सध्या आयआयटीसाठी सत्तरीतील शेळ मेळावलीत विरोध असल्याने हा प्रकल्प जर फोंड्यात आला तर आपण त्याचे स्वागतच करू, अशी ग्वाही राज्याचे कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. फोंड्यात आयआयटी प्रकल्प उभारल्यास फोंडावासीयांना ती गौरवास्पद बाब ठरेल, असेही मंत्री गावडे म्हणाले.
मेळावली येथील आयआयटी प्रकल्प विरोधामुळे फोंड्यातील फर्मागुढी येथे हलवावा अशी सूचना आमदार सुदिन ढवळीकर तसेच खासदार विनय तेंडुलकर यांनी केली आहे. आमदार रवी नाईक यांनीही त्याला दुजोरा दिला.
फर्मागुढीत जमीन कमी आहे. आयआयटीसाठी किमान दहा ते बारा लाख चौरस मीटर जमिनीची गरज आहे. ही जमीन तालुक्यात दोनकडे आहे, मात्र त्यासाठी जमीन संपादनाबरोबरच ही खाजगी जमीन असल्याने त्यासाठी सरकारला या जमिनीचे मूल्य द्यावे लागणार आहे. तरीही जर कमी जमिनीत हा प्रकल्प उभारण्याची तयारी झाली तर आपण प्रियोळमध्ये अशाप्रकारची जमीन उपलब्ध करू, असे गावडे म्हणाले.