>> तळपणवाडा-शिरोडा येथील घटना
लग्नाच्या विषयावरून भांडण उकरून काढून मुलाने जन्मदात्या पित्याचाच खून केल्याची घटना काल तळपणवाडा-शिरोडा येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, तळपणवाडा-शिरोडा येथील गणेश राघोबा गावकर (वय ६५) हे जेवण करून दुपारी निवांत घरी बसले होते. यावेळी त्यांचा मुलगा राजेश गणेश गावकर (वय ३४) हा घरात आला आणि वडील लग्न जुळवण्यासाठी कोणतेच प्रयत्न करीत नसल्याच्या कारणावरून त्याने जोरदार भांडण केले. तसेच गणेश गावकर यांनीही मुलाशी हुज्जत घातली.
त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर रागाच्या भरात राजेशने जवळच असलेली लोखंडी पहार वडिलांच्या डोक्यात हाणली. याशिवाय फरशीचा तुकडाही वडिलांच्या डोक्यावर मारल्यानंतर ते गंभीर जखमी होत जमिनीवर कोसळले. जखमी गणेश गावकर यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले; परंतु संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित राजेश गावकर याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.