आयआयटी मुंबई देणार मालपेतील भूस्खलनाचा अहवाल : मुख्यमंत्री

0
8

मालपे-पेडणे येथील राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या भूस्खलनाबाबत आयआयटी मुंबई पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या आधारे कंत्राटदारावर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आयआयटी मुंबईच्या चौकशी अहवालातून भूस्खलनाचे नेमके कारण समोर येईल. सरकारकडून कोणताही अतिरिक्त खर्च न करता त्याच कंत्राटदाराकडून रस्ता पूर्ववत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कंत्राटदारावर कारवाई करणार का या प्रश्नाला उत्तर देताना, आयआयटीचा अहवाल आल्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरड कोसळली ती टेकडीच्या सर्वात उंचावरून होती, दरड कोसळण्याचे कारण कामाचा दर्जा होता की अन्य काही तांत्रिक कारणे होती, हे अहवालात स्पष्ट होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल भूस्सखलनाच्या जागेची पाहणी केली. महामार्गावरील भूस्खलनाबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना यापूर्वीच कळवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर ठिकाणी गेल्या 20 दिवसांत तिसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
काँग्रेस नेते आणि स्थानिक लोकांनी हा प्रश्न आज (दि. 11 जुलै) मनोहर लिंक रोडच्या उद्घाटनासाठी गोव्यात येणार असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.