आयआयटी सीमांकनावेळी तणाव

0
14

>> सांगेत शेतकरी-पोलिसांत धक्काबुक्की; शेतकर्‍यांसह महिलाही आक्रमक

सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्पासाठी जमिनीच्या सीमांकन कामात अडथळा आणण्याचे प्रयत्न स्थानिक शेतकर्‍यांनी काल केले. यावेळी शेतकरी व पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाल्याने तणावाचे वातावरण झाले. स्थानिक शेतकर्‍यांकडून सीमांकनाच्या कामात विरोध करण्यात आल्यानंतर जागेच्या आखणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होेता.

शेळ मेळावली येथे आयआयटीसाठी जागा देण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे रद्दबातल करावा लागल्यानंतर सांगे येथील जमीन आयआयटीसाठी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सांगे येथील जागेचे सर्वेक्षण, सीमांकन करण्यात येत असून, काल स्थानिक शेतकर्‍यांसह महिलांनी जागा सर्वेक्षण व आखणीच्या कामात अडथळा आणला. त्यावेळी शेतकरी व पोलीस यांच्यात धक्काबुक्कीत दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याने त्यांना इस्पितळात न्यावे लागले.

आयआयटीच्या विरोधात दांडो गावातील नागरिकांनी रविवारी आंदोलन करून विरोध केला होता. सोमवारी सीमांकनाचे काम बंद पाडण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आम्हाला शेत जमीन हवी आहे. आयआयटीला दुसरीकडे जागा द्या, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली.