आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0
16

फर्मागुडी येथील आयआयटीमधील दुसऱ्या वर्षीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या जिव्या विजयकुमार खती (19, मध्यप्रदेश) या विद्यार्थिनीने गर्ल्स हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही मात्र तणावाखाली असल्याने आत्महत्या करीत असल्याची सदर विद्यार्थिनीने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
फर्मागुडी येथील गर्ल्स हॉस्टेलमधील जिव्या खती या विद्यार्थिनीची खोली शनिवारी दुपारपासून बंद होती. शनिवारी रात्री इतर विद्यार्थ्यांनी खोलीचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विद्यार्थिनीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. तिला त्वरित फोंडा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. फोंडा पोलिसांना माहिती मिळाल्यावर निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी विद्यार्थिनीच्या खोलीत जाऊन तपासणी केली. त्यावेळी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. मृत विद्यार्थिनीचे पालक गोव्यात पोहचल्यानंतर उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.