे पर्यंत आयपीएल आयोजनाचा ‘विंडो’असेल. त्याच वर्षी २७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दिवसाच भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळविली जाईल. २०२२ साली ३० मार्च ते २९ मे या दिवसांत आयपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी आयसीसीची कोणतीही स्पर्धा नसेल.
२०२३ साली सर्वप्रथम ९ फेब्रुवारी ते २६ मार्च या काळात भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यानंतर २९ मार्च ते २८ मार्च हा कालावधी आयपीएलसाठी आखून देण्यात आला आहे. पाच देशांचा समावेश असलेल्या आशिया चषकाच्या २०१८, २०२० व २०२० या पुढील तीन आवृत्तींसाठी ‘विंडो’ ठरविण्यात आला आहे. १५ ते ३० सप्टेंबर या काळात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आयपीएलच्या पंधरा दिवस पूर्वी व संपल्यानंतरचे पंधरा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. न्यायालयाचा हा निर्णय ध्यानात ठेवून बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. सिंगापूरमध्ये आयसीसीच्या कार्यक्रम समितीने हा ‘एफटीपी’ तयार केला असून या कार्यक्रमाला आयसीसीच्या मंडळाच्या संमती मिळणे बाकी आहे.