आयआयटी प्रकल्पासाठी सहकार्य द्या

0
262

>> मुख्यमंत्र्यांचे मेळावलीत आवाहन, स्थानिकांचा प्रखर विरोध

मेळावलीत आयआयटी प्रकल्प उभारायचा की नाही हे आताच सरकार ठरवणार नाही. त्यासाठी गावातील लोकांना विश्वासात घेतले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही आपण येथे देतो. पण त्याकरिता लोकांचे सहकार्य व सहभाग फार महत्त्वाचा आहे. तरच हे काम शक्य आहे. या गावात असलेल्या लोकांच्या जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुळेली मेळावली येथे सांगितले.

गुळेली आयआयटी जागेची पहाणी करण्यासाठी व येथील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल गुरूवारी मेळावली येथील जल्मी सातेरी देवस्थानच्या आवारात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, सत्तरी मामलेदार दशरथ गावस, पंच अर्जुन मेळेकर, माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीत उपस्थित नागरिकांनी व विशेष करून येथील महिलांनी आयआयटीला प्रखर विरोध दर्शवला. यावेळी उपस्थितांनी मेळावली गावात आयआयटी शैक्षणिक संस्था नकोच अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे या बैठकीत आयआयटीसंदर्भात काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र येथील भागाची पाहणी मात्र अधिकारी वर्गाबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

प्रतिनिधींसोबत चर्चेची तयारी
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण आज वीस टक्के जागेची पहाणी केली आहे. मी कोठंबीसारख्या गावात राहणारा असल्याने आपल्याला गावातील समस्यांची जाणीव आहे. मेळावली लोकांची समस्या काय आहे हे सर्वांसोबत बसून होणार चर्चा होणार नाही. त्यासाठी मेळावलीच्या लोकांनी दहा प्रतिनिधी नेमावे व त्यांच्यासोबत बसून सरकार तोडगा काढेल. तसेच गावातील घरांना क्रमांक देणे, सरकारी शौचालय बांधून देणे असेही विषय सोडविण्याचा प्रयत्न केले जातील. पण त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे.

प्रेमनाथ हजारे यांनीही यावेळी विचार मांडले. ग्रामस्थांच्या वतीने शुभम शिवोलकर, राम मेळेकर यांनी विचार मांडले. यावेळी स्थानिकांनी हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले. नंतर मुख्यमंत्र्यांनी मुरमुणे येथे जाऊन जागेची पहाणी केली. तिथे धनगर समाजातील लोकांची काही घरे आहेत. त्या लोकांशीही चर्चा केली. यावेळी मोठ्या प्रमाणत पोलीस फौजफाटा तैनात केला होता.