इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) संकुल जागा निवड समितीने रिवण-सांगे येथील जागेत आयआयटी गोवा संकुल स्थापन करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
आयआयटी गोवा संकुलासाठी जागा निवड समितीने रिवण-सांगे येथे भेट देऊन आयआयटी संकुलासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या जागेची काल पाहणी केली.
या जागा निवड समितीमध्ये के. एन. सत्यनारायण (संचालक, आयआयटी तिरुपती), बी. के. मिश्रा (संचालक, आयआयटी गोवा), एस. सुदर्शन (डीडी, आयआयटी मुंबई), प्रसाद लोलयेकर (शिक्षण सचिव, गोवा सरकार), ए. के. अग्रवाल, (सीपीडब्ल्यूडी) आणि डी. के. शर्मा (एमओई, भारत सरकार) यांचा समावेश होता.
समाजकल्याणमंत्री तथा स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई हे सांगे तालुक्यात आयआयटी संकुल स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आयआयटी जागा निवड समितीने आयआयटी गोवा संकुलासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या जागेची पाहणी करून तत्त्वतः मान्यता दिली आहे.
रिवण येथील 10 लाख चौरस मीटर जमीन उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी सांगितले