गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने चिंबल येथील आयटी पार्क आणि तुये, पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक सिटीच्या जागेत भूखंड व इतर सुविधा तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे.
राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षांपासून तुये, पेडणे येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणि चिंबल येथे आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी जागा गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. चिंबल येथील आयटी प्रकल्पासाठी गेल्या डिसेंबर २०१७ मध्ये १.८ लाख चौरस मीटर जागा आरोग्य खात्याकडून माहिती तंत्रज्ञान खात्याकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे.
चिंबलचा आयटी पार्क आणि तुये पेडण्याच्या इलेक्ट्रॉनिक सिटीचे प्रत्यक्ष काम कधी मार्गी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहिती तंत्रज्ञान महामंडळाने दोन्ही ठिकाणी प्रकल्प राबविण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार रस्ते व प्लॉट तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्वेक्षण करून रस्ता व भूखंडांची सीमा आखणी निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
चिंबल येथे आयटी प्रकल्पासाठी २.७० लाख चौरस मीटर जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याने चिंबल आयटी पार्कमध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे ४२ भूखंड तयार केले आहेत.
त्यात १ हजार चौरस मीटर, २ हजार चौरस मीटर, ७५० चौरस मीटर अशा प्रकारच्या भूखंडांचा समावेश आहे. तुये पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये पहिल्या टप्प्यात साधारण ६० भूखंड तयार केले आहेत. या दोन्ही ठिकाणी भूखंड व रस्त्याचे आरेखन करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. रस्ता काम आणि इतर सुविधांचे आरेखन तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक कंपन्यांकडून २५ एप्रिल पर्यंत ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत. २७ एप्रिल रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.