‘आयएएस’ असल्याचे भासवून धमकी, बागा-कळंगुटमध्ये अभियंत्याला अटक

0
2

आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून कळंगुट परिसरातील व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणारा बोगस अधिकारी संशयित मनोज कुमार (31, रा. ओडिशा) याला पोलिसांनी अटक केली. तो अभियंता असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, संशयित मनोज कुमार हा 5 डिसेंबर रोजी गोव्यात आला. त्यानंतर त्याने टॅक्सी भाड्याने घेतली आणि तो कळंगुटमध्ये आला. कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. त्याने टॅक्सी चालकाला आपण ओडिशा येथील आयएएस अधिकारी असून लवकरच आपली गोव्यात बदली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो गोव्यातून निघून गेला. नंतर संशयित मनोज कुमार हा पुन्हा 20 डिसेंबर रोजी गोव्यात आला. त्याने त्याच टॅक्सी चालकाशी संपर्क साधला. गुरुवारी (दि. 26) संशयित कळंगुट येथील टॅक्सी पार्किंग परिसरात गेला. त्याने आयएएस अधिकारी असल्याचे कार्ड दाखवून तेथील कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. किनारी भागाची पाहणी करणार असल्याचे त्याने कर्मचाऱ्यांना सांगितले होते. तो आयएएस अधिकारी असल्याचे मानून कर्मचारी त्याच्यासोबत बागा येथील किनाऱ्यावर गेले.

संशयिताने दोन शॅकमध्ये भेटी दिल्या. पाहणी केल्याचे नाटक करत त्रुटी काढून शॅक बंद करण्याची धमकी संशयिताने त्यांना दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितास अटक केली.