आयत्या बिळांवर भाजप

0
32

गांधींच्या घराणेशाहीवर सदैव टीका करीत आलेल्या भारतीय जनता पक्षाला गोव्यामध्ये आपली सत्ता राखण्यासाठी मात्र घराणेशाहीचाच आधार घ्यावा लागेल असे दिसते. ज्या प्रकारे राणे, कवळेकर, मोन्सेर्रात, लोबो दांपत्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षनेत्यांत हतबलता दिसते, ती पाहिल्यास आगामी विधानसभेमध्ये श्रीसत्यनारायणाच्या पूजेला बसावे तशी जोडपी बसलेली पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये. अर्थात, त्यासाठी त्यांना आधी निवडून यावे लागेल हेही तितकेच खरे. २०१२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने अशाच प्रकारे कौटुंबिक तिकीटवाटप केले होते. आलेमाव कुटुंबातील पाच जणांना त्या निवडणुकीत उतरवले गेले होते. शेवटी मतदारांनी सर्व आलेमाव – कोलेमाव घरी बसवले होते.
भाजपापुढे यावेळी नवनव्या विरोधकांनी जबरदस्त आव्हान निर्माण केलेले आहे. प्रमुख विरोधक कॉंग्रेस गलितगात्र असली, तरी एकीकडे तृणमूल कॉंग्रेस – मगो युती आणि दुसरीकडे आम आदमी पक्ष यांनी भाजपला खिंडीत पकडले आहे. दोहोंपाशी तोडीस तोड पैसा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. त्यामुळे भाजपने आपली रणनीती बदलून स्वकीयांना निवडून आणण्यावर भर देण्याऐवजी उपरे उमेदवार आयात करण्याचे सत्र आरंभिलेले दिसते. जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावावेत तसे भाजपने जयेश साळगावकर, रवी नाईक, रोहन खंवटे अशा नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे इतर पक्षांचे उमेदवार पळवले जात आहेत. आता यात आणखी भर म्हणून वर उल्लेखिलेल्या जोडप्यांनाही पक्षातर्फे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष उमेदवारी प्रदान करून त्यांचा पाठिंबा नव्या सरकारला मिळवण्यात येईल असे दिसते. भाजपला यावेळी केवळ संख्या हवी आहे, मग ती कोणी आयती उपलब्ध करून देत असेल तर घराणेशाही वगैरे मुद्द्यांकडे पाहायला वेळ आहे कोणाला? आयत्या बिळांवर भाजप अशीच येत्या निवडणुकीत स्थिती दिसेल!
मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांनी शिवोलीतून आपला प्रचार धडाक्यात सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांचे पती मायकल लोबो स्वतः होते. भाजप श्रेष्ठींनी लोबोंचे मन वळवण्याचा प्रयत्न आजवर करून पाहिला. देवेंद्र फडणवीस थेट त्यांच्या भेटीस गेले होते. तरीही त्यांचा हेका कायम असल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेऊन समज देऊन पाहिली, परंतु लोबो बधणारे नाहीत हे भाजपला एव्हाना कळून चुकले आहे. शिवाय लोबो यांचा कळंगुटच नव्हे, तर आजूबाजूच्या मतदारसंघांतील प्रभाव लक्षात घेता त्यांची इतराजी ओढवून घेणे भाजपला परवडणारे नाही. जयेश साळगावकर आणि रोहन खंवटे यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने लोबोंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीही गेल्यावेळी जे किंगमेकर ठरले होते, त्या लोबोंशी वैर पत्करण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे डिलायला यांच्या शिवोलीतील उमेदवारीबाबत भाजप नेत्यांनी मूक संमती दर्शविल्याचे दिसते. अन्यथा लोबो एवढ्या उघडपणे पत्नीसोबत शिवोलीत प्रचार करण्यास धजावले नसते. डिलायला यांना भाजपची उमेदवारी दिली जाते की अपक्ष म्हणून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जातो ते पाहावे लागेल, परंतु तो केवळ सोपस्कार उरेल. मायकल लोबोंना शिंगावर घेण्यास पक्ष कचरला हा संदेश मात्र यातून मतदारांत जाईल.
जे लोबोंचे, तेच विश्वजित राणेंचे. त्यांनाही आपल्या पत्नीला निवडून आणायची खुमखुमी आली आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरही पत्नीच्या माध्यमातून आपले हातपाय पसरण्याच्या तयारीत आहेत. बाबूश आणि जेनिफर यांनी तर हे मतदारसंघ म्हणजे आपलीच मिरास असल्याच्या थाटात उमेदवारीवर दावा ठोकला आहे आणि पक्षश्रेष्ठींना वाकुल्या दाखवत आपल्या ताळगावातील कार्यालयावरील कमळ चिन्हही हटवून आपण स्वयंभू असल्याच्या बेटकुळ्या दाखवल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये या महत्त्वाकांक्षी व विस्तारवादी नेत्यांना शिंगावर घेऊन हात दाखवून अवलक्षण करून घेण्याऐवजी त्यांच्या हट्टापुढे मान तुकवून बेरजेचे गणित करण्यात अधिक हित आहे हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आक्रोश चाललेला असला तरी त्यांच्या आक्रंदनाकडे लक्ष न देता उमेदवारांची आवक चाललेली आहे. भाजपात यावेळी प्रत्येक मतदारसंघात बंडाळी आणि बेदिलीचे वातावरण आहे, परंतु जिंकण्याची क्षमता असलेल्या घोड्यांवर यावेळी पैसा लावलेला असल्याने भाजपा श्रेष्ठींना त्याची तीळमात्र फिकीर वाटेनाशी झाली आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की हे सगळे जे चालले आहे ते मतदारराजाला रुचणारे आहे का?