आयआयटी विरोधकांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक

0
266

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुळेली येथील नियोजित आयआयटी संकुलाला विरोध करणार्‍या स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक आज सोमवारी सकाळी ११ वाजता आल्तिनो पणजी येथे वनभवनाच्या आवारात आयोजित केली आहे.

राज्य सरकारने आयआयटी संकुल उभारण्यासाठी शेळ मेळावली येथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या जागेत आयआयटी संकुल उभारण्याला शेळ मेळावली आणि परिसरातील काही नागरिकांकडून विरोध केला जात आहे. या प्रकल्पासाठी सुपीक जमिनीचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्य सरकारने स्थानिक देवस्थानशी संबंधित जागा वगळण्याचे जाहीर केले आहे. आयआयटी जागेच्या प्रश्‍नावर स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

राज्य सरकारने पोलीस बंदोबस्तात आयआयटी संकुलाच्या जागेच्या सीमा निश्‍चित करण्याचे काम हाती घेतले आहे. सीमा सर्वेक्षणाला मेळावली ग्रामबचाव समितीने विरोध केला आहे. सर्वेक्षण सुरू केल्यानंतर स्थानिक महिलांनीही हे काम बंद करण्याची मागणी केली आहे.